लक्ष्य विधानसभेचे, वारे निवडणूकांचे
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : निवडणूका जवळ आल्यावर जागावाटपाच्या प्रक्रियेत धुसफुस, भांडण, वाद, आरोप-प्रत्यारोप, आघाडी-युती तोडण्याची भाषा आणि त्यानंतर पुन्हा एकवार ‘नांदा सौख्य भरे’ हा लोकशाहीतील खेळ एव्हाना मतदारांच्याही परिचयाचा झालेला आहे. एकादा मतदारसंघ युती-महाआघाडीत कळीचा मुद्दा बनतोच, अशा वेळी त्या जागेवर तोडगा काढताना स्थानिक भागातील पक्षीय पदाधिकार्यांना, लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना समजावताना युतीच्या वा आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची दमछाक होत असते. ठाणे जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेना-भाजपा या प्रमुख पक्षांमध्ये काही जागांवरून कुरघोडी सुरू असून त्यामध्ये नवी मुंबईतील बेलापुर या जागेचा प्रामुख्याने समावेश होत आहे.
बेलापुर जागा महायुतीमध्ये गेल्या वेळी भाजपाने लढविली होती. गतवेळचे भाजपा उमेदवार सुरेश हावरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गणेश नाईक यांना कडवी झुंज देत अखेरपर्यत चुरस कायम ठेवली होती. हावरेंची लढत ही सर्वस्वी त्यावेळीदेखील शिवसैनिकांच्या अथक परिश्रमावर अवलंबूनच होती. भाजपा पक्षसंघटनेचा त्यावेळी फारसा प्रभाव नव्हता. विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत युतीमध्ये भाजपाने १४ जागा लढविल्या. १३ जागांवर भाजपा उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. तुर्भ्यातील जागेवर भाजपाचे उमेदवार सौ.विजया घरत विजयी झाल्या असल्या तरी यामध्ये भाजपा पक्षसंघटनेचा कमी आणि तुर्भ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पाटील भाऊबंदकीतील अर्ंतगत वादाचा सहभाग मोठा होता. गतपाच वर्षात नवी मुंबई भाजपा पक्षसंघटनेचा नवी मुंबईत फारसा विस्तार झाला नाही. तसेच भाजपामध्ये कार्यरत असणार्या पक्षीय पदाधिकार्यांनाही भरीव कार्य करून नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्यात मर्यादा पडल्या. गतवेळचे उमेदवार सुरेश हावरे यांनी नवी मुंबईतील राजकारणातून अलिप्तता पत्करल्यावर भाजपाकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघ लढविण्याइतपत तुल्यबळ उमेदवारच राहीला नाही. दुसरीकडे शिवसेनेची बेलापुरात ताकद वाढत गेली. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापुरातून शिवसेनेचे नगरसेवक विजयी झाले. भाजपाच्या तुलनेत शिवसेना संघटना जनताभिमुख उपक्रम राबविण्यात प्रभावी राहीली. हावरेंच्या स्थानिक भागातील राजकारणातून ‘एक्झिट’ झाल्यावर बेलापुर लढविण्याचा निर्धार स्थानिख भागातील शिवसेना पदाधिकार्यांकडून आणि शिवसैनिकांकडून आळविला जावू लागला. भाजपाच्या छावणीतही फारसा तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपाकडून या मतदारसंघाबाबत सुरूवातीच्या काळात गांभीर्याने पाहिले गेले नाही.पण मोदी पर्वानंतर आणि मंदाताई म्हात्रेंच्या प्रवेशानंतर या चित्रात बदल होत गेला. मोदींच्या करिश्म्यानंतर भाजपा पदाधिकार्यांमध्ये बेलापुरची जागा लढविण्याचा नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला. सौ.मंदाताई म्हात्रेंसारखी मातब्बर, प्रभावशाली राजकारणी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपाच्या छावणीत आल्याने भाजपाला अनायसे तगडा उमेदवारही उपलब्ध झाला. भाजपाकडून सौ.मंदाताई म्हात्रे यांची उमेदवारी ‘निश्चित’ असली तरी भाजपाचे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते मारूती भोईर, प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले, नमो नवी मुंबईचे अध्यक्ष निकम, दिप भानुशाली आदी नावेदेखील उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत असल्याचीे भाजपा कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू आहे.
भाजपाकडून बेलापुरची जागा लढविण्याची एकीकडे जय्यत तयारी सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेनेदेखील ही जागा कोणत्याही परिस्थितीत लढविण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून कंबर कसली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे ही तीन प्रबळ नावे शिवसेनेकडून चर्चिली जात आहे. त्यातच ऍड.मनोहर गायखेंनी नुकताच आपला कार्यअहवाल प्रकाशित करून इतरांच्या तुलनेत तिकीटीसाठी आघाडी घेतल्याचे शिवसेनेत बोलले जात आहे.
भाजपाकडून तिकीट निश्चित असल्याने सौ.मंदाताई म्हात्रे यांनी आपले जनसंपर्क वाढवित भेटीगाठी अभियानाला गती दिली आहे, तर भाजपाला हा मतदारसंघ सोडला नसल्याचे शिवसेनेकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. बेलापुर मतदारसंघ नक्की कोणाकडे जाणार याविषयी खुद्द शिवसेना-भाजपाचेच कार्यकर्ते संभ्रमात आहेत.