अनुराग वैद्य
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका १५ ऑक्टोबरला होत असून मतदानाकरीता आता अवघ्या २२ दिवसाचा कालावधी शिल्लक राहीला आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात ऐरोली व बेलापुर असे दोन विधानसभा मतदारसंघ मोडत असून आघाडीमध्ये हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच वाट्याला येणार असल्याचे स्पष्ट आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे निर्माण झालेले विळ्या-भोपळ्याचे हाडवैर पाहता आणि मोदीपर्वानंतर सुरू झालेली परिवर्तनाची लाट पाहता विधानसभा निवडणूकीत आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जय-पराजयात कॉंग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे एव्हाना स्पष्ट होवू लागले आहे.
महाराष्ट्रातील अवाढ्य मतदारसंघात गणल्या जाणार्या बेलापुर मतदारसंघाचे पाच मतदारसंघात विभाजन झाले आणि त्यातूनच ऐरोली आणि बेलापुर या दोन मतदारसंघाचा जन्म झाला. अवाढव्य मतदारसंघात ना. नाईकांना आव्हान देण्याइतपत सक्षम नेतृत्व निर्माण न झाल्याने नाईकांचा वरकरिष्मा कायम राहीला. तथापि मतदारसंघाचे विभाजन झाल्याने आणि मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आटोक्यात आल्याने नवी मुंबईतील अनेक हवशा-गवशा आणि नवशांच्या राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाल्या. तेथूनच गणेश नाईकांच्या पर्यायाने बोनकोडेच्या राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण होण्यास सुरूवात झाली.
गतविधानसभा निवडणूकीत ऐरोली मतदारसंघात संदीप नाईकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंशी अटीतटीची लढत द्यावी लागली होती. नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्या ना. नाईकांबाबतही परिस्थिती काही वेगळी नव्हती. ना. नाईकांना निवडणूकीत लढत देताना भाजपाच्या सुरेश हावरेंसारख्या नवख्याने जेरीस आणले होते. संदीप नाईकांना अवघ्या ११९५७ मतांनी तर ना. गणेश नाईकांना अवघ्या १२८७३ मतांनी विजय मिळाला होता. नवी मुंबई हा ना. गणेशध नाईकांचा प्रारंभापासून बालेकिल्ला असतानाही गतविधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या विजय चौगुलेंनी आणि भाजपाच्या सुरेश हावरेंनी दिलेली लढत पाहिल्यावर नवी मुंबईचे राजकीय वारे परिवर्तनाच्या दिशेने वाहू लागल्याची चाहूल नवी मुंबईकरांना सर्वप्रथम त्याच काळात लागली होती. त्यानंतर एप्रिल २०१०मध्ये झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत मनसेच्या ६० जागांवरील उमेदवारांचा घोळ झाला नसता आणि मनसेच्या खर्या तगड्या कार्यकर्त्यांना त्यावेळी तिकीट मिळाली असती तर कदाचित महापालिका सभागृहात मनसेचा प्रवेश झाल्याचे उभ्या महाराष्ट्राला पहावयास मिळाले असते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईकरांनी शिवसेनेच्या ठाण्यातील उमेदवार असणार्या आमदार राजन विचारेंना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील स्थानिक उमेदवार डॉ. संजीव नाईकांपेक्षाही तब्बल ४७ हजारांची आघाडी मिळवून दिली आणि तेथूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबईतील शिलेदारांच्या पायाखालील वाळू सरकण्यास सुरूवात झाली. १५ ऑक्टोबरला होणारी निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसकरीता अस्तित्वाची लढाई आहे, तर मतदारांची असलेली परिवर्तनाची मानसिकता पाहता शिवसेना-भाजपाकरीता ऐरोली व बेलापुरमधील निवडणूक प्रतिष्ठेची होवून बसली आहे.
आघाडीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश असला तरी नवी मुंबईत ऐरोली व बेलापुरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला महायुतीच्या उमेदवारांशी स्वबळावरच लढत द्यावी लागणार आहे. पालिका स्तरावरील वितुष्ठ आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील वाढते हाडवैर पाहता आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची, नगरसेवकांची आणि पदाधिकार्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचे काम करण्याची मानसिकता नाही. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसशी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचे मुखपत्र असणार्या वर्तमानपत्रातून ‘नासका कांदा’ या स्तंभाच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या स्थानिक मातब्बर नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. या लिखाणातून जनजागृती तर सोडाच पण नवी मुंबईतील समस्य कॉंग्रेसी घटकांना चिथविण्याचे काम या नासक्या कांद्याने केले आहे.
ना. गणेश नाईकांनी आपल्या उभ्या हयातीत नवी मुंबईकरीता भरीव योगदान दिलेले आहे. संदीप नाईकांनी पालिका सभागृहात वावरताना २०१०-१५ या कालावधीत आणि त्यानंतर विधानभवनातून नवी मुंबईकरीता विकासकामांसाठी परिश्रम केले आहेत. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ऐरोली व बेलापुरातील विजयात महायुतीपेक्षाही खरा अडथळा हा कॉंग्रेसी नाराजीचाच बसणार आहे. गतनिवडणूकीत झालेली अटीतटीची लढत आणि सध्या सुरू असलेली परिवर्तनाची लाट व कॉंग्रेसी घटकांचा कडवट विरोध पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सर्व काही आता ‘आलबेल’ नसल्याचे सर्वसामान्यांच्याही लक्षात येवू लागले आहे.
नवी मुंबईत सौ. इंदूमती भगत, ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, अनिता शेट्टी, सिंधुताई नाईक, अमित पाटील, रंगनाथ औटी, विलास भोईर, मुलुखमैदानी तोफ असणारे दशरथ भगत यांच्यासह अन्य कॉंग्रेसी नगरसेवक त्यांच्या त्यांच्या प्रभागात मातब्बर आहेत. रविंद्र सावंत, संतोष सुतार, विजय वाळूंज, मनोज मेहेर यांच्यासारखे असंख्य कॉंग्रेसी पदाधिकार्यांनी आपल्या कामातून प्रभागाप्रभागात जनाधार वाढविण्याचे काम केलेले आहे. कॉंग्रेसी घटकांशी मनोमिलाफ करण्यात राष्ट्रवादीच्या धुरीणांना यश आले नाही तर आगामी निवडणूक निकाल काही वेगळाच लागण्याची चिन्हे आतापासूनच निर्माण होवू लागली आहेत.