अनुराग वैद्य
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता अवघ्या २० दिवसांचाच कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच आघाडी व महायुतीला जागावाटपाचा घोळ अद्यापि निस्तारता आलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढणार असली तरी उमेदवार यादी जाहीर करण्यात मनसेलाही पुढाकार घेता आलेला नाही. ‘ब्ल्यू प्रिंट’ नंतरच मनसे उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात मोडत असलेल्या ऐरोली व बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार असली तरी मनसेच्या उमेदवारांना कितपत मतदान पडेल याबाबत खुद्द मनसैनिक, मनसेचे पदाधिकारी सांशक आहेत. नवी मुंबईत मतदारांचा टक्का वाढला असला तरी मनसेच्या मतदानाचे काय अशी भीती मनसेच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेच्या गतनिवडणूकांमध्ये मनसेने नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा न करता केवळ बेलापुर विधानसभा मतदारसंघातच उमेदवार दिला होता. राजेंद्र महाले या मनसेच्या उमेदवाराने २००९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत १९ हजार ५०० पेक्षा अधिक मतदान घेतले होते. २००९ आणि २०१४ या पाच वर्षाच्या परिस्थितीत मनसे पक्षसंघटना वाढीस लागण्याऐवजी अधोगतीच्या दिशेनेच अधिक वाटचाल करत गेली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीतील मनसेच्या नवी मुंबईतील मतदानाच्या आकडेवारीवर नजर फिरविली तर नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघ मिळून मनसे १५ हजाराचादेखील आकडा ओंलाडण्याची शक्यता दिसत नाही.
नवी मुंबईत मतदारनोंदणी गांभीर्याने करण्यात सर्वपक्षीयांनी पुढाकार घेतल्याने मतदारांचा टक्का कमालीचा वाढला आहे. युवा मतदारांचा कल हा शिवसेना-भाजपाकडेच अधिक झुकल्याचे लोकसभा निवडणूकीत पहावयास मिळाले. पाच वर्षाच्या कालावधीत मनसेकडे जनाधार तर वाढलाच नाही, उलटपक्षी पक्षीय संघटनेत पदाधिकार्यांना व मातब्बर कार्यकर्त्यांनाही ओहोटी लागली. सध्या नवी मुंबई मनसेची छावणी गजानन काळे एकखांबी नेतृत्वावर अवलंबून आहे. शहर कार्यकारिणीपासून ते ग्रासरूटवरदेखील गटबाजी उघडपणे पहावयास मिळत आहे. मनसेचे इतर सेलदेखील अस्तित्वाकरीता संघर्ष करत आहे.
विद्यार्थी चळवळीत एकेकाळी असलेला मनविसेचा वकूबही अलीकडच्या काळात संपुष्ठात आला आहे. विद्यार्थी सेनेचे अधिकांश पदाधिकारी मनसेच्या कार्यकारिणीत दाखल झाल्याने मनविसे सध्या तरी थंडावल्याचे पहावयास मिळत आहे. मनकासे आणि मनवासे कोठेही पहावयास मिळत नाही. मनसे जनहितच्या घडामोडींनी जनसामान्यांमध्ये मनसेप्रती नाराजीचा सुर उमटू लागला आहे. मनसे जनहितचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा हाजी शाहनवाझ खान हे र्निदोष असल्याचा दावा करत असले तरी त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले आहे.
मनविसे सांस्कृतिक विभागाचा सध्या सुरू असलेला सावळागोंधळ अद्यापि संपुष्ठात आलेला नाही. इनमिन चार-पाच पदाधिकार्यांपुरती आणि नेरूळच्या उजाला हॉटेलच्या आवारापुरतीच मर्यादीत असलेल्या मनविसे सांस्कृतिकमध्ये गटबाजीची उधळण आजही सुरूच आहे. ऐरोली मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून शहर उपाध्यक्ष गजानन खबाले आणि बेलापुर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून शहर अध्यक्ष गजाजन काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून शनिवारी मनसेचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
मनसेत सध्या गजाजन काळे हा एकमेव नावाजलेला परिचित चेहरा असून नवी मुंबई मनसेच्या दोन्ही उमेदवारांना पडणार्या मतदानांवर गजानन काळेंच्या नेतृत्वाची अग्निपरिक्षा ठरणार आहे. गजानन काळे हे गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी संघटना एकहाती सांभाळत असून गतवर्षी शुक्रवारी, १२ जुलै २०१३ रोजी पक्षसुप्रिमो राज ठाकरेंनी गजानन काळेंकडे नवी मुंबई मनसेची धुरा सोपविली आहे. गजानन काळेंनी त्यांना अपेक्षित असलेली पक्षसंघटना बनविताना विद्यार्थी चळवळीतील त्यांच्या सहकार्यांचे मनसे कार्यकारिणीत पुर्नवसन केले होते.
शांतताप्रिय व काही अंशी मुर्दांड नवी मुंबईला जनआंदोलनाची सवय गजानन काळेंमुळेच लागली हे कोणालाही नाकारता येणार नाही. शालेय व महाविद्यालयीन समस्या, विद्यार्थी चळवळ. ऍडमिशन प्रक्रिया आदी घडामोडींनाही गती नवी मुंबईत गजानन काळेंच्याच सक्रियतेमुळे आली. नवी मुंबईत मतदानाचा टक्का वाढला असला तरी मनसेच्या मतदानाचे काय हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. २० दिवसाच्या कालावधीत प्रचारयंत्रणेच्या करामतीवर आणि मनसेच्या दोन्ही गजाजन या उमेदवारांच्या नेतृत्व कुशलतेवर मतदानाचा टक्का निश्चित होणार आहे.