* बहूरंगी लढत अटळ, उमेदवारांची अग्निपरिक्षा
अनुराग वैद्य
नवी मुंबई : घटस्थापनेच्या दिवशीच आघाडी आणि महायुतीचा घटस्फोट झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणामध्ये प्रचंड प्रमाणावर उलथापालथ झालेली आहे. शिवसेना-भाजपा, कॉंगेे्रस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या पाच पक्षांना स्वबळावर निवडणूका लढवाव्या लागणार असल्याने राजकारणात ‘घडलयं-बिघडलंय’चा प्रयोग रंगतदार ठरू पाहत आहे. नवी मुंबईतील बेलापुर मतदारसंघात या पाच पक्षांसोबत प्रकल्पग्रस्त आघाडीकडूनही मातब्बर उमेदवार उभा राहणार असल्याने बहूरंगी लढतीत सर्वाचीच कसोटी लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्र्रेसकडून ना. गणेश नाईक, भाजपाकडून सौ. मंदाताई म्हात्रे, मनसेकडून गजानन काळे, प्रकल्पग्रस्त आघाडीकडून डॉ. राजेश पाटील यांचा निवडणूक रिंगणातील सहभाग निश्चित झाला असून कॉंग्रेसने अद्यापि आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. ऐरोली मतदारसंघ आणि बेलापुर मतदारसंघ नवी मुंबई कार्यक्षेत्रात समाविष्ठ असले तरी दोन्ही मतदारसंघात जमिनआसमानचा फरक आहे. बेलापुर मतदारसंघ हा मिश्र भाषिकांचा आणि सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात परप्रातिंय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत शिवसेनेला बेलापुर मतदारसंघातून २५ हजारापेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती.
आघाडी आणि महायुतीचा काडीमोड झाल्याने गुरूवार रात्रीपासून राष्ट्रवादी कॉंग्र्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये जल्लोष साजरा होत असून ‘गुलाल आम्हीच उडविणार’ या घोषणा प्रत्यक्षात तसेच सोशल मिडीयातून दिल्या जात आहे. प्रत्यक्षात मतदारसंख्या आणि प्रांत-धर्म-जातनिहाय मतदारांची विभागणी केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे. पण हवेत गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या ध्यानात ही वस्तूस्थिती येणे आजमितीला अवघड आहे.
गतविधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर उमेदवार ना. गणेश नाईक यांना भाजपाच्या तुलनेने नवख्या असलेल्या व निवडणूकीपूर्वी अवघे सहा महिने अगोदर राजकारणात सक्रिय झालेल्या सुरेश हावरेंनी अटीतटीची लढत दिली होती. ना. गणेश नाईक १९८०पासून नवी मुंबईच्या सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रिय आहे. १९९०.१९९५, २००४,२००९ असे चार वेळा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनात बेलापुर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्या ना. गणेश नाईकांनी त्यावेळी अवघ्या १२८७३ मतांनी अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या सुरेश हावरेंना पराभूत केले. त्यावेळी कॉंग्रेसचे नामदेव भगत यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात ‘शिट्टी’ वाजवित १३ हजाराच्या आसपास मते मिळविली होती. मनसेच्या राजेंद्र महालेंनी १९५०० पेक्षा अधिक मतदान घेतले होते.
बेलापुर मतदारसंघात ना. गणेश नाईकांचे आजमितीला पारडे जड असले तरी ते केवळ कागदोपत्रीच पारडे जड आहे. लोकसभा निवडणूकीत कुकशेतचे सुरज पाटील यांच्यासारख्या सहा-सात जणांचा अपवाद वगळता बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कोणाकोणाचा ‘बडा घर अन् पोकळ वासा’ आहे, हे मतदानातूनच स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे अन्य पक्षांच्या तुलनेत या मतदारसंघात नगरसेवक अधिक असले तरी प्रभागात ते स्वत: भक्कम झाले, पण पक्षसंघटना भक्कम करण्यात त्यांना अपयश आल्याचे लोकसभा निवडणूकीत पहावयास मिळाले.
बेलापुर मतदारसंघात परप्रातिंय मतदारांचा असलेला निर्णायक प्रभाव हा परप्रातिंय मतदार अधिकांशपणे कॉंग्रेस आणि भाजपाकडेच झुकलेला पहावयास मिळतो. शिवसेनेने यावेळेस विजय नाहटांसारखा सुशिक्षित माजी आयएसआय अधिकारी चेहरा उतरवून सुशिक्षितांच्या भावनेला हात घातला आहे. त्यातच नाहटा हे जातीने जैन असून बेलापुर मतदारसंघात जैन धर्मियांचे प्रमाणही बर्यापैकी आहे. जैन समाज अखेरच्या टप्प्यात जातीच्या निकषावर नाहटांकडे झुकण्याची अधिक शक्यता आहे. प्रकल्पग्रस्त मतांचा विचार केल्यास सौ. मंदाताई म्हात्रे, डॉ.राजेश पाटील यांच्यात ही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसने संतोष शेट्टींना बेलापुरातून उमेदवारी दिल्यास दाक्षिणात्य मतदार अनायसेच कॉंग्रेसकडे झुकण्याची शक्यता अधिक आहे. कॉंग्रेसने वाशीगावातील अथवा नेरूळ गावातील भगतांना उमेदवारी दिल्यास प्रकल्पग्रस्तांच्या मतांमध्ये अधिकाधिक फाटाफूट पडू शकते.
मराठी भाषिक मतदारांवर नजर टाकल्यास त्यावर सर्वाधिक दावा हा शिवसेेनेचाच असतो. शिवसेनेखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, कॉंग्रेस, मनसे यांचा मराठी भाषिक दावेदारांवर दावा सांगितला जातो. विधानसभा निवडणूक ही व्यापक असली तरी मतदानाच्या अगोदरच्या तीन-चार दिवसामध्ये जातीच्या आणि प्रातांच्या नावावरदेखील मतदारांना भावनिक हाक देण्यात येते.
बेलापुर मतदारसंघात मतदारांवर नजर टाकली असता कोणाचाही अंदाज पटकन बांधणे अवघड आहे. आघाडी-युती तुटल्याने बेलापुरातील राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक हवेत असले तरी प्रत्यक्षात मात्र शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजपाच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच बदलत्या राजकीय समीकरणात अधिक धोका निर्माण झालेला आहे. मतदानाला अद्यापि १९ दिवसाचा अवकाश असून कोण कोणाला फोडण्यात यशस्वी होते, कोण-कोणाला कितपत ‘मॅनेज’ करतेय आणि कोण-कोणावर कितपत निष्ठा-श्रध्दा ठेवतेय यावर बेलापुरचा निकाल अवलंबून असणार आहे. मतदारांच्या मानसिकतेचा जवळून अंदाज पाहिल्यास आजच्या घडीला बेलापुर राष्ट्रवादी कॉंग्रेसकरीता आलबेल नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.