संतोष शिर्के
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी बेलापुर विधानसभा मतदारसंघातील बहूरंगी लढत ना. गणेश नाईकांना अडचणीत आणण्याची शक्यता असून निवडणूक रिंगणात उभे असलेले मातब्बर उमेदवार पाहता मतमोजणीत कोणकोणाची पतंग कापणार याचा अंदाज येणे कठीण होवून बसले आहे. राजकीयदृष्ट्या कोंडी झाल्याने सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने बेलापुर मतदारसंघातील समीकरणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होवून बसली आहे.
राष्ट्रीय कॉंग्रेसकडून सिडको संचालक व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस नामदेव भगत यांना तर भाजपाने लढावू आक्रमक नेत्या सौ. मंदाताई म्हात्रेंना, मनसेकडून शहर अध्यक्ष गजानन काळेंना शिवसेनेकडून माजी प्रशासकीय अधिकारी उपनेते विजय नाहटांना, प्रकल्पग्रस्त आघाडींकडून डॉ. राजेश पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. ना. गणेश नाईकांना निवडणूक रिंगणात एकाचवेळी तब्बल पाच तगड्या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे.
गणेश नाईक व नामदेव भगत बगळता अन्य कोणत्याही उमेदवाराला यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव नाही. बेलापुर मतदारसंघातील भाषिय, जातीय अन् प्रातिंय मतदारांच्या समीकरणाचा विचार केल्यास आजमितीला राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही निवडणूक सोप्पी नसल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. बेलापुरात होवू घातलेली निवडणूक नेत्यांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांकरीता प्रतिष्ठेची झाल्यास प्रचारात कमालीची चुरस वाढीस लागणार आहे. कॉंग्रेस, भाजपा, मनसे, शिवसेना अन् प्रकल्पग्रस्त आघाडी सर्व ताकदीनिशी उतरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था सुरूवातीच्या काळात चक्रव्यूहात अडकल्यासारखी झालेली आहे. बेलापुरातील सुशिक्षित मतदारांची लाक्षणिक संख्या पाहता शिवसेनेने आयएसआय अधिकारी असलेल्या विजय नाहटांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. बेलापुर मतदारसंघात जैन धर्मियांची असलेली मते पाहता शिवसेनेच्या विजय नाहटांसाठी ती जमेची बाजू ठरणार आहे. बेलापुर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजीव नाईकांपेक्षा शिवसेनेच्या राजन विचारेंना २५ हजारापेक्षा अधिक मताची आघाडी मिळाली होती. बेलापुर मतदारसंघातील परप्रातियांची संख्या व अमराठी भाषिकांचा टक्का मोठ्या प्रमाणावर आहे. परप्रातियांची व अमराठी भाषिकांची पसंती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपा व कॉंग्रेसला अधिक असते. गतविधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या नामदेव भगतांनी बंडखोरी करत १३ हजाराच्या आसपास मतदान घेतले होते. यावेळी ते अधिकृतपणे कॉंग्रेसकडून निवडणूक रिंगणात सहभागी झाले आहेत. भाजपाकडून सौ. मंदाताई म्हात्रेंसारखा मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला असून नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम सभागृहात सौ.मंदाताई म्हात्रे या नगरसेविका होत्या. गेली दोन दशकाहून अधिक काळ त्या नवी मुंबईच्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यरत असतानाही गणेश नाईकविरोधक अशी प्रतिमा त्यांनी नवी मुंबईपासून ते थेट प्रदेश पातळीपर्यत निर्माण केली होती. नवी मुंबईत आगरी-कोळी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे आगरी-कोळी भवन हे कॉंग्रेस उमेदवार नामदेव भगत यांच्या परिश्रमाचे प्रतिक मानले जात आहे. सिडको संचालकपदावरून काम करताना नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. नवी मुंबई मराठी भाषिक मतदारांवर शिवसेना-मनसेचा प्राधान्यांने दावा केला जात असून नामदेव भगत, डॉ.राजेश पाटील, सौ.मंदाताई म्हात्रे, ना. गणेश नाईक यांच्यातच ग्रामस्थांची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. बेलापुर मतदारसंघातील गावागावामध्ये ग्रामस्थांना शिवसेनेचे कमालीचे आकर्षण असून शिवसेनेचे अधिकांश पदाधिकारी गाववालेच पहावयास मिळत आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर गेल्या काही वर्षात सातत्याने जनआंदोलन छेडून डॉ. राजेश पाटील हे अलीकडच्या काळात प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व म्हणून नावारूपाला आलेले आहे. शिवसैनिक म्हणून कार्यरत असणारे डॉ. राजेश पाटील हे शिवसेना संघटनेत कालपरवापर्यत शिवसेनेत नवी मुंबई शहरप्रमुख म्हणून कार्यरत होते.
मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळेंना उमेदवारी देवून पंचरंगी, बहूरंगी लढत अधिक चुरशीची होण्यास हातभार लावला आहे. मनसेला लोकसभा निवडणूकीत फारसा जनाधार मिळाला नसला तरी विधानसभा निवडणूकीत काही वेगळेच चित्र पहावयास मिळण्याची शक्यता आहे. गजानन काळे नवी मुंबई शहरप्रमुख म्हणून कार्यरत असले तरी ऐरोलीच्या तुलनेत बेलापुरात काळेंची एक वेगळीच ताकद आहे. काळेसमर्थक कार्यकर्त्यांचे व मनसेच्या पदाधिकार्यांचे बेलापुरात बर्यापैकी जाळे विखुरलेले आहे. गजानन काळे हे स्वत: निवडणूक रिंगणात उतरल्याने मनसे कार्यकर्त्यांची व पदाधिकार्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभेत अधिकाधिक मतदान खेचण्याची मनसेने रणनीती आखली असून लोकसभेनंतर पडद्याआडून जोरदार झालेली मोर्चेबांधणी कोणाची समीकरणे बिघडवणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नवी मुंबईला जनआंदोलनाची सवय लावणारे गजानन काळे प्रसिध्दी माध्यमातून नवी मुंबईकरांच्या चांगलेच परिचयाचे झालेले आहेत.
परप्रातिंय, अमराठी भाषिक मतदारांवर कॉंग्रेसचा-भाजपाचा प्रभाव, ग्रामस्थ मतदारांची गणेश नाईक, नामदेव भगत, डॉ. राजेश पाटील, सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यात होणारी मतविभागणी, जैन व सुशिक्षित मतदारांमध्ये शिवसेनेच्या विजय नाहटांचे वाढते आकर्षण, मराठी मतदारांवर शिवसेना-मनसेचा दावा पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हक्काचे मतदार कोणते याबाबत पहिल्या टप्प्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकांचे असलेले संख्याबळ पाहता हे फसवे चित्र आहे. खुद्द उपमहापौरांना त्यांच्या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी मिळवून देता आलेले नाही. अपवादात्मक सुरज पाटीलसारखा एकाद-दुसरा नगरसेवक सोडला तर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चित्र आता आलबेल राहीलेले नाही. महिला बचत गटांवर सर्वच पक्षांची करडी नजर असल्याने त्यांना मॅनेज करणे सर्वांनाच अवघड होवून बसणार आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात झालेले महिलांना साडीवाटप हा नवी मुंबईत चर्चेचा विषय झाला असून सर्वपक्षीयांनी आपल्या पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’च्या सूचना दिल्या आहेत.