अनुराग वैद्य
नवी मुंबई : बेलापुर पट्टीतच नव्हे तर नवी मुंबई , ठाणे ,पनवेल-उरण पट्टीतील ग्रामस्थांमध्ये आदराचे स्थान असलेल्या बामणदेवाच्या नावाचीच शनिवारी सर्वत्र पुन्हा एकवार चर्चा झाली. बामणदेव मार्गावरून सारसोळे ग्रामस्थांची गेल्या काही वर्षापासून प्रशासनाकडून अन् राजकारण्यांकडून सातत्याने राजकीय रंग देत जगजाहीर उपेक्षा संतापाची बाब बनली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेलापुरचे उमेदवार शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी शनिवारी बामणदेवाचे दर्शन घेवूनच उमेदवारी अर्ज भरल्याने ग्रामस्थांमध्ये गजानन काळेंच्या नावाचीच दिवसभर चर्चा सुरू होती.
पामबीच मार्गापासून सारसोळे खाडीअर्ंतगत भागात असलेल्या बामणदेव मार्गाची चर्चा अन् बामणदेव मार्गाबाबत सुरू असलेले राजकारण हा विषय आता नवी मुंबईची कार्यकक्षा ओंलाडून ठाणे, पनवेल, उरणपर्यतही जावून पोहोचला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग ६९ सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा विभागातून निवडणूक लढविणार्या सर्वपक्षीय उमेदवारांनी तसेच अपक्ष उमेदवारांनीही बामणदेव मार्गाचा आपल्या वचननाम्यात उल्लेख केला होता. तथापि पालिका निवडणूकीनंतर पावणेपाच वर्षात बामणदेव मार्गाबाबत काहीही न केल्याचे सारसोळेच्या ग्रामस्थांच्याही निदर्शनास आलेले आहे. कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस,कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व सारसोळेचे युवा ग्रामस्थ मनोज मेहेर यांनी बामणदेव मार्गासाठी गेल्या सात वर्षात महापालिका प्रशासन व जनता दरबारात सातत्याने पाठपुरावा करूनही कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, उलटपक्षी मनोज मेहेरच्या निवेदनांना आजही केराची टोपली दाखविली गेली. मनोज मेहेर कॉंग्रेसचा असल्याने बामणदेव मार्गाचे काम रखडले असल्याची चर्चा राजकारण्यांमध्ये व प्रशासनामध्ये आजही सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हेदेखील बामणदेवाचे निस्सीम भक्त असून गेल्या काही वर्षापासून महाशिवरात्रीच्या दिनी होत असलेल्या बामणदेवाच्या भंडार्यात गजानन काळे भक्तिभावाने सहभागी होत आहे. पावसाचे दिवस असून बामनदेवाच्या मार्गावर सहा ते आठ फूट जंगली गवत वाढले आहे. खाडीअर्ंतगत भागात चिखल असून शनिवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरावयास जाण्यापूर्वी सहा ते आठ फूटी जंगली गवतातून चिखल तुडवित पामबीच मार्गापासून सुमारे दीड किलोमीटर अर्ंतगत भागात मनसेचे उमेदवार गजानन काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी बामणदेवाचे दर्शन घेतले. बेलापुरच्या निवडणूक रिंगणात तब्बल चार ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी समाजाचे मातब्बर उमेदवार असतानाही उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कोणाला एकालाही बामणदेवाचे दर्शन घ्यावेसे वाटले नाही. पण बहूजन वर्गातील चळवळी, जनआंदोलनात रमलेल्या गजानन काळेंनी मात्र बामणदेवाचे दर्शन घेवूनच उमेदवारी अर्ज भरण्यास प्राधान्य दिले. बामणदेवाचे दर्शनासाठी जंगली गवत आणि चिखल तुडवित येणार्या गजानन काळेंचीच आज नवी मुंबईतील ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.