अनुराग वैद्य
नवी मुंबई : उध्दव ठाकरेंचा दुटप्पीपणा महाराष्ट्राला पहावयास मिळाला आहे. सांगतात की, पंकजा मुंडे माझी बहीण आहे म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. मग राजसाहेब कोण होते अशा प्रश्न विचारून शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका करून मनसेचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष गिरीश दहाणूरकर यांनी मनसेचे नवी मुंबईतील उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसेच्या आगामी प्रचाराची रूपरेषा स्पष्ट केली.
मनसेचे बेलापुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या प्रचारार्थ रविवारी सांयकाळी नेरूळ सेक्टर १२ मधील देवाडीगा हॉलमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबईत पराभव समोर दिसू लागला की अफवांच्या बाजारांना ऊत येत असल्याचे सांगत दहाणूरकर पुढे म्हणाले की, उद्या गजानन काळे मॅनेज झाले, गजानन खबाले मॅनेज झाले, अशा अफवा मनसेच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी जोरदार सुटतील. अशा अफवांना बळी पडू नका. कोणी मॅनेज होत नाही. मनसैनिकांचे खच्चीकरण करण्यासाठीच अफवा पसरत असल्याने निवडणूक काळात अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन दहाणूरकर यांनी केले.
मनसेने पदाधिकार्यांनाच तिकीट दिल्या आहेत. काम करणार्या कार्यकर्त्यांनाच राजसाहेबांनी तिकीट दिल्या आहेत. खूप दिवस गणेशाने नवी मुंबईची सेवा केली, आता या गणेशाचे विसर्जन करा आणि ऐरोली, बेलापुरात गजाननाची प्रतिष्ठापना करा. गजानन काळेंचा आपला फार पूर्वीपासून विद्यार्थी चळवळीमुळे परिचय आहे. गजाजन काळे या सर्वसामान्य माणसांने स्वत:ची विद्यार्थी संघटना उभारली होती. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे जाळे उभारले होते. मनसेत आल्यावरही विद्यार्थी संघटना उभारून त्यानंतर राजसाहेबांनी शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही सक्षमपणे सांभाळल्याचे सांगत जे नुकतेच पक्ष सोडून गेले, त्यांचाही धानुरकरांनी खरपुस समाचार घेतला.
राजसाहेबांनी ब्ल्यू प्रिंट सादर केली, त्यापैकी नवी मुंबईत काहीही पहावयास मिळत नसल्याची खंत व्यक्त करून मनसेचे उमेदवार शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील सत्ताधार्यांच्या कारभारावर टीका करत कारभाराची लक्तरे मांडली. नवी मुंबई महापालिका मुख्यालयाची ईमारतही लगेच गळायला सुरूवात झाली. रंगमंचावरचे सर्व कलाकार नवी मुंबईच्या राजकारणात आढळतात. निवडणूका आल्यावर काही मातब्बर राजकारणी माथाडींची गळाभेट घेतात आणि पुढे गेल्यावर डेटॉलने आपले हात धुतात. सहा वर्षे विधानपरिषदेवर आमदारकी मिळूनही काहींना नवी मुंबईकरीता काहीही करता आले नाही. महाराष्ट्रात जेवढी आंदोलने झाली नाहीत, तेवढी मनसेमधून जनआंदोलने नवी मुंबईत झाली आहेत. माझ्यासह कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. आज राजसाहेबांनी मला उमेदवारी दिलेली नसून जनआंदोलने करणार्या आणि पक्षावर कडवट निष्ठा ठेवून पक्षसंघटना वाढविणार्या सर्व कार्यकर्त्यांनाच माझ्या रूपाने उमेदवारी दिली आहे. नवी मुंबईत मनसे संपली, मनसेला खिंडार असे म्हणणार्यांनी या मेळाव्याची गर्दी पाहा, एका दिवसाच्या आयोजनाचे हे यश असल्याचे सांगत नवी मुंबईतील मनसेमधील उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम गजानन काळेंनी आपल्या भाषणात केले.
शहर उपाध्यक्ष विनोद पार्टे, महिला पदाधिकारी आरती धुमाळ, ऍड. भाऊ मोरे, शहर सचिव ऍड. कौस्तुभ मोरे आदींनी समयोचित भाषण करताना निवडणूकीत करावयाचे काम याबाबत मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गलुगडे यांनी केले.