सुजित शिंदे
नवी मुंबई : स्वच्छ, सुंदर, हरीत नवी मुंबई ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सकारात्मक पावले उचलली जात असताना याकामी शहरातील स्वयंसेवी संस्था, मंडळे, वृक्षप्रेमी नागरिक यांचेही सर्वोतोपरी सहकार्य लाभत असते. पर्यावरणाचा समतोल राखणे व संवर्धन करणे याकरीता शहरातील वृक्षसंख्येची माहिती संकलीत करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्या वतीने जी.आय.एस., जी.पी.एस. सारख्या अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा उपयोग करून वृक्षगणना हाती घेण्यात आली आहे.
शनिवारी पामबीच मार्गावरील किल्ले गांवठाण येथे महापालिका मुख्यालयासमोरील बाजूस वृक्षप्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी सुरू असलेली वृक्षगणना पद्धत प्रत्यक्ष अवलोकन करून जाणून घेतली व यामध्ये मौलिक सूचना दिल्या. याप्रसंगी सह शहर अभियंता जी.व्ही.राव, उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता संजय देसाई व प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मे.सार आय.टी.रिसोर्सेस प्रा.लि. या वृक्षगणनेकामी अनुभवी संस्थेच्या माध्यमातून विभागनिहाय संपूर्ण महापालिका क्षेत्रात ही वृक्षगणना होणार असून यामध्ये वृक्षांचा प्रकार, त्यांचे शास्त्रीय नाव, वृक्षजातीची नोंद, शास्त्रीय वर्गीकरण, खोडाचा व पर्ण फुलोर्याचा परीघ, अंदाजित उंची तसेच त्याचे स्थान अशी विविध माहिती संकलीत केली जाणार आहे. त्यानुसार शहरातील निसर्गवैभवाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणार आहे.
याकरीता जी.आय.एस., जी.पी.एस. सारखे वेबबेस अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने वृक्षांच्या जागेची गुगल मॅपवर अक्षांश-रेखांशासह अचूक माहिती, वृक्षांचे वर्गीकरण व व्यवस्थापन, शहरातील जैव विविधता, शहराची जनसंख्या व वृक्षव्याप्ती यांचे प्रमाण, वृक्षांची प्रकारानुसार सद्यस्थिती यांची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध होईल. त्यास अनुसरून भविष्यकालीन नियोजन करणे शक्य होणार आहे त्याचप्रमाणे वृक्षछाटणी / वृक्षतोड करावयाची परवानगी देताना त्याची वेबबेस नोंद तपासणे व त्यानुसार नियंत्रण ठेवता येणार आहे. त्याचसोबत एखाद्या विभागातील वृक्षसंख्येत झालेली घट किवा वाढ याचीही तुलनात्मक माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय महानगरपालिकेच्या वतीने शहरात चार मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात आलेल्या सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्राद्वारे हवेतील विविध घटकांचे मापन करण्यात येते. त्यामुळे हवेतील प्रदूषक घटकांचे स्वरूप व प्रमाण कळते. त्यानुसार आवश्यक विभागात कार्बनशोषण करणारी वृक्षसंपदा लागवड व हरितपट्टा विकासाच्या दृष्टीनेही ही माहिती लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे या प्रणालीद्वारे वृक्षगणना ही केवळ माहिती सकलनाच्या दृष्टीनेच नव्हे तर वृक्षसंपदेच्या व्यवस्थापनासाठीही उपयुक्त असणार आहे.
नवी मुंबई हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून अनेकदा रस्ते निर्मिती, इमारत बांधकामाकरीता वृक्ष तोडणे गरजेचे भासते तसेच काही झाडे धोकादायक स्थितीत असल्यानेही तोडणे आवश्यक असते. मात्र झाडे तोडण्यापेक्षा ती स्थलांतरीत करून योग्य जागी पुर्नस्थापित करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अधिक लक्ष देण्यात येते. या स्थलांतरीत वृक्षांच्या मुळांची वाढ चांगल्याप्रकारे होण्यासाठी रूटेक्स, कार्डेक्स अशा संप्रेरकांचा वापर करण्यात येतो त्यामुळे स्थलांतरीत झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण उत्तम आहे. त्याचप्रमाणे झाडे काढण्यात येतात अशा ठिकाणी योग्य स्वरूपात वृक्षारोपण करण्याकडेही लक्ष देण्यात येते. शक्यतो वृक्षतोड होणार नाही याकडे काळजीपुर्वक लक्ष देण्यात येत असून अनधिकृत वृक्षतोड करणार्या व्यक्ती / संस्था यांच्याविरोधात कायदेशीररित्या न्यायालयीन दावे दाखल करण्यात आले आहेत. अशा धडक कारवाईमुळे अनधिकृत वृक्षतोडीवर प्रतिबंध बसला असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरातील वृक्षसंपदा ही आरोग्य संपन्नतेच्या दृष्टीने महत्वाची असल्याने बेकायदा वृक्षतोड होऊ नाही यासाठी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी सुंदर व हरीत नवी मुंबई ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने वृक्षगणना ही एक आवश्यक गोष्ट असून याद्वारे संकलीत होणार्या माहितीचा उपयोग वृक्षसंपदेच्या भविष्यकालीन नियोजनासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले आहे.
येथील नागरिकांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही हे शहर आपुलकीचे वाटेल अशा रितीने जैविक विविधतेवर भर देऊन निसर्गसंपन्न शहराची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे नियोजन आहे. यादृष्टीने फुलपाखरू उद्याने विकसित करण्यासाठी तशा प्रकारच्या वृक्षरोपांची निवड व रोपण तसेच पक्ष्यांना खाण्यायोग्य फळझाडांचे रोपण व फुलझाडांची लागवड अशा बाबींवर भर देण्यात येईल त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या निवार्याच्या दृष्टीने योग्य स्वरूपात ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने घरटी उभारण्याचे नियोजन आहे.
तरी नागरिकांनी आपल्या संस्था, सोसायटी, उद्योगसमुह, घरांचा परिसर येथे वृक्षगणनेसाठी येणार्या प्रगणकांना वृक्षगणना करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे आणि शहराच्या स्वच्छ, सुंदर व हरीत विकासात आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी केले आहे.