अनुराग वैद्य
नवी मुंबई : मराठीबहूल भाषिकांचा सर्वाधिक भरणा असलेल्या नेरूळ पश्चिमेतून होणार्या मतदानावर बेलापुर विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षीय उमेदवारांची नजर असून राष्ट्रवादी कॉंग्रेसची मात्र नेरूळ पश्चिम परिसरातून मतदान खेचताना खरी कसोटी लागणार आहे. प्रचाराचा आतापर्यतचा रागरंग पाहता शिवसेना, कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस , भाजपा, मनसे अशा टप्प्यात मतदारांचा कौल राहणार असल्याचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
प्रभाग ६८ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका स्नेहा पालकर यांच्या प्रभागापासून नेरूळ पश्चिम परिसराला सुरूवात होते आणि नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांच्या प्रभाग ८८ पर्यत नेरूळ पश्चिमचा परिसर विखुरलेला आहे. नेरूळ पश्चिम परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सौ. स्नेहा पालकर, नारायण पाटील, सुरज पाटील, अशोक गावडे , शिवसेनेचे रतन नामदेव मांडवे, दिलीप घोडेकर, सतीश रामाणे आणि कॉंग्रेसच्या सौ. इंदूमती भगत अशा आठ नगरसेवकांचा समावेश असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, शिवसेनेचे तीन, कॉंग्रेसचा एक असे नगरसेवकांचे समीकरण आहे.नगरसेवकांच्या संख्याबळात आठमध्ये चार असे समीकरण असले तरी दरम्यानच्या कालावधीत पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नेरूळ पश्चिममधून अधिकाधिक मतदान काढणे प्रतिष्ठेचा विषय बनले आहे. लोकसभा निवडणूकीत कुकशेतचे सुरज पाटील यांचा अपवाद वगळता मोदी लाटेत कोणत्याही प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला संघर्ष करणे शक्य झालेे नाही. महापालिका निवडणूकादेखील पाच-सहा महिन्यावर आल्याने त्या त्या प्रभागातील इच्छूकही आपली ताकद यानिमित्ताने आजमावू लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढील अडचणी वाढीस लागल्या आहेत.
प्रभाग ६८ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सौ. स्नेहा पालकर या प्रभागातून तीन वेळा विजयी झाल्या असल्या तरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे चित्र आजतागायत निर्माण झालेले नाही. मतविभागणीमुळे स्नेहा पालकरांच्या नगरसेवकपदाला तडा गेला नाही. गतवेळीदेखील कॉंग्रेसचे तिकीट न मिळाल्याने कॉंग्रेसच्या रविंद्र सावंत यांनी बंडखोरी करत शिवसेना व कॉंग्रेसची मते खेचल्याने निसटता विजय मिळविण्यात स्नेहा पालकरांना यश आलेे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत या प्रभागात शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रभाव अधिक पहावयास मिळत आहे. शिवसेनेेचे विभागप्रमुख गणेश घाग याच मतदारसंघातील असल्याने विजय नाहटांना मताधिक्य देणे घाग यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, मागील उमेदवार कृष्णा धुमाळ, शाखाप्रमुख व अन्य स्थानिक सक्रिय मातब्बरांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असल्याने या प्रभागातून मोठ्या मताधिक्क्याची शिवसेनेला अपेक्षा आहे. कॉंग्रेसकडेही या प्रभागात बर्यापैकी जनाधार असुन रविंद्र सावंत यांचे या प्रभागात बर्यापैकी प्रस्थ आहे.गतपालिका निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. कृष्णा पुजारी यांनाही सेक्टर ४ मध्ये कॉंग्रेससाठी काम करताना आपली ताकद पक्षाला दाखवून द्यावी लागणार आहे.
नेरूळ सेक्टर ८ चा समावेश असलेल्या प्रभाग ७० मध्ये शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे कार्यरत आहेत. मांडवेंचे कार्यकर्ते आपल्याकडे वळविण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातत्याने सुरू असला तरी मांडवेंच्या पाठीशी असलेला जनाधार मात्र वळविण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आजतागायत यश आले नाही. माजी नगरसेवक व ज्येष्ठ अनुभवी नेतृत्व नंदू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस वाटचाल करत असून गणेश रसाळ, अनिल लोखंडे, साळुंखे व अन्य मातब्बरांचाही राष्ट्रवादीत समावेश असला तरी मांडवेंच्या जनसंपर्कामुळे या मतदारसंघात विधानसभा निवडणूकीतही शिवसेनेला पिछाडीवर टाकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्य होणार नाही. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप तिडके यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केल्याने त्याचा फटका शिवसेनेएवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच या प्रभागात अधिक बसण्याची शक्यता आहे. दिलीप तिडके यांचा या भागात बर्यापैकी जनसंपर्क असून त्यांच्या पत्नी या प्रभागात नगरसेविका होत्या. तिडके भाजपात गेल्याने शिवसेनेएवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच मतांमध्ये फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे.
नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावचा भरणा असलेल्या प्रभाग ६९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नारायण पाटील हे तीनवेळा निवडून आलेले आहे. या यशात राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा नारायण पाटील यांच्या व्यक्तिगत जनसंपर्काचाच अधिक वाटा आहे. तिसर्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून नारायण पाटील निवडून आले होते. या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षसंघटना खिळखिळी आहे. नारायण पाटील यांच्या आजारपणामुळे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस बर्याच अंशी बँकपूटवर गेली आहे. पक्षीय प्रभावाचा विचार करता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत कॉंग्रेस व शिवसेनेचा या ठिकाणी अधिक प्रभाग पहावयास मिळतो. कॉंग्रेेसमध्ये मनोज मेहेर, परशूराम मेहेर, दिलीप आमले, संजय धोतरे, वेखंडे, कैलास म्हात्रे, सुनील पाटील, राजाराम सोहनी अशा मातब्बरांचा या भागात भरणा असल्याने व कॉंग्रेसचे उमेदवार स्वत: नामदेव भगत हे कोळी समाजाचे असल्याने या प्रभागातून कॉंग्रेसला दणदणीत मताधिक्याची अपेक्षा आहे. शिवसेनेचे शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांनी प्रभागातील प्रचारात आघाडी घेतली असून इतरांच्या तुलनेत लगाडे यांच्या माध्यमातून शिवसेनेकडून सातत्याने प्रभाग पिंजून काढला जात आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख गणपत शेलार यांनाही या प्रभागात मानणारा विशिष्ठ वर्ग आहे.मनसेने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुक लढवित शेलारांनी आपले उपद्रवमूल्य स्पष्ट केले होते. शेलार आता शिवसेनेत असल्याने शेलार-लगाडे जोडीवर शिवसेनेचे मतदान या प्रभागात अवलंबुन असणार आहे. गावामध्ये प्रमोद जोशी यांची त्यांना साथ लाभणार आहे. मनोज मेहेर यांनी गेल्या पावणे पाच वर्षात सारसोळे गावच्या ग्रामस्थांकरीता आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांकरीता नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन ते पालकमंत्र्यांचा जनता दरबार परिश्रम केल्याने सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसर कॉंग्रेसला फोडणे फारसे अवघड जाणार नाही.
मोदी लाटेतही प्रभाग ७६ मधील जनतेने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सुरज पाटील यांची साथ दिली होती. सुरज पाटील यांची कामे व घरटी जनसंपर्क पाहता या प्रभागात अन्य पक्षांना मते खेचण्यासाठी परिश्रम करावे लागतात. विधानसभेला स्वत: नामदेव भगत उभे असल्याने किशोर पाटील हे कुकशेतमधून किती मते खेचतात हे १९ तारखेलाच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या बबन पाटील व शिवाजी महाडीक हे या प्रभागातील शिवसेनेचे स्थानिक नेते असले तरी त्यांना या प्रभागात शिवसेना वाढविण्यात यश आले नसल्याचे मतदानावरून पहावयास मिळते. माजी हॅट्ट्रीकवीर नगरसेवक रमेश शिंदे नेरूळ सेक्टर १० मधील कुकशेत प्रभागात मोडणार्या तेरणा विद्यालयासमोरील गृहनिर्माण सोसायटीतील किती मतदान फोडतात यावर नाहटांना या प्रभागातील मतदान होण्याची शक्यता आहे. बबन पाटील यांनी कुकशेत सांभाळले आणि महाडीक-शिंदेनी तेरणासमोरील सोसायट्या सांभाळल्या तर या प्रभागातून नाहटांना बर्यापैकी मतदान मिळणे शक्य होणार असल्याचा आशावाद शिवसैनिकांकडून व्यक्त केल जात आहे.
प्रभाग ७५ मध्ये नेरूळ सेक्टर १० परिसराचा समावेश होत असून या ठिकाणी शिवसेनेच दिलीप घोडेकर नगरसेवक आहेत. या प्रभागातून तीन वेळा नगरसेवक झालेल्या रमेश शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. या प्रभागातून पालिका निवडणूक लढविताना नामदेव भगत यांनी १५००च्या आसपास मतदान घेतल्याने या प्रभागातून कॉंग्रेसला चांगल्या मतदानाच्या आशा आहेत. या प्रभागात शिवसेना,कॉंग्रेस आणि त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस असे चित्र असले तरी मनसेचीदेखील या प्रभागातील ताकद नाकारता येणार नाही. राजेश भोर, जयसिंगराव चवरे, प्रकाश खलाटे आदीच्या परिश्रमावर राष्ट्रवादीचा जनाधार अवलंबून असणार आहे. तुकाराम कदम, नवनाथ चव्हाण आणि नामदेव भगत यांचा प्रत्यक्ष जनसंपर्क यामुळे कॉंग्रेस येथून आघाडी घेणार असल्याचा दावा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे अमर पाटील, अर्जुन चव्हाण, अजय सुपेकर यांनीही मनसेकरीता कंबर कसली आहे. गतपालिका निवडणूकीत मनसेला येथून चांगले मतदान झालेे होते.
नेरूळ गाव प्रभाग ७८ हा प्रभाग नामदेव भगत यांच्यासाठी बालेकिल्लाच राहीला आहे. या प्रभागातून सौ. इंदूमती भगत सलग तीन वेळा विजयी झाल्या आहेत.नामदेव भगत हे नेरूळ गावचेच सुपुत्र व जावईच आहेत. आपला मुलगा व जावई विधानसभेला उभा असल्याने भावनिकतेचा कल पाहता नामदेव भगत यांना नेरूळ गावातून मताधिक्य मिळणे अपेक्षित आहे. नेरूळ गावातून शिवसेनेची खरी मदार उपजिल्हाप्रमुख के.एन.म्हात्रे आणि गिरीश म्हात्रे यांच्यावरच आहे. गोपीनाथ ठाकूर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष याच प्रभागातील आहेत. गणेश भगत आणि रविंद्र भगत यांचे उपद्रवमूल्य नेरूळ गावात किती आहे हे मतदानानंतरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला समजून येईल.
प्रभाग ७७ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१८ आणि २४च्या काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. हा प्रभाग सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला असून लोकसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवाराला या प्रभागातून दणदणीत मताधिक्य मिळाले होते. शिवसेना शहरप्रमुख विजय माने, विभागप्रमुख सुनील हुंडारे, नगरसेवक सतीश रामाणे, काशिनाथ पवार अशी मातब्बरांची फौज स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या प्रभागात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश भगत या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासुन सक्रिय आहेत.पक्षाकडून त्यांना सातत्याने रसदही पुरविण्यात आली आहे. या प्रभागातून कॉंग्रेसदेखील राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक मतदान खेचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत नामदेव भगत यांनी १४९९ मते खेचली होती. या प्रभागातील परप्रातिंय मतदान कॉंग्रेसकडे झुकले जाण्याची शक्यता आहे.
नेरूळ पश्चिमेचे शेवटचे टोक प्रभाग ८८ हा उपमहापौर अशोक गावडेंचा प्रभाग. लोकसभा निवडणूकीत येथून शिवसेनेला आघाडी मिळाली होती.प्रभागातील सेक्टर २४ व२८ हा भाग नेरूळ पश्चिम परिसरात मोडत आहे. या प्रभागातील मतदानावर अशोक गावडे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस या प्रभागात किती मतदान घेते याचा कल अद्यापि स्पष्ट झालेला नाही.
नेरूळ पश्चिमेला मोडणार्या आठ प्रभागात कुकशेतचा प्रभाग वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसला अन्य प्रभागात फारसे सुखावह चित्र दिसत नाही. परभाषिक मतदारांना १९९९ नंतर प्रथमच कॉंग्रेसचा पंजा उपलब्ध झाल्याने ते कॉंग्रेसक डे झुकण्याची शक्यता आहे. भाजपादेखील परभाषिकांवर अवलंबून आहे.भाजपा उमेदवार सौ.मंदाताई म्हात्रे या सारसोळे आणि नेरूळ गावातून काही प्रमाणात मतदान खेचण्याची शक्यता आहे. नेरूळ पश्चिमेला असलेला जैन समाज नाहटांनाच मदत करण्याची शक्यता आहे.शिवसेनेची नेरूळ पश्चिमेला ताकद अधिक आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणूक नेरूळ पश्चिमेला प्रतिष्ठेची होवून बसली आहे.शिवसेना, मनसे, कॉंग्रेस, भाजपा प्रभागाप्रभागातील घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून असल्याने महिला बचत गटांना आमिषे, गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना आमिषे, युवकांना सहली वा पार्ट्या या प्रकारांना पाहिजे त्या प्रमाणात खतपाणी घालणे या निवडणूकीत सर्वपक्षीयांना अवघड होवून बसले आहे.