नवी मुंबई : एप्रिल २०१५ ला होणार्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम वाजण्यास आतापासूनच सुरूवात झालेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेकांनी आपले गाठोडे बांधलेही असून भाजपाप्रवेशासाठी महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीची त्यांना प्रतिक्षा आहे. विधानसभा निवडणूकीनंतर मतपेटीतून समजून आलेला भाजपा ताकदीचा दबदबा आणि प्रभागाप्रभागात मिळालेली आघाडी पाहता आपले महापालिकेतील अस्तित्व आगामी सभागृहातही टिकवून ठेवण्यासाठी असंख्य विद्यमान नगरसेवक आपल्या सध्याच्या पक्षनिष्ठेला बासनात गुंडाळून कमळाबाईच्या नावाचे कुंकू लावण्यासाठी कमालीचे आतूर झाले असल्याचे पडद्यामागील घडामोडीदरम्यान पहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ऐरोली विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर युवा प्रस्थ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. कमल पाटील यांचे चिरंजिव प्रशांत पाटील यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करून महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदल होण्याच्या संकेतास नवी मुंबईत शुभारंभ केला आहे. नवी मुंबईतील राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता ऐरोली मतदारसंघाच्या तुलनेत बेलापुर विधानसभा मतदारसंघातील अधिकांश घटक भाजपामध्ये प्रवेश करण्यास कमालीचे आतुर झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अमराठी भाषिकांचा भाजपाला एकगठ्ठा पाठिंबा, मोदीलाटेचा कायम राहिलेला प्रभाव, महापालिका निवडणूकीत पंतप्रधान मोदींची एकतरी सभा घेण्यासाठी भाजपाने कंबर कसून तयारीस केलेली सुरूवात, पालिका प्रभागात भाजपाला मिळालेली आघाडी या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बर घटकांनी भाजपात प्रवेश करण्याच्या आपला मनसुबा बनविला असून पालिका निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर नवी मुंबईत भाजपा प्रवेशासाठी मेळावा लागल्याचे चित्र पहावयास मिळण्याची दाट शक्यता आहे.
भाजपाला नवी मुंबईत विधानसभा निवडणूकीत मतदान चांगले झाले असले तरी भाजपाची नवी मुंबईतील पक्षसंघटना अद्यापि मजबूत नसल्याचे जगजाहीर आहे. आमदार सौ.मंदाताई म्हात्रे आणि वैभव नाईकांच्या भाजपा प्रवेशाने नवी मुंबई भाजपाला प्रथमच ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. महापालिका निवडणूकीत पॅनल असून विजयी होण्यासाठी दोन प्रभागातून मतदान खेचावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने मनपा निवडणूकीसाठी खर्चाची मर्यादा आखून दिली असली तरी हा खर्च कितीतरी लाखाच्या घरात जातो, ही बाब आता जगजाहीर झालेली आहे. पैसा खर्च करण्याची क्षमता, पक्षाच्या मताव्यतिरिक्त स्वत:ची असलेली मते, किमान अडीच ते तीन हजार मतदान खेचण्याचे प्राबल्य आदी निकषांचा अभ्यास केल्यास नवी मुंबई महापालिकेची सत्ता संपादन करावयाची असल्यास इतर पक्षातल्या आयारामांनाही भाजपाला स्विकारावे लागणार आहे.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षापेक्षा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातच अधिक पडझड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसच्या नवी मुंबईतील एका मातब्बर प्रस्थांने आपल्यासोबत पक्षाचे पाच ते सहा नगरसेवक आणि मातब्बर पदाधिकारी घेवून भाजपात प्रवेश करण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. विद्यमान नगरसेवकांना तिकीट आणि सक्षम पदाधिकार्यांचाही तिकीटवाटपात विचार झालाच पाहिजे यावर बोलणी सुरू असून मनपा सोडतीचे आरक्षण जाहीर झाल्यावर हा नेता आपल्या नगरसेवकांसह व समर्थक कार्यकर्ते-पदाधिकार्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. कॉंग्रेसमध्ये एका महत्वाच्या पदावर कार्यरत असणार्या एका मातब्बरांने शिवसेना प्रवेशासाठी चाचपणी सुरु केली असून विधानसभा निवडणूकीता कॉंग्रेसच्या या पदाधिकार्यांने शिवसेनेच्या विजय नाहटांचे काम केल्याचे उघडकीस आले आहे.
बेलापुर मतदारसंघातून गणेश नाईकांचा पराभव झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीत ‘आलबेल’ राहीले नसल्याचे संकेत निकालानंतर पहावयास मिळू लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सिवूडस भागातील तसेच नेरूळ पश्चिमेकडील अनेक स्थाकिन रथी-महारथी भाजपा प्रवेश झाल्याच्या थाटात वावरू लागली आहेत. वाशी नोडमधील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना भाजपा प्रेमाचे ‘डोहाळे ’ लागले असून तेदेखील आरक्षण सोडतीची प्रतिक्षा करत असून कधीही त्यांचा भाजपा प्रवेश होवू शकतो.
विधानसभा निवडणूकीतील निकालानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पडझडीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असून ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात शिवसेनेकडे तर बेलापुर विधानसभा क्षेत्रात भाजपाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घटक झुकण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर मतदारसंघातील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या कार्यक्षेत्रातील बदलत्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक ‘बारीक’ लक्ष ठेवून प्रभागाप्रभागातील ‘अपडेट’ घेताना पडद्यामागील बैठकांचा, भेटी-गाठीचाही ते आढावा घेत आहेत.