नेरूळमध्ये घरफोडी
नवी मुंबई : बंद घराचा कडीकोंयडा तोडून सुमारे ४० लाख ८० हजार रूपयांचा ऐवज चोरीला नेण्याची घटना नेरूळ सेक्टर १६ या परिसरात घडली आहे.
सौ.दिपा मंगतलाल चौहान (३८) यांच्या मालकीच्या प्लॉट नं ८०१, सी ब्रिज टॉवर ०६ येथील सदनिका दोन दिवस बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंयडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, डायमंड ज्वेलरी, रोख रक्कम असा सुमारे ४० लाख ८० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस उपनिरीक्षक राजगुरू अधिक तपास करीत आहेत.
हुंदई वेरणा कारची चोरी
नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ सारख्या गजबजलेल्या, वर्दळीच्या परिसरात दुकानासमोर उभी केलेली हुंदई वेरणा कार सांयकाळी ७ ते रात्री साडे अकराच्या दरम्यान चोरीला जाण्याची घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
वाशी , सेक्टर २९ येथे राहणारे भरत प्रताप ठक्कर या व्यावसायिकांने वाशी सेक्टर १७ येथील आशियाना बिल्डींगमधील आपल्या दुकानासमोर आपली हुंदई वेरणा कार (एमएच ०४/ बीके ४०४०) पार्क केली. रात्री दुकान बंद करून बाहेर आल्यावर त्यांना आपल्या वेरणा कारची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक पठारे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
सिवूड्सला घरफोडी
नवी मुंबई : बंद घराची खिडकीदेखील चोरांना आकर्षित करू शकते आणि आपल्याला फटका देवू शकते याचा परिचय सिवूडस सेक्टर ५६ येथे राहणार्या सुनिल कांतीचरण पंडीया यांना ४९ हजार रूपयांची घरात चोरी झाल्यावर नक्कीच आला असणार. सिवूडस सेक्टर ५६ येथील प्लॉट नं ४, रूम नं २०२ रिबेरा अपार्टमेंट येथे राहणारे सुनिल पंडीया हे काही कामानिमित्त दुपारी १ ते सांयकाळी ६च्या दरम्यान बाहेर गेले असता घराच्या उघड्या खिडकीच्या मदतीने घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने डेल कंपनीचा व सोनी कंपनीचा असे दोन लॅपटॉप, नोकीया कंपनीचा मोबाईल चोरून नेले. एनआरआय पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
पाच दरोडेखोर जेरबंद
नवी मुंबई : दरोडा टाकण्यापूर्वीच पाच दरोडेखोरांच्या टोळीला शस्त्रांसह जेरबंद करण्याची किमया उरण पोलिसांनी करून दाखविली आहे.
उरण येथील राधाकृष्ण अपार्टंमेंटमधील इंडिया इंन्फोताईन्स फायनान्सवर काहीजण दरोडा टाकणार असल्याची ‘टीप’ उरण पोलिसांना मिळाली होती. पाळत ठेवून उरण पोलिसांनी शामिक मोहम्मंद नसरीद्दीन, सजाबुद अब्दुल हुदुस शेख, अंहमद अब्दुल मशिद हुसेन, हुसिम इशाद शेख, आजाद मंजुर शेख या पाच दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. या टोळीकडे दरोड्यासाठी लागणारे कटर, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर आदी सापडले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
कोपरखैरणेत घरफोडी
नवी मुंबई : घराचा दरवाजा बंद करताना दाखविलेला हलगर्जीपणाला चोरीला निमत्रंण देवू शकतो याची प्रचिती कोपरखैराणे सेक्टर १९ ए येथे राहणार्या बिपीन बिहारी प्रफुल्ल नाहक यांना आली असून दरवाजा बंद करून कुलुपाला चावी ठेवून जाणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
बिपीन बिहारीचा भाऊ रात्री ७.३० वाजता दरवाजा बंद करून गेला आणि रात्री १०.३० वाजता परत आला.कुलुपाला किल्ली विसरून गेल्याने अज्ञात चोरट्याने घरातील कॅमेरा व लॅपटॉप चोरून नेला. कोपरखैराणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आहिरे अधिक तपास करीत आहेत.