विरोधी पक्षनेत्यांची घणाघाती टीका
नवी मुंबई : दिघा विभाग कार्यालयांतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे कार्यरत असणार्या शाळा, अंगणवाड्या व शौचालयांची दुरवस्था आपल्या शहराचे दरिद्रीपणा दर्शवित असल्याची टीका विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी केली आहे.
सौ. पाटील यांनी दिघा विभागातील महापालिकेच्या शाळा, नागरी आरोग्यकेंद्रे व शौचालयांचा पाहणी दौरा केला यावेळी त्या बोलत होत्या.
दिघा विभाग कार्यालयांतर्ग येणार्या महापालिका निर्मित वास्तूंचा नियोजित पाहणी दौरा सरोज पाटील यांनी पायी चालत स्थानिक नगरसेवक व शिवसेना पदाधिकार्यांसोबत केला. जेमतेम पंधरा उपस्थितांपासून सुरु झालेला पाहणी दौर्यात नंतर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पाहणी दौर्यादरम्यान विभागातील शाळांमध्ये विद्यर्थ्यांना लघुशंकेसाठीही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच, येथील शाळांमध्ये पटसंख्यानुसार विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेसची कमतरता असल्याचे आढळून आले. दिघा विभागातील पालिका निर्मित व कंत्राटदार संचलित सार्वजनिक शौचालयांमध्ये साफसफाईची पुरता बोजवारा उडाला होता. तर, बहुतांश ठिकाणी स्त्रियांसाठी राखीव असणार्या शौचालयांना दरवाजे नव्हते. तर, शौचालयांच्या सभोवताली घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य होते. जगदीश गवते यांच्या वार्डातील सार्वजनिक शौचाची पाईपलाईन थेट गटाराला जोडली असल्याचे महापालिकेचे अशोभनीय कृत्य पाहणी दौर्यादरम्यान समोर आले असल्याचे मत सौ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दौर्यात स्थानिक नागरिक आपली गार्हाणी सौ. पाटील यांसमोर आपुलकीने मांडली. येथे वास्तव्य करणारे नागरिक हे नवी मुंबईकर आहेत. परंतु, महापालिकेची या भागात पुरविली जाणारी नागरी व गरजेची सुविधा अतिशय लज्जास्पद आहे. कोटींचे मुख्यालय बांधणारे महापालिका प्रशासन व स्वार्थी वृत्तीने स्वतःच्या वार्डात ५५ कोटींची शाळा उभी करणारे महापौर या दोहोंनी दिघा विभागाचा दौरा आवश्य करावा अन्यथा पदे व खुर्च्या रिकाम्या कराव्यात असा गर्भित इशारा सौ. पाटील यांनी दिला आहे.
पाहणी दौर्यादरम्यान समोर आलेल्या दिघा विभागातील नागरी समस्या निवेदनाद्वारे आयुक्तांपर्यंत पोहचविणार असून येत्या महासभेत लक्षवेधी मांडणार असल्याचे ठाम आश्वासन सौ. पाटील यांनी उपस्थितांना दिले.
याप्रसंगी, शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील, स्थानिक नगरसेवक बहादुर बिस्ट, नगरसेवक जगदीश गवते, विभाग अधिकारी श्री. आगाव व शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांच्यासमवेत स्थानिक रहिवाश्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.