एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यात नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदान होणार असून या निवडणूकीचे पडघम नवी मुंबई्रच्या राजकीय क्षेत्रात उमटण्यास सुरूवात झाली आहे. एकेकाळी नवी मुंबई हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने गणेश नाईकांचा बालेकिल्ला समजला जायचा. पण देशाच्या बदलत्या राजकीय वातावरणाचे पडसाद नवी मुंबईतही उमटण्यास सुरूवात झाली असून राजकीय स्थित्यंतरास आणि लोकांच्या मानसिकतेतही बदल होवू लागला आहे. उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची प्रथा सर्वत्रच असल्याने नवी मुंबईचे राजकारण तरी त्याला अपवाद कसे राहणार? महापालिका निवडणूका प्रभागाचे आरक्षण कधी जाहीर होते याचीच नवी मुंबईतील राजकारणी चातकाप्रमाणे वाट पहात आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काही अंशी शिवसेनेतील घटकही आपल्या पक्षनिष्ठेचे दावे तोडून भाजपाच्या छावणीत मोठ्या संख्येने विसावलेले पहावयास मिळतील. थोडक्यात काय तर, आजमितीला नवी मुंबईचे राजकारणच कमळाबाईच्या प्रेमात पडलेले पहावयास मिळत आहे.
देशात आजही मोदी लाटेचा प्रभाव कायम असल्याने काश्मिर ते कन्याकुमारीपर्यतच्या राजकारणात ‘नमो-नमो’चा जयघोष होताना पहावयास मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून भाजपाने दमदार मुसंडी मारल्याने नवी मुंबईतील भाजपाला पालवी फुटली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर एकेकाळी नवी मुंबईच्या राजकारणात अडगळीत पडलेल्या भाजपाला आणि भाजपातील कार्यकर्ते-पदाधिकार्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. जणूकाही मराठी चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ बदलून सासुरवाशिण अलका कुबलच्या हातात घराचा कारभारच यावा अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबई भाजपाच्या बाबतीत झाली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात बेलापुर आणि ऐरोली असे दोन विधानसभा मतदारसंघ मोडत आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातून नवी मुंबईच रणरागिनी, मुलुखमैदानी तोफ समजल्या जाणार्या आक्रमक प्रवृत्तीच्या मंदाताई म्हात्रे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मातब्बर समजल्या जाणार्या गणेश नाईक या दिग्गजांचा पराभव केला. दुसरीकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या वैभव नाईकांनी ४७ हजारापेक्षा अधिक मतदान घेत भाजपाला आगामी काळात ऐरोली विधानसभा मतदारसंघात कमी न लेखण्याचा ईशाराच मतपेटीतून दिला आहे. मुळातच नवी मुंबईतीला भाजपा ही कमजोरच पक्षसंघटना. परंतु सौ. मंदाताई म्हात्रे आणि वैभव नाईक या रथी-महारथीचा समावेश आणि मोदी लाट यांचा मिलाफ झाल्यावर नवी मुंबईच्या राजकारणाला अनायसे कलाटणीच मिळाली आहे. देशात नमोचे वारे तर बेलापुरात ताईनामाचा आणि ऐरोलीत शेठ नावाचा भाजपा वर्तुळात जयघोष सुरू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने गणेश नाईकांचा राजकीय बालेकिल्ला अशी ठाणे जिल्ह्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख असणार्या नवी मुंबईत राजकीय वातावरण बदल विधानसभा निवडणूकीमध्ये हा अचानक झालेला नाही. लोकसभा निवडणूकीपासूनच त्याचे पडघम वाजण्यास सुरूवात झालेली होती. लोकसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवार व ठाण्यातील शिवसेना आमदार राजन विचारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा २ लाख ८४ हजार इतक्या मताधिक्क्यांनी पराभव केेला. नवी मुंबईसारख्या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रचंड आशावादी असताना ‘भरवशाच्या म्हशीला’ असा काहीसा प्रकार होत शिवसेनेने नवी मुंबईतून ४७ हजारापेक्षा अधिक मतांनी दणदणीत आघाडी घेतली.
लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेचा झंझावात होताच, पण महायुती एकत्रित लढली होती.
विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा महायुती तुटली. शिवसेना-भाजपा स्वबळावर परस्परांविरोधात लढले. विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश नाईक आणि संदीप नाईक हे पुन्हा एकदा बाजी मारतील असे सरसकटपणे सर्वत्रच सांंगितले जात होेते. एकवेळ ‘भाई’चे काही खरे नाही, पण ‘दादा’ मात्र सीट हमखास काढतील असे खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. पण उलटेच झाले. संदीप नाईकांनी ऐरोलीचा गड नऊ हजाराच्या आसपास मताधिक्य घेत कायम राखला. पण गणेश नाईकांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
नवी मुंबईतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने गणेश नाईकांचा कमी होत चाललेला प्रभाव हा चिंतनाचा विषय बनला. मुळातच नवी मुंबई हा भाग मिनी भारत आहे. देशाच्या कानकोपर्यातील सर्वच नागरिक उपजिविकेसाठी नवी मुंबईत विसावलेले आहेत. देशाच्या बदलत्या राजकारणाचे पडसाद नवी मुंबईत उमटले. अमराठी भाषिकांनी,परप्रातिंय मतदारांनी आपले मतदान भरभरून भाजपाच्या झोळीत टाकले. त्यामुळे भाजपाच्या छावणीत उत्साह निर्माण झाला आणि राष्ट्रवादीच्या छावणीत सन्नाटा पसरला.
नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक अवघ्या पावणे पाच महिन्यावर येवून ठेपली आहे. मतदारांची बदललेली मानसिकता आणि मतदारांना भाजपाप्रती निर्माण झालेले प्रेम याचा नवी मुंबईतील राजकारण्यांना अंदाज आलेला आहे. त्यामुळे महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांपैकी अधिकांश जण भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची तयारी करू लागले आहेत. सौ.मंदाताई म्हात्रेंच्या संपर्कात येणार्यांची यादी गेल्या काही दिवसापासून वाढतच चालली असणार! नवी मुंबई महापालिका प्रशासन पॅनल सिस्टीमचे आरक्षण कधी जाहीर करते, याचीच या राजकारण्यांना प्रतिक्षा आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर नवी मुंबई भाजपाच्या छावणीत राजकीय कुंभमेळा लागण्याची दाट शक्यता आहे.
भाजपाचा मतदारांवर प्रभाव असला तरी पालिका निवडणूक लढविण्यासाठी भाजपाचे नवी मुंबईच्या अधिकांश भागात कार्यकर्ते आणि पदाधिकारी अर्थकारण झेलण्याइतपत सक्षम निश्चितच नाहीत. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिलेली असली तरी पूर्वी महापालिका निवडणूक लढण्यासाठी एका प्रभागातून किमान ३० ते ७० लाखांपर्यत खर्च झाल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे आणि निवडणूक लढविणार्यांनी ते जवळून अनुभवलेही आहे.
कॉंग्रेसचा एक मातब्बर नेता नगरसेवकांसहीत भाजपामध्ये जाण्याची जय्यत तयारी करत असतानाच त्याच आडनावाशी साधर्म्य असणारा दुसरा कॉंग्रेसी नेता शिवसेनेशी सलगी करत असल्याचे पहावयास मिळत आहे. कॉंग्रेस नवी मुंबईत क्षीण झाल्याचे पहावयास मिळत असून कॉंग्रेस पदाधिकारीदेखील ‘खांदे’ पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.
मनपा प्रशासनाने प्रभाग आरक्षण सोडत जाहीर केल्यावर आयाराम-गयाराम संंस्कृतीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसलाच बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे काही घटक आपले तिकीट कापल्यास भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत.
गणेश नाईकांना महापालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर ‘ब्रुट्स टू यू’असे म्हणण्याची पाळी येईल, इतपत धक्कादायक घडामोडी पडद्याआडच्या राजकारणात सुरू आहेत. राजकारणात कडवट निष्ठावंत असण्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत.गणेश नाईकांनी महापालिका वर्तुळात ज्यांना भरभरून दिले, तेच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्याच्या हालचाली करू लागले आहेत. सिवूडस भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला हादरा बसणार असल्याचे संकेेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. नेरूळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही घटक भाजपामध्ये गेले आहेत, अनेक जण जाण्याची तयारी करू लागले आहेत. वाशीसारख्या ठिकाणीही पडझड होण्याचे संकेत पडद्यामागच्या हालचालीत दिसू लागले आहेत.
राजकारणात मुरब्बी व प्रगल्भ असणार्या गणेश नाईकांनाही या संभाव्य पडझडीची निश्चितच कल्पना आलेली असणार. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि सत्ताहव्यासाची वाढती यादी पाहता ही पडझड थोपविणे आजच्या घडीला गणेश नाईकांनाही थांबविता येणे अवघड आहे. भाजपाचा वाढता प्रभाव ही संधी साधत आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकांनी पक्ष सोडण्याची व भाजपात जाण्याची तयारी सुरू केल्याचे नवी मुंबईत ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.
– सुजित शिंदे
९६१९१९७४४४