अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा सुविधांची परिपुर्ती केली जात असताना बर्याचदा विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये मुख्यालय स्तरावरुन दिल्या जाणार्या कामांच्या आदेशांची अंमलबजावणी करताना विभाग कार्यालय स्तरावर समस्या उद्भवल्यामुळे काहीसा विलंब होतो. हा विलंब टळून विहीत वेळेत सुयोग्य कार्यवाही होण्याकरीता महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांचे अध्यक्षतेखाली सर्व विभाग अधिकारी, त्यांचे परिमंडळ विभागप्रमुख व महानगरपालिकेचे संबंधित विभागप्रमुख यांची विशेष समन्वय बैठक संपन्न झाली.
या बैठकीत विभागीय स्तरावर काम करताना संबंधित विभाग अधिकार्यांना जाणवणार्या अडचणी/समस्या यांचा खातेनिहाय आढावा घेण्यात आला तसेच त्यांचे निराकरण करण्यासाठी अंमलात आणावयाच्या उपाययोजनांविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली.
यामध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तांचा योग्य वापर व्हावा यादृष्टीने काळजीपुर्वक लक्ष देण्याची व त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी मालमत्ता विभागास दिले. याकरीता महापालिकेच्या मालमत्ता वापरात येण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रात प्रसिध्दी देऊन प्रस्ताव मागविण्याचे सूचीत करण्यासोबतच आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत ज्या वास्तुंचे बांधकाम पुर्णत्वास येणार आहे अशा मालमत्ता वापरात येण्याकरीता प्रस्ताव मागविण्याची कार्यवाही आत्तापासूनच सुरु करावी व असे करताना वापर भाडे मात्र त्यांच्याशी करार झाल्यानंतरच सुरु होईल असे प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करावे अशा सूचना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे यापुढील काळात कोणतीही वास्तू बांधण्यापुर्वी त्याच्या उपयोग कोणत्या कामासाठी होणार आहे? याबाबत आधी नियोजन करून मगच वास्तू बांधकामे करण्यात यावीत असेही निर्देश त्यांनी अभियांत्रिकी विभागास दिले.
सिडकोकडून नागरी सुविधांचे भूखंड हस्तांतरण करुन घेताना त्यांचे प्रयोजन निश्चित करुन घेण्यात यावे तसेच त्या मालमत्तांचे सीमांकनही केलेले असावे अशा सूचना मालमत्ता विभागास देण्याबरोबरच आयुक्तांनी मालमत्तांच्या नोंदी व त्यांच्या देखभालीवर त्या त्या क्षेत्रातील विभाग अधिकारी यांनी लक्ष ठेवावे असे निर्देश दिले. प्रभाग समिती निधीमधून स्थानिक पातळीवरील लोकांच्या गरजेची लहान लहान आवश्यक कामे हाती घ्यावीत व त्याचेही परिमंडळ पातळीवर विभागनिहाय नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
रस्ते, चौक येथे कसेही, कुठेही लावण्यात येणार्या बॅनर्स, होर्डींगमुळे शहर बकाल दिसते याकरीता बॅनर्स, होर्डींग लावण्याच्या निश्चित जागांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने परवाना विभागामार्फत कार्यवाही करण्यात यावी आणि त्या निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी बॅनर्स, होर्डींग लागणार नाहीत याची विभाग अधिकारी यांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सूचित केले. याबाबत नागरिकांनीही रितसर परवानगी घेऊनच मंजूर कालावधीमध्ये बॅनर्स, होर्डींग प्रदर्शित करावेत तसेच विशेषत्वाने महापुरूषांच्या छायाचित्रांसह बॅनर्स, होर्डींग प्रदर्शित करताना ते योग्य जागी व परवानगी घेऊनच लावावेत व महापुरूषांचा यथोचित सन्मान राखावा असे आवाहन महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी केले आहे.
स्वच्छ शहराचा संकल्प प्रत्यक्ष साकार करताना हौसेने कुत्रे पाळणार्या नागरिकांनी आपल्या कुत्र्यांना फिरायला बाहेर आणल्यानंतर पदपथ, रस्ते अस्वच्छ होणार नाहीत याची काळजी घेण्याकरीता आपल्या सोबत अल्प किंमतीत उपलब्ध होणारे पुप कलेक्टर (प्राण्यांची विष्ठा उचलण्याचे साधन) सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येत असून यामुळे शहर स्वच्छ राहील व कुत्र्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी होणार्या अस्वच्छतेमुळे इतर नागरिकांमध्ये कुत्रे पाळणार्या नागरिकांबद्दल सर्वसाधारणपणे दिसणारी नाराजीची भावना दूर होईल. असे न केल्यास शहर अस्वच्छतेस प्रोत्साहन देणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले. मात्र त्याबरोबरच नवी मुंबईतील सुजाण, सुसंस्कृत नागरिकांवर अशा कारवाईची वेळच येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत महापालिकेच्या विविध लोकोपयोगी वास्तू, मैदाने, उद्याने, अतिक्रमण, डेब्रीज, घनकचरा, आरोग्य, पाणी पुरवठा, स्थापत्य, विद्युत अशा विविध बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली व या सेवा पुरविताना जाणविणार्या अडचणींमधून मार्ग काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याचे ठरविण्यात आले.
मुख्यालय स्तरावरुन काम करणारे विभागप्रमुख आणि प्रत्यक्ष विभागीय क्षेत्रात काम करणारे विभाग अधिकारी यांच्यामध्ये परस्पर समन्वय साधला जावा ही या बैठकीच्या आयोजनामागील आपली भूमिका परस्पर विचारविनिमयातून यशस्वी झाल्याचे दिसून आले असून अशाप्रकारच्या समन्वय बैठका नियमित घेण्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. ए. एल. जर्हाड यांनी यापुढील काळात या बैठकीच्या अनुषंगाने अधिक गतीमान व दर्जेदार नागरी सुविधा परिपुर्ती करताना सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.