अनंतकुमार गवई
नवी मुंबई :नागरी सुविधांची पुर्तता करताना गुणवत्तापूर्ण व समाधानकारक सेवा पुरविल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्प व उपक्रमांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून नवी दिल्ली येथे आज संपन्न झालेल्या विशेष समारंभात महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्पास देशातील मानाच्या ‘पाचव्या इपीसी वर्ल्ड वॉर्ड २०१४’ ने सन्मानीत करण्यात आले. नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आणि महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी हा पुरस्कार केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. महेश शर्मा, केंद्रीय खनीज व पोलाद राज्यमंत्री ना. विष्णु देव साई यांच्या हस्ते, खा. दिलीपकुमार गांधी, खा. महेश पांडे यांच्या सन्माननीय उपस्थितीत स्विकारला.
या समारंभास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. मनोज सिन्हा, खा.श्रीम.मिनाक्षी लेखी, इपीसी वर्ल्ड मिडिया समुहाचे व्यवस्थापकीय संचालक तेजस्वी शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
इपीसी वर्ल्ड मिडीया, अर्न्स्ट अँड यंग आणि झी बिझनेस या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र यामध्ये केलेले गुणवत्तापूर्ण कार्य आणि कामाची व्याप्ती यांचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षक मंडळाच्या माध्यमातून करून उल्लेखनीय काम करणार्या संस्था / उद्योगसमुहांना इपीसी वर्ल्ड वॉर्डने सन्मानीत करण्यात येते. यात ‘इन्फ्रास्ट्रक्चर कॅटेगरी’ मध्ये शहरातील दैनंदिन घनकचर्यावर प्रक्रिया करुन त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणार्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास ‘इपीसी वर्ल्ड वॉर्ड २०१४’ प्रदान करुन विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल आज सन्मानीत करण्यात आले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकीत मल्टिनॅशनल उद्योगसमुह, बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक तसेच पायाभूत सेवा क्षेत्रातील अग्रणी संस्था यांच्या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेने राबविलेल्या पर्यावरणपूरक व लोकहितकारी अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने गौरव होणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा तुर्भे येथील औद्योगिक क्षेत्रात असलेला जमीनभरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा देशातील अत्याधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीने घनकचर्याची विल्हेवाट लावणारा पर्यावरणक्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी नावाजलेला प्रकल्प आहे. याठिकाणी शहरातून येणार्या संपुर्ण घनकचर्याचे वर्गीकरण करण्यात येऊन पुर्नचक्रीकरण करण्यात येते. तसेच त्यातील ओल्या कचर्यावर प्रक्रिया करुन त्याचे रुपांतर खत व फ्युएल पॅलेट्स (इंधन) मध्ये करण्यात येते. यामध्ये ज्या कचर्यावर कोणतीही प्रक्रिया होऊ शकत नाही अशा उर्वरीत घनकचर्याची नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २००० अन्वये शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येत असून या उर्वरीत कचर्याचे प्रमाण नियमानुसार एकूण घनकचर्याच्या २० टक्केपेक्षा कमी आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचा अग्रगण्य प्रकल्प म्हणून नावाजल्या जाणार्या या प्रकल्पात सर्व प्रकारच्या प्रक्रिया, विल्हेवाट व दैनंदिन व्यवस्थापन यावर नवी मुंबई महानगरपालिकेचा काहीही खर्च होत नाही उलटपक्षी यापुर्वी दैनंदिन घनकचर्यावर प्रक्रिया करण्याकरीता दरमहा साधारणत: २९ लक्ष इतक्या होणार्या खर्चात मागील दोन वर्षापासून संपूर्ण बचत होत आहे. एकुण तीस वर्षांसाठी देण्यात आलेल्या बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (इजढ) तत्वावर चालणार्या या प्रकल्पात कचर्यापासून खत व फ्युएल पॅलेट्स निर्मिती करणार्या कंपनीकडून एक टन कचर्यामागे १५ रु. इतके उत्पन्न महानगरपालिकेस अपेक्षित आहे. यामुळे कचर्याच्या समस्येपासून सुटका होण्यासोबतच महानगरपालिकेचा कोणताही खर्च न होता त्यापासून उत्पन्न मिळवून देणारा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरण रक्षणासोबतच भविष्यात मूल्यवर्धन करणारा ठरणार आहे.
संपूर्ण देशात आज कचर्याची समस्या भेडसावत असताना नवी मुंबई महानगरपालिकेचा शास्त्रोक्त पध्दतीने घनकचरा प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी राबविला जाणारा प्रकल्प देशा-परदेशातील अनेक नामवंत, अनुभवसंपन्न पर्यावरण तज्ज्ञांनी नावाजलेला असून या प्रकल्पास लाभलेल्या मानाच्या ‘इपीसी वर्ल्ड वॉर्ड २०१४’ मुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे व ही संपुर्ण नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केले आहे.
महापालिका आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना समाधानकारक सेवा पुरविण्यासोबतच सुविधांच्या दर्जाचीही काळजी घेते त्यामुळेच महानगरपालिकेच्या प्रकल्पांना अनेक मानांकीत पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यामध्ये यापुर्वी सीटेक मलप्रक्रिया केंद्रास लाभलेल्या इपीसी वर्ल्ड वॉर्ड २०११ नंतर यावर्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासही हा पुरस्कार लाभला आहे यामध्ये महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक यांचे मौलिक सहकार्य तसेच पर्यावरण विभागाचे विभागप्रमुख शहर अभियंता मोहन डगांवकर आणि संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्तांनी हा पुरस्कार लाभल्यामुळे महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण सुविधापुर्ततेवर आणखी एका राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.