मनोज मेहेर /९८९२४८६०७८
नवी मुंबई : वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात नवी मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर नवी मुंबईत भाजपाने जनाधाराच्या बाबतीत आघाडी घेतल्याने येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अधिकांश नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. विधानसभा निवडणूकीत बेलापुर विधानसभा मतदारसंघातून मंदाताई म्हात्रेंनी गणेश नाईकांसारख्या मातब्बर राजकारण्यांला पराभूत करून विजय मिळविला, तर दुसरीकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून युवा नेते वैभव नाईकांनी ४७ हजाराहून अधिक मतदान घेतले. बेलापुर व ऐरोली मतदारसंघातील जमाबेरीज पाहता शिवसेनेइतकेच मतदान भाजपाला प्राप्त झालेले आहे. विधानसभा निवडणूकीनंतर सर्वपक्षीय राजकारण्यांना अचानक ‘गौरव’ बंगल्याचे प्रेम वाढीस लागले. प्रभागामध्ये मिळालेल्या मतदानामुळे अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यातच विविध पक्षाचे मातब्बर सौ. मंदाताई म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करत असल्याने स्वबळावर महापालिका जिंकण्याचा विश्वास भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून बोलून दाखविला जात आहे.
सव्वा तीन महिन्यावर येवून ठेपलेल्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.