अनंतकुमार गवई
नवी मुंबई : सरते २०१४ वर्ष नवी मुंबईच्या राजकीय घडामोडींनी उलथापालथ करणारे ठरले. होत्याचे नव्हते झाले. प्रस्थापितांचे गड खिळखिळे झाले. नवी मुंबईतील अमराठी, परभाषिक, परजातिय लोकांनी भाजपाची कास पकडल्याने राजकीय समीकरणे बदलत गेली. सव्वा तीन महिन्यावर येवून ठेपलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्थंलातराची चर्चा जोर धरू लागली आहे. काही घटकांचे राजकीय स्थंलातर अटळ असल्याने नववर्षाच्या जानेवारी महिन्यातच नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उलथापालथी घडून येण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी तत्कालीन खासदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. संजीव नाईक यांना २ लाख ८४ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभूत केले. हा पराभव मोदी लाटेमुळे झाला असला तरी नवी मुंबईसारख्या नाईकांच्या बालेकिल्ल्यातून डॉ. संजीव नाईकांना ४७ हजाराची मिळालेली पिछाडी नवी मुंबईच्या बदलत्या राजकारणाचे संकेत देवून गेली.
लोकनेते गणेश नाईकांनी विकासकामे करताना अथवा सढळ हाताने आर्थिक मदत करताना कधीही हात आखडता घेतलेला नाही. त्यांनी संपर्कात आलेल्या माणसाचा जात-धर्म-प्रांत याचाही कधी विचार केला नाही. सर्व जातीधर्मियांचे नेते म्हणून गेल्या तीन दशकाहून अधिक काळ गणेश नाईकांनी नवी मुंबईत कार्य केले. सर्व जातीधर्मियांना एकाच माळेत गुंफून गणेश नाईकांनी नवी मुंबईच्या विकासासाठी प्रयास केले. सर्व जातीधर्मियांसाठी कार्य केल्याने हे सर्वभाषिक मतदार सातत्याने आपलीच पाठराखण मतपेटीतून करत आले आहेत व यापुढेही करत राहणार असा विश्वास गणेश नाईकांना सर्वभाषिक नवी मुंबईकरांविषयी होता. अर्थात असा विश्वास बाळगणेदेखील काही चुकीचे नव्हते. कारण तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरताना गणेश नाईकांनी भेदभाव न करता सर्व जातीधर्माच्या माणसांना आपलेसे केले होते, त्यांच्यासाठी अहोरात्र परिश्रमही केले होते. पण मोदी लाटेचा देशभरात आलेला धोका गणेश नाईकांना ओळखता आला नाही. किंबहूना ओळखूनही आपण ज्या सर्व जातीधर्माच्या लोकांकरीता काम केले, ते मतदार या लाटेला भुलणार नाहीत असा नाईकांना या परप्रातिंय परजातीय अमराठी भाषिकांविषयी विश्वास वाटत असावा. मोदी लाट वार्याच्या वेगाने केवळ गुजरातपुरतीच सिमित न राहता ती देशाच्या कानाकोपर्यात पसरत होती. महाराष्ट्रात या लाटेचा तडाखा लोकसभा व विधानसभा निवडणूकीत बसला. भाजपा व शिवसेना या दोन पक्षांना लोकसभेत मोदी लाटेचा फायदा झाला तर विधानसभा निवडणूकीत मोदी लाट भाजपाला सत्तेच्या जवळपास स्वबळावर घेवून गेली.
मोदी लाटेचा नवी मुंबईवर, नवी मुंबईच्या राजकीय समीकरणावर धक्कादायक परिणाम झाला. लोकसभा निवडणूकीत डॉ. संजीव नाईकांचा २ लाख ८४ हजार मतांनी झालेला दणदणीत पराभव आणि नवी मुंबईतून डॉ. संजीव नाईकांना मिळालेली ४७ हजाराची पिछाडी आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पर्यायाने नाईक परिवाराला सर्वकाही ‘आलबेल’ नसल्याचे संकेत देवून गेली.
विधानसभा निवडणूकीत महायुतीत जागावाटपाचा गोडवा संपुष्ठात आल्याने शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. शिवसेना-भाजपात युती नसल्याने नवी मुंबईतील दोन्ही जागा आपणच जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पर्यायाने नाईक समर्थकांकडून उघडपणे बोलून दाखविला जात होता. बेलापुर मतदारसंघात भाजपा उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईकांसारख्या मातब्बराला अटीतटीची झुंज देत १४०० मतांनी पराभूत केले. ऐरोली मतदारसंघात संदीप नाईकांनी शिवसेनेचे विजय चौगुले व भाजपाच्या वैभव नाईक यांना कडवट झुंज देत नऊ हजाराच्या आसपासच्या मताधिक्याने ऐरोलीचा गड राखला. अर्थात यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यश कमी अन् संदीप नाईकांची व्यक्तिगत जनसंपर्क व केलेली कामे याचे योगदान प्रचंड होते.
बेलापुर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मिळालेला विजय आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४७ हजाराहून अधिक भाजपाला मिळालेली मते पाहिल्यावर नवी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपा धडक देणार असल्याचे संकेत उघडपणे पहावयास मिळाले.शिवसेनेला ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघात केलेल्या मतदानाची जमाबेरीज केली असता, शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी झालेला नसतानाही नवी मुंबईतून शिवसेनेने क्रमांक एकची मते घेतल्याचे मतपेटीतून स्पष्ट झाले.
भाजपा-शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी कमजोर पडल्याचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हक्काचा मतदार शिवसेना-भाजपाकडे गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीत अनेकांना पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भवितव्याची चिंता भासू लागली आणि त्यातून नवी मुंबईत संभाव्य स्थंलातरांचा राजकीय प्रयोग हाऊसफुल्ल होण्यास सुरूवात झाली. गणेश नाईक हे आपल्या समर्थकांसह, महापालिकेतील नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या वृत्तांने डिसेंबर महिना हा नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेचा व अफवांचा विषय ठरला. गणेश नाईक भाजपात गेल्यास वैभव नाईक हे शिवसेनेत जाणार याही चर्चेने मधल्या काळात जोर धरला होता. कॉंग्रेसचे नवी मुंबईतील मातब्बर प्रस्थ व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्याही संभाव्य शिवसेना प्रवेशाने सर्वांचेच लक्ष नेरूळ गावातील घडामोडींकडे लागले होते. कोणी कोेेठेही गेले नाही. अफवा व चावडी गप्पांनी मात्र सर्वांचेच मनोरंजन झाले.
जानेवारी मध्यापर्यत घडामोडी गतीमान होतील आणि ज्यांच्या नावाने चर्चा व अफवा सुटल्या त्यांचा स्थंलातर प्रयोग पुन्हा एकदा पडद्यावर नव्या जोमाने भरारी घेईल असा अंदाज आहे. नेते मंडळींनी स्थंलातर नाही केले तर नवी मुंबई महापालिकेतील अधिकांश नगरसेवक, मातब्बर पक्षीय पदाधिकारी व महत्वाकांक्षी घटक शिवसेना-भाजपात जाण्याच्या आपले सामान आवरून बसल्याचे खासगीत पहावयास मिळत आहे. जानेवारी महिन्यात पुन्हा एकवार चावडी गप्पा दाट रंगण्याच्या शक्यता असून जानेवारी अखेरपर्यत स्थंलातर नाट्याचा सोक्षमोक्ष लागलेला नवी मुंबई -ठाण्यालाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला पहावयास मिळेल, असा आशावाद बाळगण्यास तुर्तास हरकत नाही.