अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून पक्षाचा त्याग करून अडीच – तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरकरांकडून नवी मुंबई मनविसे बांधणीबाबत अद्यापि कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. र्निनायकी अवस्थेमुळे नवी मुंबईतील मनविसेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांनी लक्ष देण्याची मागणी मनविसेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास पुन्हा एकवार नवी मुंबई मनविसेवर ‘तोडबाज’ नेत्यांचा एकछत्री अंमल सुरू होण्याची भीती मनविसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई मनविसे ही गेल्या काही वर्षापासून सातत्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या व वादाच्या भोवर्यात सापडलेली आहे. मनविसे ही संघटना विद्यार्थी सेनेऐवजी नको त्या वादामुळेच अधिक चर्चिली गेली. गटबाजीची लागण ही मनविसेला सुरूवातीपासूनच लागली होती. सचिन देशमुख व संदीप गलुगडे या दोन नावांमध्येच सुरुवातीच्या काळात चुरस असताना कोणाच्या मनीध्यानी नसताना ऍड. कौस्तुभ मोरेंची शहरअध्यक्षपदी वर्णी लागली. संदीप गलुगडे हे सक्षम व प्रबळ नेतृत्व विद्यार्थी सेनेसाठी उपलब्ध होते. कोणतेही पद नसताना मनविसेचा कार्यकर्ता म्हणून सुरूवातीच्या काळात त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. सचिन देशमुख हे त्याकाळी तत्कालीन मनसेतील प्रस्थापित मातब्बर जितेंद्र कांबळी, किशोर शेवाळे, पांडूरंग गोरडे आदी रथी-महारथींचे निकटवर्तीय असल्याने देशमुखांची निवड ‘फायनल’ समजली जात होती. देशमुख-गलुगडे यांच्या चुरशीत ‘भाऊ’चे भाऊपण वरिष्ठांना मानवल्याने ऍड. कौस्तुभ मोरेंसारखा सुशिक्षित चेहर्याच्या हाती मनविसे नवी मुंबईची धुरा सोपविण्यात आली. संदीप गलुगडे यांची ऐरोली विधानसभा अध्यक्ष आणि शिरीष पाटील यांची बेलापुर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
नवी मुंबई सुरूवातीपासून ऍडमिशन प्रक्रियेत दाखविलेल्या लवकरात विशेष स्वारस्यामुळे जनसामान्यांमध्ये ‘चांगली’ ओळखली जावू लागली. पुढे ऍड. कौस्तुभ मोरेची ठाणे लोकसभा मनविसे अध्यक्षपदी निवड झाल्यावर मनविसेच्या नवी मुंबई अध्यक्षपदी शिरीष पाटील यांचू निवड झाली. तथापि नवी मुंबई मनविसेवर आपला पगडा कायम ठेवण्यासाठी गजानन काळे यांनी संदीप गलुगडे यांना अनधिकृतरित्या नवी मुंबई मनविसेचे अध्यक्ष बनविले. संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृत शहर अध्यक्षाच्या विरोधात अनधिकृत शहर अध्यक्ष निवड होण्याची ही एकमेव घटना होती. एकप्रकारे राज ठाकरेंच्या मनविसेला आव्हान देण्याची भाषा नवी मुंबईतूनच सुरू झाली. अनधिकृत नवी मुंबई मनविसे कार्यकारिणीबाबत राज ठाकरे यांनी उदासिनता बाळगल्याने नवी मुंबई मनविसेतून मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचे महत्व नियोजितरित्या कमी होत गेले आणि जाणिवपूर्वक गजानन काळेंचे नेतृत्व मनविसेच्या माध्यमातून कशा प्रकारे वाढीस लागेल हाच एककलमी कार्यक्रम मनविसे वर्तुळात राबविला गेला. परिणामी नवी मुंबई मनविसेतील कार्यकर्ते आदित्य शिरोडकरांना विसरले आणि गजानन काळेंची जपमाळ ओढू लागले. याचाच फायदा उचलत पुढे गजाजन काळेंनी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आणि बेलापुर विधानसभेची उमेदवारी मिळविल्याचे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे. गजानन काळे त्या निवडणूकीत दणदणीत पडले. सव्वा चार हजार मतेही विधानसभा निवडणूकीत न मिळाल्याने त्यांची जनसामान्यांतील लोकप्रियता आणि त्यांची संघटनाबांधणी नवी मुंबईकरांसमोरच नाही तर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंसमोरही स्पष्ट झाली.
नवी मुंबई मनविसेच्या कुबड्या वापरत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नावारूपाला आले. आजही नवी मुंबई मनसेत कौस्तुभ मोरे, संदीप गलुगडे, सविनय म्हात्रे यांच्यासह इतर अनेक मनविसेचेच जुने पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. गजानन काळेंचे नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष बनण्याचे व विधानसभा निवडणूक लढविण्याचे ईप्सित साध्य झाले. पण नवी मुंबई मनविसेची आज काय अवस्था आहे, याचा विचारही स्थानिक व दादरच्या राजगड पातळीवरही केला जात नसल्याची नाराजी मनविसेच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे बोलली जात आहे. पक्षस्थापनेपासून सातत्याने नवी मुंबई दादरच्या राजगडवरूनही मनविसेकडे दुर्लक्ष झाल्याने मनसेसुप्रिमो राज ठाकरेंचे विद्यार्थी चळवळीबद्दल प्रेम आटले काय असेही उपहासाने उघडपणे नवी मुंबईकरांमधून बोलले जावू लागले आहे. राज ठाकरेंचे नेतृत्व भारतीय विद्यार्थी सेनेच्या मुशीतच आकाराला आलेले आहे. विद्यार्थी चळवळ त्यांनी जवळून पाहिली असल्याने व अनुभवली असल्याने मनविसेबाबत महाराष्ट्रातील जनतेने फार मोठा आशावाद बाळगला होता. पण नवी मुंबईकरांचा मात्र नवी मुंबई मनविसेची सुरूवातीपासूनची वाटचाल, गटबाजी, अधिकृत-अनधिकृत विभागणी, ऍडमिशन प्रक्रियेतील स्वारस्य आदी घडामोडींमुळे पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारातच तिकीट वाटपानंतर मनसेच्या माजी पदाधिकार्यांसोबतच मनविसे नवी मुंबई शहर अध्यक्ष शिरीष पाटील यांनी पत्रकार परिषदेतच राजीनामा दिला होता. त्यानंतरही मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांनी नवी मुंबई मनविसेबाबत कोणताही निर्णय घेतलेला पहावयास मिळत नाही. गजानन काळेंचे अनधिकृत मनविसे कार्यकारिणीतील समर्थक मनसेत सामावल्याने आदित्य शिरोडकरांनी आतातरी नवी मुंबई मनविसेवर पूर्णपणे लक्ष देवून मनविसेची जनसामान्यांत ‘स्वच्छ’ प्रतिमा निर्माण करण्यावर भर देण्याचा सूर मनविसे कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे.