अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महाराष्ट्र कृषि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी सोमवारी, दि. ५ जानेवारी, विद्यमान आयुक्त ए.एल.जर्हाड यांचेकडून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ही नियुक्ती करण्यात आली असून दिनेश वाघमारे हे १९९४ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस) अधिकारी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगमध्ये पदवी मिळवून त्यांनी आय.आय.टी. खरगपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.टेक. पदवी संपादन केलेली आहे.
यापुर्वी त्यांनी रत्नागिरी येथे सहा. जिल्हाधिकारी, वाशिम व यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा येथे जिल्हाधिकारी, नागपूर सुधार न्यासचे अध्यक्ष, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव, अमरावतीचे विभागीय आयुक्त अशा विविध पदांचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी लोकोपयोगी कार्य केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात प्रौढ साक्षरता अभियानात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपराष्ट्रपतींच्या शुभहस्ते सत्येन मित्रा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे युरोपमधील ब्रॅडबोर्ड विद्यापिठात विकास व प्रकल्प नियोजन शाखेत नागरी जलपुरवठा क्षेत्र यामध्ये त्यांनी मानांकनासह पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकरीता ई-स्कॉलरशिप प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल त्यांस इ-इंडिया पुरस्कारने गौरविण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून पदभार स्विकारताना दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबईसारख्या आधुनिक व प्रगल्भ महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली याचा आनंद वाटतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
येथील नागरी सुविधांच्या दर्जामुळे नवी मुंबई जगात अग्रगण्य महानगरपालिका मानली जात असून हा नावलौकीक वाढविण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला. यापुढील काळात शहराची वाढती लोकसंख्या व वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन वाहतुक व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाईल असे त्यांनी सांगितले. याकरीता उड्डाणपुल बांधणे, मेट्रोरेल सारखा प्रकल्प, सागरी किना-यालगतचा मार्ग अशा विविध बाबी करण्यावर भर दिला जाईल तसेच शहरातील मोठ्या प्रमाणावर असलेली उद्याने, तलाव यांचे नैसर्गिकरित्या जतन करुन त्यांच्या सौंदर्यीकरणावर व संवर्धनावर भर दिला जाईल असे ते म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने शहरातील स्वच्छता अधिक चांगली कशी होईल याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात येईल असे सांगतानाच पाणी पुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्था यातही अधिक गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यात येईल. शैक्षणिक गुणवत्ता विकासावर तसेच रुग्णालयांमध्ये अधिक अत्याधुनिक सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जाईल. लोकप्रतिनिधींच्या सोबतीने लोकाभिमुख प्रशासनाची कास धरत नागरिकांची सनद प्रभावी रितीने अंमलबजावणी करुन नागरिकांना विहित वेळेत समाधानकारक सेवा पुरविण्यावर भर दिला जाईल असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.
विद्यमान आयुक्त ए.एल.जर्हाड यांनी आपला दिड वर्षाचा आयुक्त पदाचा कार्यकाळ समाधानकारक होता असे मत व्यक्त करीत या काळात देशातील सर्वात सुंदर महानगरपालिकेच्या इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले, घनकचरा वाहतुकीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, औद्योगिक क्षेत्रातील कामे पुर्णत्वास आली, रुग्णालयाची बांधकामे पुर्ण होऊन कार्यान्वित होण्याच्या अखेरच्या टप्प्यात आली, आकर्षक उद्याने निर्माण करता आली, सोलार प्रकल्पाला मंजूरी मिळाली, महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधांकरीता मालमत्ता हस्तांतरीत झाल्या व त्यांचे सर्वेक्षण करुन नोंदी करण्याचे काम हाती घेण्यात आले. ई-गव्हर्नन्सवर भर देऊन नवीन तंत्रज्ञानाद्वारे ई-निविदा पध्दतीत अधिक पारदर्शकता आली, कामकाजाला प्रशासकीय शिस्त लागली, नागरिकांना कर भरणा करण्यासाठी ऑनलाईन पध्दती, प्स पध्दती अशा सहज सुविधा उपलब्ध करुन देता आल्या, कर वसुली चांगली झाल्यामुळे उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करता आल्या, सकारात्मक आणि आधुनिक विचारसरणीच्या लोकप्रतिनिधींच्या सोबतीने व सकारात्मक विचार करणार्या अधिकार्यांच्या सहयोगाने चांगले काम करता आले याचे समाधान ए.एल.जर्हाड यांनी व्यक्त केले.