* नागरी समस्यांचा मनसे करणार पंचनामा
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई शहर कार्यकारिणीच्यावतीने शिष्टमंडळ बुधवारी महापालिका मुख्यालयात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेणार असून या भेटीत नवी मुंबई नागरी समस्यांचा पंचनामा करून शहरातील समस्यांकडे मनसे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर मतदारसंघात मतदारांनी झिडकारल्याने मतमोजणीनंतर नवी मुंबई मनसेच्या वर्तुळात कमालीची शांतता आहे. जनआंदोलन करणारी नवी मुंबईतील मनसे कोमातच गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. तथापि या काळात पडझडीतून सावरत महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची संघटना बांधणी नव्याने करण्यात आपण व्यस्त असल्याचे शहर अध्यक्ष गजाजन काळे यांनी सांगितले.
बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी मनसेचे नवी मुंबई शहर कार्यकारिणीचे व अन्य पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची दुपारी १ वाजता भेट घेणार आहे. नवी मुंबई शहरातील नानाविध समस्या, नागरी सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासनाकडून दाखविली जात असलेली उदासिनता, शहराला येत असलेला बकालपणा आदी सर्व घडामोडी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून नवी मुंबईकरांच्या आरोग्य सुविधांसाठी, आरोग्य रक्षणासाठी, नागरी समस्या निवारणासाठी पालिका आयुक्तांना मनसेच्या वतीने साकडे घालणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.