अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर सागर नाईक यांच्या संकल्पनेतून विविध २२ प्रकारचे क्रीडाविषयक स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने यावर्षीही नवी मुंबई महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धेचे १६ ते १८ जानेवारी २०१५ या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे.
सेक्टर १ए, वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, बॅडमिंटन हॉल येथे ही स्पर्धा संपन्न होत असून १६ जानेवारी रोजी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता महापौर सागर नाईक यांच्या हस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी उपमहापौर अशोक गावडे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता अनंत सुतार, विरोधी पक्ष नेता सौ. सरोज पाटील आदी मान्यवर पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून त्याचप्रमाणे इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी वर्ग हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या बॅडमिंटन स्पर्धा ११ वर्षाखालील, १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील मुले व मुली तसेच महिला व पुरुष खुला गट अशा आठ गटांत संपन्न होणार असून यामध्ये ५०० हून अधिक बॅडमिंटन पट्टूंनी सहभाग घेतला आहे. बॅ़डमिंटन स्पर्धेकरीता १,७०,५००/- रक्कमेची रोख पारितोषिके स्मृतिचिन्हांसह प्रदान केली जाणार असून बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.