नवी मुंबई : सांस्कृतिक युवा मंच, नेरूळच्या वतीने रविवार, दि. १८ जानेवारी रोजी अंध, अपंग कलाकारांच्या आगळ्यावेगळ्या अशा उड्डाण गीत या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
नेरूळ, सेक्टर १० मधील साईबाबा रिक्षा स्टॅण्ड चौकात सांयकाळी ६.३० वाजता या कार्यक्रमास सुरूवात होणार असून नेरूळमधील माजी हॅट्ट्रीकवीर नगरसेवक रमेश शिंदे हे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहे. कु. प्राजक्ता रमेश शिंदे या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत. प्राजक्ता शिंदे या गेल्या काही वर्षापासून अंध,अपंग व मुकबधीरांसाठी कार्य करत असून अंध, अपंगांच्या कलागुणांना, गायन कलेला वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे रमेश शिंदे यांनी सांगितले. सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत यादेखील अंध, अपंगासाठी कार्यरत असून अंध, अपंगासाठी रायगड जिल्ह्यात चालविल्या जाणार्या एका शाळेच्या त्या विश्वस्त आहेत.
राजा शिवाजी विद्या निकेतन चॅरिटेबल ट्रस्ट, कै.अण्णासाहेब पाटील क्रिडा मित्र मंडळ – सेक्टर ८ नेरूळ, आध्यात्म – नवी मुंबई, शिवराज्य क्रिडा मंडळ आदी संस्था या अंध-अपंगाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेरूळवासियांना वैशाली सामंतही याचीही एक-दोन गाणी ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे.
जीवनात अंधकार झालेल्या अंध-अपंगाना प्रोत्साहीत करण्यासाठी, त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक प्राजक्ता शिंदे यांनी केले आहे.