नवी मुंबई : महानगर गॅस कंपनीकडून नवी मुंबईकरांना पाईपर्लाइनद्वारे गॅस पुरविण्यात चालढकलपणा सुरू आहे. नवी मुंबईतील उर्वरीत भागातही गॅस पुरवठा सुरळीत न केल्यास नवी मुंबई कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी दिला आहे.
नवी मुंबईकरांना महानगर गॅस व्यवस्थापणाच्या पाईपलाइनद्वारे स्वंयपाकाचा गॅस पुरवठा करण्याच्या कामात होत असलेल्या दिरगांईच्या निषेधार्थ नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे शिष्टमंडळ जिल्हाध्यष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली सानपाडा येथील महानगर गॅस कंपनीच्या अधिकार्यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यावेळी दशरथ भगत यांनी हा इशारा दिला.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी याविषयी सातत्याने महानगर गॅसच्या अधिकार्यांशी संपर्कात आहे. याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार, निदर्शने व आंदोलनेही करण्यात आलेली आहेत. कॉंग्रेसच्या आक्रमक पावित्र्यामुळे नवी मुंबईतील काही भागात महानगर गॅस कंपनीने पाईपलाईनद्वारे स्वंयपाकाचा गॅस वितरीत करणे सुरूही केले आहे. डिसेंबर २०१४ पर्यत सर्वत्र गॅसचा पुरवठा सुरू झालेला असेल असे महानगर गॅस कंपनीकडून कॉंगेे्रसला सांगण्यात आले आहे. जानेवारी २०१५ची १५ तारीख उलटली तरी अधिकांश भागात स्वंयपाकाचा गॅस पाईनलाईनद्वारे सुरू झाल्याबाबत कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने महानगर गॅसच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
महानगर गॅस कंपनीकडे कामगारांची तसेच अन्य स्टाफची कमतरता असल्याने विलंब होत असल्याचे सांगताच याविषयी नवी मुंबईकरांना काहीही देणेघेणे नाही. लवकरात लवकर सर्वोत्तम सुविधा देणे हे तुमचे काम असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी महानगर गॅस कंपनीच्या अधिकार्यांना खडसावून सांगितले. वाशी नोडमध्ये येत्या १५ दिवसांमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅस मिळालेला असेल, असे आश्वासन महानगर गॅस कंपनीकडून देण्यात आले.
यापुढे कंपनीने ग्राहकांचा अंत पाहण्याचा प्रयास करू नये. अन्यथा कॉंग्रेस पक्षाकडून याप्रकरणी जनआंदोलन छेडण्यात येईल व होणार्या परिणामाची जबाबदारी महानगर गॅसच्या अधिकार्यांवरच राहील असे दशरथ भगत यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात दशरथ भगत यांच्यासमवेत जिल्हा उपाध्यक्षा सुदर्शना कौशिक, सुरेश नायडू, सरचिटणिस सुधीर पवार, ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, स्थानिक वॉर्ड अध्यक्ष शार्दुल कौशिक, विजय पाटील, राजेंद्र पाटील, फ्रान्सिस फर्नाडस, जेम्स डिसोझा आदी सहभागी झाले होते.