नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १० परिसरात कै. अण्णासाहेब पाटील रहीवाशी संघ सेक्टर ८ व १० यांच्या वतीने २२ जानेवारी ते २६ जानेवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहासह श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प सुरेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १० वर्षे कै. अण्णसाहेब पाटील रहीवाशी संघ, बिल्डींग नं १ते १४ चे मैदान या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कलशपुजन तर ६.३० वाजता वीणापूजन होणार आहे. सकाळी ५ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सांयकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्रौ ८ ते १० हरिकिर्तन, रात्रौ १० नंतर हरिजागर भजने असा या सप्ताहाचा कार्यक्रम आहे.
ह.भ.प नारायण महाराज उत्तेकर, ह.भ.प प्रकाश बाबाजी घोलप, ह.भ.प दिनकर जगन्नाथ गावडे यांची प्रवचने होणार असून ह.भ.प साध्वी ज्ञानेश्वरी देवी, ह.भ.प धोंडीराम महाराज सकपाळ, ह.भ.प विठ्ठल महाराज धोंडे यांची किर्तने होणार आहेत. २६ जानेवारी रोजी ह.भ.प पांडूरंगमहाराज सांळुखे (सांगली) यांचे सकाळी १० ते १२ यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादास सुरूवात होणार आहे. २५ जानेवारी रोजी सांयकाळी ३ ते ६ या वेळेत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताहाचे व्यासपिठ चालक ह.भ.प गौतम महाराज जाधव (आळंदी) यांनी केले आहे.