* गायखे, भगत, मोरे , नाहटा,हळदणकर, नाईक चर्चेचा केंद्रबिंदू
सुजित शिंदे – ९६१९१९१७४४
नवी मुंबई : शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदाचा विजय चौगुले यांनी राजीनामा दिल्यानंतर आजतागायत मातोश्रीवरून या पदाच्या मानकर्याची अद्यापि घोषणा झालेली नाही. जिल्हाप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती होणार याचा शिवसैनिकांचा अंदाज घेतला असता शिवसेना उपनेते विजय नाहटा, बेलापुर संंपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, नुकतेच आलेले नामदेव भगत, ऐरोलीचे नगरसेवक मनोज हळदणकर, भाजपात असून शिवसेनेच्या युवा नेतृत्वाशी सलगी असणारे वैभव नाईक यांच्या नावाची शिवसेना वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे.
नुकताच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेकडून नागरी सत्कार घेण्यात आला असला तरी भावे नाट्यगृह भरविण्यात आयोजकांना अपयश आले होते. २६ मिनिटाच्या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांना तब्बल साडेपाच ताटकळत ठेवण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान विजय चौगुलेंचे नाव घेण्यात तसेच सत्कार सोहळ्यात करण्यात आलेले राजकारण याचा चौगुले समर्थक शिवसैनिकांकडून आजही संताप व्यक्त केला जात आहे.
रिक्त असलेल्या नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी विविध नावे चर्चेत असली तरी उपनेते विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, नुकतेच पक्षसंघटनेत आलेले नामदेव भगत या त्रिमूर्तीपैकी कोणातरी एकाच्याच गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची वरमाला पडण्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. नवी मुंबई शिवसेनेत चौगुले गट, नाहटा-मोरे गट, ऍड. गायखे गट असे तीन असल्याची माहिती शिवसैनिकांकडून दिली जात आहे.
चर्चेत असलेल्या नावांमध्ये उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे प्रारंभापासून शिवसेनेत कार्यरत असून उच्चसुशिक्षित असलेले गायखेची कडवट, भगव्याशी निष्ठावंत आणि विकला न जाणारा शिवसैनिक अशी शिवसेना वर्तुळात प्रतिमा आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा या प्रत्येक निवडणूकीत ऍड. गायखेंचे नाव शेवटपर्यत आघाडीवर असते, पण शेवटच्या क्षणी ऍड. गायखेंवर अन्याय झाल्याचे गेल्या काही वर्षात पहावयास मिळालेले आहे.
नामदेव भगत हे पक्षसंघटनेत नवीन असले तरी कॉंग्रेसमध्ये त्यांनी कार्यकर्ता, जिल्हाप्रमुख, प्रदेश सरचिटणिस, सिडको संचालक अशा दमदार, कसदार कामगिरीचा पूर्वानुभव त्यांच्या खात्यात जमा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे जिल्हानेतृत्व स्थानिक ग्रामस्थ असल्याने त्या निकषावर नामदेव भगत यांच्या गळ्यातही जिल्हाप्रमुखपदाची माळा पडण्याची दाट शक्यता आहे. गेली काही वर्षे ऐरोलीने जिल्हाप्रमुख पद भूषविले असल्याने आता बेलापुर मतदारसंघात हे पद देण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. नामदेव भगत हे कोळी समाजाचे मातब्बर नेतृत्व असल्याने त्यांच्याही नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
इच्छूकांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक व बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांचेही नाव असले तरी त्यांच्यावर आयाराम-गयारामचा शिक्का आहे. मधल्या काळात ते राष्ट्रवादीमय झाले होते. मनसे स्थापनेनंतर दादरची राज ठाकरेंची सभा, घणसोली दंगलीनंतरची राज ठाकरेंची नवी मुंबई भेट यादरम्यान विठ्ठल मोरेंना फुटलेले राजप्रेम नवी मुंबईकरांनी जवळून पहावयास मिळाले होते.
उपनेते विजय नाहटा यांचे नाव चर्चेत असले तरी उपनेतेपदावरून पायउतार करत जिल्हाप्रमुखपदावर काम करणे शिवसैनिकांच्याही पचनी पडणार नाही. नाहटांचे प्रशासकीय कौशल्य अप्रतिम असले तरीदेखील शिवसैनिकांनी त्यांचे नेतृत्व पाहिजे त्या प्रमाणात स्विकारले नसल्याची कुजबुज शिवसेनेतच सुरू आहे.
विजय चौगुलेंनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला असला तरी नगरसेवक व पक्षसंघटनेतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा विचार करता चौगुलेंच्याच नेतृत्वाखाली नवी मुंबईतील शिवसेना कार्यरत असल्याचे पहावयास मिळते. चौगुले शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेने गरूडभरारी मारलेली आहे. ऐरोलीतील नगरसेवक मनोज हळदणकर यांचे नाव चौगुले समर्थकांकडून जिल्हाप्रमुख पदासाठी घेण्यात येत आहे.
वैभव नाईक हे भाजपाचे युवा नेते. ऐन निवडणूकीत शिवसेनेतून भाजपात प्रवेश करत त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली. ४७ हजार मते मिळवित वैभव नाईकांनी आपला करिश्मा स्पष्ट केला. शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरेंच्या खास मजीर्र्तले अशी वैभव नाईकांची शिवसेना वर्तुळात व शिवसैनिकांत प्रतिमा आहे. त्यामुळे वैभव नाईक कोणत्याही क्षणी शिवसेनेत प्रवेश करून जिल्हाप्रमुखपदी विराजमान होण्याची शक्यता शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गणेश नाईक व त्यांचे समर्थक कोणत्याही क्षणी शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चाही गेल्या काही दिवसापासून राजकारणात सुरु आहे. गणेश नाईकांचा प्रवेश झाल्यावरच शिवसेना जिल्हाप्रमुख ठरविले जाण्याची चर्चाही शिवसैनिकांत सुरू आहे. जिल्हाप्रमुख पद रिक्त असल्याने व काही ज्येष्ठ गुडघ्याला बाशिंग लावून बसल्याने संघटनेत गटबाजी वाढू न देता लवकरात लवकर मातोश्रीने जिल्हाप्रमुख देण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.