नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रस्तावित निसर्ग केंद्राच्या कामामुळे बंद होऊ शकणार्या नवी मुंबई परिसरातील दगडखाणीना जीवदान मिळाले आहे. या दगडखाणींवर 10 हजार कामगार प्रत्यक्ष काम करीत असून त्यावर आधारित उद्योगांवर किमान 25 हजार कुटुंबे जगत आहेत. नवी मुंबईतील दगडखाणी बंद झाल्यास किमान 30 ते 35 हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. यासाठी नवी मुंबई दगडखाण चालक-मालक संघटनेने ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना विनंती केली होती.
खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने सिडकोचे व वनविभागाचे वरिष्ठ अधिकार्यांसोबत सोमवारी सिडको भवन येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सिडकोच्या नियोजन विभागाच्या अधिकारी अनुराधा मैडम, निसर्ग केंद्राचे काम पाहणारे अनारसे तसेच नवी मुंबई दगडखाण चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, उपाध्यक्ष नरेश गौरी, चिटणीस दिलीप मढवी, सरचिटणीस निलेश किकावत यांच्यावर संघटनेचे 50 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबईतील अनेक प्रकल्पग्रस्तांनी येथे दगडखाण व्यवसायात जम बसवला असून त्यांचे उदरनिर्वाहाचे सधन दगडखाणी आहेत. दगडखाणीसाठी देण्यात आलेली जमीन केंद्रीय वनखात्याच्या अख्यारीत येत असून सिडकोकडे दीर्घमुदतीच्या भाडे तत्वावर हस्तांतरीत करण्यात आली. 1999 साली हा करार संपल्यावर सिडको व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 5 वर्षासाठी व पुढे 20 वर्षासाठी म्हणजे 5-10-2006 ते 30-9-2026 या काळासाठी वाढवण्यात आला. त्यासाठी 2028 पर्यंतचे भाड्याचे पैसे देखील संबंधित दगडखाण मालकांनी सिडकोकडे आगावू भरले असल्याचे खासदार राजन विचारे यांनी निदर्शनास आणून दिले. एकूण रूपये 16.20 लाख सिडकोकडे भरणा करण्यात आला असून स्वामित्व धनापोटी दीर्घ मुदतीचा करार करून जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडेही लाखो रूपयांचा महसूल जमा करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सदर जागा केवळ दगड्खाणीच्या वापरासाठी आणण्यात यावी असे केंन्द्रीय वनखात्याच्या करारात नमूद करण्यात आले असून, तशी परवानगी केंन्द्रीय वन व पर्यावरण खात्यातर्फे देण्यात आली असल्याचे दगडखाण मालक संघटनेने बैठकीत निदर्शनास आणून दिले.
तसेच सामाजिक जाणीवेतून रोहा जिल्हा रायगड येथे 140 हेक्टर जागा सामाजिक वनीकरणासाठी दगडखाण चालकमालक संघटनेने उपलब्ध करून दिल्याची पदाधिकार्यांनी सांगितले.
दगडखाण परिसरात होऊ घातलेल्या नवी मुंबई निसर्ग परिचय केंद्रामुळे दगडखाणीचे काम थांबवण्याचा आदेश सिडकोने दिला होता. मात्र दिर्घमुदतीच्या करारावर दगडखाणी साठी दिलेली जागा अचानक काढून घेतल्यास तो अटी व शर्तीचा भंग होईल, तसेच पर्यायाने व्यवसायावर अवलंबून असलेल्या 25 हजाराहून अधिक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बंद होईल त्यामुळे सरसकट सर्व दगडखाणी बंद न करता उर्वरित जागेवर निसर्ग उद्यानाचे काम करावे अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी केली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी खासदारांची सूचना योग्य असल्याचे निर्देश देत निसर्ग उद्यानाच्या कामामुळे इतर कोणाचेही उदरनिर्वाहाच्या साधनावर बंदी येणार नाही अशी ग्वाही दिली.
खासदार राजन विचारे यांनी घेतलेल्या पुढाकाराने व त्यांच्या सूचनेमुळे नवी मुंबई परिसरातील दगडखाणीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.