सुजित शिंदे
नवी मुंबई : येवू घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई कार्यक्षेत्रात लोकनेते गणेश नाईकांची राजकीय भूमिका निर्णायक व महत्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार की स्वबळावर शिवशक्तीचा प्रयोग अवलंबणार अशा विविध चर्चा व अफवा नवी मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. सोमवार, दि.23 फेब्रुवारी रोजी गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांकरीता वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात सभेचे आयोजन केले असून या वेळी गणेश नाईकांची आगामी वाटचाल स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.
दीड महिन्यापूर्वीच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी मेळावा घेवून उघडपणे पक्ष सोडण्याची व नवीन भूमिका घेण्याची मागणी केली होती. या मेळाव्यास लोकनेते गणेश नाईक उपस्थित नसले तरी माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या भावना गणेश नाईकांपर्यत पोहोचविण्याचे संजीव नाईक यांनी मान्य केले होते.
नवी मुंबई हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने लोकनेते गणेश नाईकांचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात परिचित होता. 1990 नंतर गणेश नाईक बोले अन् नवी मुंबईचे राजकारण डोले अशी येथील राजकीय परिस्थिती होती. लोकसभा निवडणूकीनंतर राजकीय पार्श्वभूमी बदलत गेली. नरेंद्र मोदी लाटेत ठाणे लोकसभा मतदारसंघात संजीव नाईकांना तब्बल 2 लाख 84 हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. निवडणूकीतील पराभवाचे शल्य नाईक समर्थकांना बोचले नाही. पण नवी मुंबई शहरातून तब्बल 47 हजार मतांची पिछाडी ही बाब नाईक समर्थकांच्या जिव्हारी लागली. तेथूनच नवी मुंबईच्या बदलत्या राजकीय प्रवाहाचे संकेत प्राप्त झाले. अमराठी घटक व परप्रातिंय टक्का हा पूर्णपणे भाजपामय झाल्याचे उघडउघड पहावयास मिळाले.
विधानसभा निवडणूकांमध्ये लोकनेते गणेश नाईक पडझड सांभाळतील व पुन्हा नवी मुंबईचा गड बोनकोडेमय होईल असा आशावाद भोळ्याभाबड्या नाईक समर्थकांकडून उघडपणे व्यक्त केला जात होता. पण घडले विपरीतच. संघाचे कर्णधार असलेल्या गणेश नाईकांना 1400 मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. ऐरोलीतून संदीप नाईकांनी साडेआठ हजारापेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला असला तरी या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश नाईक यापेक्षा संदीप नाईकांच्या व्यक्तिगत रणनीतीचाच अधिक भाग होता. संदीप नाईक सावध राहीले. मतदारसंघाशी संपर्क ठेवला. मतदारसंघाचा अधिकांश भाग पायाखाली पिंजून काढला. कामे करत गेले. निवडणूक काळात सावलीवरदेखील विश्वास न ठेवता दिवसरात्री मतदारसंघातील लहानातल्या लहान घडामोडीचा आढावा संदीप नाईकांनी घेतला. त्यामुळेच संदीप नाईकांनी ऐरोलीच गड राखला असला तरी दादांच्या पराभवामुळे नवी मुंबईतील एक गड आला असला तरी सिंह गमावला अशीच नैराश्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाईक समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.
राजकारणात निष्ठा व श्रध्दा , नि:स्वार्थीपणा या बाबी गौण असल्याचा प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसमधील बोनकोडेकरांनाही निश्चितच आला असणार. कालपरवापर्यत दादा,खासदारसाहेब, भाई करणारी मंडळी विधानसभा निवडणूकीनंतर ताई व वैभवशेठच्या नावाचा खासगीत गुणगौरव करू लागली. कालपरवापर्यत बालाजीच्या तळमजल्यावर उभे राहण्यात समाधान मानणार्यांच्या गाड्या बेलापुरच्या गौरवसमीप उभ्या राहू लागल्या आहेत. इतकेच कशाला, दीड महिन्यापूर्वी दादांनी पक्ष बदलावा, नवीन भूमिका घ्यावी असा टाहो फोडणार्यातील काही जण कालपरवा शिवबंधनातदेखील अडकले गेले आहेत.
दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार की बाहेर जाणार की शिवशक्तिची पुर्नस्थापना करून स्वबळावर ताकद आजमावणार या प्रतिक्षेत अनेकजण कुंपनावर असले तरी आपल्या राजकीय सोयीसाठी प्रभागातील तिकीटीसाठी अनेकांनी ताई व शेठजींशी संपर्क करून आपला होकारही एव्हाना कळविला आहे. फक्त दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपा वा सेना पर्याय स्विकारल्यास आपली अडचण होवू नये यासाठी तुर्तास आणखी काही दिवस दादांसमवेत राहण्याचा निर्णय अनेक राजकीय घटकांनी घेतला आहे.
गतसोमवारी, दि. 16 फेब्रुवारी रोजीच गणेश नाईक कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणार होते. पण त्याचदिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर प्रस्थ आर.आर.पाटील यांचे निधन झाल्याने ही बैठक स्थगित करण्यात आली. 23 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 5 वाजता होणार्या या बैठकीकडे महाराष्ट्रातील राजकीय धुरींणाचे लक्ष लागून राहीले आहे.