मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्राचा कारभार ग्राम पातळीपासून मराठीतच चालविण्याचे सरकारचे धोरण आहे. शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा प्रथम भाषा म्हणून शिकविली जाते. उच्च शिक्षण अभ्यासक्रमातही अधिकाधिक विषय मराठीतूनच शिकविले जावेत असे धोरण आहे. प्रगत अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत नसतात त्याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ या नावाची एक निमसरकारी संस्था सुरु केली आहे. त्याव्दारे विविध विषयांतून अभ्यासग्रंथ सुरुवातीच्या काळात मराठीतून प्रकाशित केले गेले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृतीमंडळ या संस्थेव्दारे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या विषयी विविध प्रोत्साहानात्मक कार्यक्रमाचे नियोजनकरुन त्याची अंमलबजावणी केली जाते. मराठी विश्वकोषाची निर्मिती पुस्तक प्रदर्शने, साहित्य संमेलने, चर्चा, परिषदा, परिसंवाद, मराठीविषयक लेखन व वकृत्वस्पर्धा, मराठी पुस्तकांना शासकीय व स्वयंसेवी संस्थांचे विविध पुरस्कार हे सर्व मराठी भाषेसाठी आशादायी 27 फेब्रुवारी हा वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारास आली. मराठी भाषा ही महाराष्ट्र व गोवा या राज्यांची राजभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी 1000 वर्षापासून आस्तित्वात शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून शब्दकोश निर्मिती केली जाते. भारतीय संविधान अर्थसंकल्प यांचे मराठीत अनुवाद केले जातात. शासन व्यवहार कोष, प्रशासनिक लेखन, प्रशासन वाक्य प्रयोग, राजभाषा परीचय यासारखी पुस्तके प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने मराठीच्या वापरासाठी तयार केली आहेत. अमराठी भाषिकासाठीही मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षा घेतल्या जातात. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणाचा परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय संबंधापूरताच मर्यादीत असत नाही, तर एकूणच देशाच्या चलनवलनावर विनिमयावर आणि पर्यायाने सांस्कृतिक जीवनावरही त्याचा परिणाम होतो. माहिती तंत्रज्ञानाचा जीवनाच्या सर्व प्रणालीवर होणार्या परिणामामुळे मराठीचा प्रभाव कमी होऊन इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. सर्व संगणक प्रणालीवर इंग्रजी भाषेचाच प्रभाव आहे.
स्वाभाविकपणे मातृ भाषाच काय, असा प्रश्न आपल्या मनात येतो परंतू त्या त्या देशाच्या राष्ट्रभाषाही आता इंग्रजीचा प्रभाव थोपवू शकणार नाहीत. आयुर्विम्याला पर्याय नाही, तसाच इंग्रजीलाही पर्याय नाही. असे अनेकांना वाटत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची बेसुमार वाढ होत आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना समाजाकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. अगदी नामवंत शिक्षण संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे वर्ग ओस पडत चालले आहेत आणि प्रत्येक वर्गाच्या काही तुकड्या बंद केल्या जात आहेत. दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वाढता वापर आहे. दुकानाच्या पाट्या, जाहिराती, निवेदने, संवाद, संभाषणे, लेखन या सर्व माध्यमाव्दारा
इंग्रजीने मराठीवर कसे आक्रमण केले आहे. याची जागोजागी आणि क्षणोक्षणी प्रचिती आपल्याला येत आहे.
आपल्या ज्ञानग्रहणाची आणि आकलनाची सुरुवात ही मातृभाषेपासूनच होत असते. जन्माला येताना कोणतेही मूल कोणतीच भाषा बोलत नसते. आईची, वडीलांची, भावाची, भोवतालच्या माणसांची भाषा त्याच्या कानावर पडते आणि मूल बोलू लागते. ज्यांची मातृभाषाच इंग्रजी आहे. त्यांच्याबाबत इंग्रजीला पर्याय नाही. हे विधान सत्य आहे. पण जगातल्या किती लोकांची मातृभाषा इंग्रजी आहे ? याचा विचार करायला पाहिजे.
जर्मनी, फ्रांस, जपान यासारख्या देशातील लोकांची मातृभाषा अनुक्रमे जर्मनी, फ्रेंच, जपानी अशी आहे. भारतात तर बर्याच लोकांची मातृभाषा हिंदी आहे. त्या त्या प्रांतानूसार त्या त्या प्रांतातील लोकांची मातृ भाषा मराठी, गुजराती, कानडी, तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली अशी आहे. उद्याचे जग फक्त इंग्रजीचेच असेल. प्रादेशिक भाषांना आपल्या जीवनात काहीच स्थान असणार नाही. असे समज गैरसमज आहेत. पण वस्तूस्थिती तशी नाही. काही ठराविक क्षेत्रांसाठी इंग्रजी आवश्यक असली तरी दैनंदिन व्यवहारासाठी मातृभाषाच आवश्यक आहे. तुम्हाला हवेत उडायाचे असेल तर, इंग्रजीचे पंख लावलेच पाहिजे हे सत्य आहे. सर्व महाराष्ट्रीय लोकांनी आपल्या मातृभाषेचा आदर करुन तिचा वारसा जपण्याचे कार्य केले तर, मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा म्हणून ओळखली जाईल.
– शैलजा देशमुख
विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण विभाग, नवी मुंबई