नवी मुंबई : दूषित व रासायनिक पाण्यामुळे नवी मुंबईतील खाडीमधील मासेमारी धोक्यात येवू लागल्याने स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या भवितव्याच्या गंभीर समस्येकडे केंद्र शासन व राज्य शासन, महानगरपालिका, सिडको आदी प्रशासनदरबारी लेखी पाठपुरावा करत सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील खाडी शुध्दीकरण मोहीम युध्दपातळीवर हाती घेण्याची मागणी केली आहे.
ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आदींना लेखी निवेदन सादर करून नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील महत्वपूर्ण समस्येकडे प्रशासनातील सर्व घटकांचे लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे.
नवी मुंबईतील खाडीतील वाढत्या प्रदूषणाबाबत आणि स्थानिक आगरी – कोळी समाजाचे अस्तित्वावर निर्माण झालेल्या संकटाबाबत संबंधितांचे लक्ष निवेदनातून वेधताना शासकीय गरजेपोटी नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आणि शासनाच्या माध्यमातून नवी मुंबई शहर विकसित झाले. येथील स्थानिक आगरी-कोळी समाजाचा नवी मुंबईच्या निर्मितीमध्ये फार मोठा त्याग व योगदान आहे. नवी मुंबई विकसित करताना स्थानिक आगरी-कोळी समाजाने केलेल्या त्यागाची व योगदानाची प्रशासनाकडून फारशी जाणिव न ठेवली गेल्याने नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाला आज अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे भगत यांनी म्हटले आहे.
स्थानिक आगरी – कोळी समाजाची उपजिविकाच हीच मुळी खाडीतील मासेमारीवर आहे. खाडीत जावून मासेमारी करणे, स्थानिक बाजारात माशांची विक्री करणे आणि त्यातून आपल्या परिवाराची उपजिविका भागविणे हाच येथील कोळी समाजाचा दैनंदिन जीवनपट आहे. नवी मुंबईत कारखाने आले, कंपन्या आल्या. नवी मुंबई विकसित झाली, प्रगतीपथावर आली. केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे पुरस्कार मिळत गेले. वरकरणी हे किती सुखद चित्र आहे. परंतु नाण्याला दोन बाजू असतात. नवी मुंबईची दुसरी बाजू भयावह आहे. या बाजूकडे आपण वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा लवकरच नवी मुंबईतील स्थानिक भूमीपुत्र असलेला आगरी – कोळी समाज आपणास कुपोषित व उपासमारीने नष्ट झालेला पहावयास मिळेल. हे दृश्य निर्माण होवू नये यासाठी आपल्या माध्यमातून आपण वेळीच पावले उचलणे प्रशासनास भाग पाडावे यासाठी मोठ्या अपेक्षेने आपणास हे निवेदन सादर करत असल्याचे नामदेव भगत यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईतील रासायनिक कंपन्यांमुळे, कारखान्यामुळे गेल्या तीन-साडे तीन दशकात नवी मुंबईतील खाडी दूषित झाली आहे. एकेकाळी होडी भरून मासे आणणार्या आगरी – कोळी समाजाला आता खाडीत गेल्यावर पाटीभर मासेही मिळणे अवघड होवून बसले आहे. खाडीमध्ये येणार्या गटारे व नाल्यातील दूषित व रसायनिक पाण्यामुळे या खाडीत आता मासेमारी करणे व मासे मिळणे अवघड होवून बसले आहे. नवी मुंबईतील मासे खवय्यांना आता भाऊच्या धक्क्यांवरून व कुलाबा मार्केटमधून मासे आणून आपली इच्छा पूर्ण करावी लागत आहे. स्थानिक आगरी – कोळी समाजाच्या अस्तित्वासाठी आणि नवी मुंबईतील मासे खवय्यांना नवी मुंबईच्या खाडीतीलच स्वच्छ पाण्यात मुबलक मासे उपलब्ध होण्यासाठी शक्य तितक्या लवकर खाडी शुध्दीकरण मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील सर्व रासायनिक कंपन्या व कारखान्यांची पाहणी करून त्यांना त्यांच्या पाण्यावर प्रक्रिया करूनच स्वच्छ पाणी खाडीत सोडण्यास भाग पाडावे. या कंपन्या व कारखाने तसे करतात की नाही याबाबत वरचेवर तपासणी करण्यात यावी. खाडीतील गाळ, कचरा हटवून पाणी शुध्द करण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नवी मुंबईकरांना खाडीतील पाणी शुध्द दिसल्यास बोटींग व्यवसाय व पर्यटनालाही चालना मिळून नवी मुंबईकरांनाही रोजगार मिळेल. खाडीत शुध्द पाणी असल्यास मासे उपलब्ध होवून स्थानिक आगरी – कोळी समाजाची आर्थिक गरज भागून नवी मुंबईतील मासे खवय्यांना त्वरीत ताजे मासे स्थानिक मार्केटमध्येच उपलब्ध होतील असे नामदेव भगत यांनी निवेदनातून संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयास केला आहे.
खाडी शुध्दीकरण मोहीम केंद्र सरकार, राज्य सरकार, सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त माध्यमातून लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. खाडीतील दूषित व रासायनिक पाण्यामुळे स्थानिक आगरी – कोळी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांचे आर्थिक राहणीमानही खालावले आहे. या समस्येचा गांभीर्याने सर्वागिण विचार करून लवकरात लवकर संबंधितांकडे पाठपुरावा करून आपल्या माध्यमातून समस्येचे निवारण करावे अशी नामदेव भगत यांनी निवेदनातून ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आदींना विनंती केली आहे.