* आ. संदीप नाईक यांचा इशारा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलेल्या 3लस्टर म्हणजेच समुह विकास धोरणामध्ये येथील एकही घटक उपेक्षित राहिला तर आम्ही संघर्ष करू, असा इशारा ऐरोली विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.
राज्य विधीमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये आ. संदीप नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडून प्रकल्पग्रस्तांनी आणि इतर घटकांनी मूळ गावठाण आणि गावठाण विस्तारामध्ये गरजेपोटी केलेली रहिवासी तसेच वाणिज्यिक बांधकामे नियमित करण्यासाठी विषय उपस्थित केला होता. या औचित्याच्या मुद्दावर आज चर्चा होणे अपेक्षित असताना त्या अगोदरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहामध्ये नवी मुंबईसाठी क्लस्टर योजना लागू करण्याचा निर्णय घोषित केला.
याविषयी प्रसिध्दी माध्यमांनी आ. संदीप नाईक यांची प्रतिक्रिया विचारली असता आ. नाईक म्हणाले की, आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही. मात्र या योजनेमध्ये एकही घटक उपेक्षित राहता कामा नये, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात मी मांडलेला औचित्याचा मुद्दा चर्चेला आला असता तर या विषयावर सविस्तर ऊहापोह करता आला असता. नवी मुंबईसाठी कोणतीही योजना लागू करताना सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. 3लस्टरबाबत कोणी श्रेय घ्यायचे, हा आमच्यासाठी गौण मुद्दा असून प्रकल्पग्रस्त आणि गाव तसेच गावठाण क्षेत्रातील सर्व घटकांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे ते म्हणाले. आमची ही भूमिका विधीमंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नवी मुंबई वसविताना सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या. या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंडांचे वितरण करण्यास सिडकोकडून विलंब झाला. काळाच्या ओघात प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली. त्यामुळे त्यांनी गरजेपोटी घरे आणि उदरनिर्वाहासाठी वाणिज्यिक बांधिकामे केली. नवी मुंबई पालिका क्षेत्रात अशा प्रकारच्या 30 गावांचा समावेश असून या गावांच्या गावठाणांच्या भोवती विस्तारीत गावठाणाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रातही प्रकल्पग्रस्तांनी बांधकामे केली आहेत. या गावांमधील गावठाण आणि विस्तारीत गावठाणांमधील लोकसंख्या सुमारे 2 लाख 56 हजार एवढी झाली आहे. त्यामुळे गरजेपोटी बांधलेली ती सर्व बांधकामे नियमित करावीत, या मागणीसाठी लोकनेते गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी यापूर्वी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील आ. संदीप नाईक यांनी अलिकडेच या विषयासंदर्भात एक पत्र पाठविले होते. या पत्राला मुख्यमंत्री यांनी सकारात्मक उत्तरही दिले होते (जावक क्र.मु.म.च./14/ 752877/752878) आणि पुढील कार्यवाही नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना करण्यास सूचित केले होते. जनभावना लक्षात घेऊन लोकनेते गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी समुह विकास योजनेवर जनतेच्यावतीने अभ्यासपूर्ण मुद्दे सूचना आणि हरकतींच्या स्वरुपात मांडले आहेत. त्यावरही शासनाच्यावतीने सुनावणी घेण्यात आलेली नसून 3लस्टर योजना जाहीर करण्यात आलेली आहे. लोकप्रतिनिधींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न दिल्यामुळे नवी मुंबईतील जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.