संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : अवघ्या एक महिन्याने होणारी नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची व प्रतिष्ठेची ठरणार आहे. शिवसेना वारू वेगाने दौडत असल्याने व अन्य पक्षीय नाराजांना भाजपा चुचकारू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पालिकेत पुन्हा एकवार सत्ता मिळण्यासाठी जनाधाररूपी विश्वासाच्या अग्निपरिक्षेचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेच्या तिसर्या व चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे बहूमत मिळाले होते. नवी मुंबईचे राजकारण म्हणजे गणेश नाईक बोले अन् नवी मुंबई डोले अशा स्वरूपात होते. नवी मुंबई परिसर हा महाराष्ट्राच्या राजकारणात गणेश नाईकांचा पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीचीच पताका पाच वर्षापूर्वी उंचावल्याने नवी मुंबई कार्यक्षेत्रात अन्य पक्षीयांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असे. पण एप्रिल 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकानंतर नवी मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत गेला. लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 47 हजार मतांनी पिछाडीवर रहावे लागले. विधानसभा निवडणूकीत बेलापुर मतदारसंघातून लोकनेते गणेश नाईकांना भाजपाच्या सौ. मंदा म्हात्रे यांनी पराभूत केले. ऐरोली मतदारसंघात शिवसेना-भाजपा मतदानाच्या विभाजनाचा लाभ उचलत संदीप नाईक साडे आठ हजार मतांनी विजयी झाले. या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा संदीप नाईकांच्याच परिश्रमाचा अधिक वाटा होता.
नवी मुंबई शिवसेनेचा विचार करता पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणूकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विजय चौगुले पुन्हा एकवार आक्रमकरित्या संघटनाबांधणीत सक्रिय झाले आहे. खासदार राजन विचारेंच्या नवी मुंबई भेटी वाढल्या आहेत. उपनेते विजय नाहटा यांच्या प्रशासकीय ज्ञानाचा शिवसैनिकांना फायदा भेटल्याने शिवसैनिकांच्या आक्रमणाला धार चढली आहे. त्यातच सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, एम.के.मढवी यांच्यासह अनेक नगरसेवक शिवसेनेत सहभागी झाले आहेत.
भाजपाने बेलापुरची जागा सौ. मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून जिंकल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा व पदाधिकार्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परप्रातिंय व अमराठी मतदारांवर अद्यापि मोदी प्रभाव कायम असल्याचे पहावयास मिळत आहे. वाशी सेक्टर 17 चे नगरसेवक संपत शेवाळे, सानपाडा नगरसेवक रामचंद्र माटे, नेरूळचे नारायण पाटील यांच्यासह काही नगरसेवक व राजकारणातील रथी-महारथी मोठ्या संख्येने भाजपामध्ये सहभागी होवू लागले आहे. भाजपा यावेळी प्रथमच आक्रमकपणे महापालिका निवडणूकीत सहभागी होणार असल्याने शिवसेनेपाठोपाठ भाजपाच्या वादळाचाही राष्ट्रवादी काँग्रेसला सामना करावा लागणार आहे.
काँग्रेसचा फारसा प्रभाव नसला तरी मोजक्या मतदारसंघात त्यांची हमखास निवडून येणारे उमेदवार असल्याने दुहेरी आकडा गाठणे काँग्रेसला अवघड जाणार नाही. शेतकरी कामगार पक्षाने भरत जाधवांच्या माध्यमातून नवी मुंबईत सक्रियता वाढविली असून काही मतदारसंघ लढविण्याची शेकापची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक लढविण्याविषयी मनसेचे अद्यापि तळ्यात-मळ्यात असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे.
शिवसेना-भाजपाकडून प्रचारातील मुद्दे व प्रचारातील तंत्र याबाबत आक्रमकता दाखविली जाण्याची शक्यता असल्याने या आक्रमणाचा राष्ट्रवादी काँग्रेस कसा सामना करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढीस लागली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोरबे धरण, मालमत्ता कर याचा अपवाद वगळता अन्य कोणतेही सांगितले जात नाही. मोरबे धरण व मालमत्ता कर वगळता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सांगण्यासारखे काहीही नसल्याचे विरोधकांकडून उपहासाने सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून महापालिकेत सत्तेवर असल्याने विकासकामातील अपयशांचे व नागरी समस्यांचे खापर विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले जाण्याची शक्यता आहे. अडीच एफएसआयचा मुद्दा श्रेय घेण्यात भाजपाने यश मिळविले आहे. कंत्राटी कामगारांना समान कामाला समान न्याय, सहावा वेतन आयोग, कायम सेवा याबाबतच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडे कंत्राटी कामगारांसह नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेले फुटीचे ग्रहण, निष्ठावंतांनीच मोक्याच्या क्षणी साथ सोडल्याचे शल्य, विजय नाहटाची प्रचारातील आक्रमकता, भाजपाकडून केला जाणारा विकासाचा दावा, महापालिका कार्यक्षेत्रातल समस्या या पार्श्वभूमी निवडणूकीला राष्ट्रवादी काँग्रेस कशी सामोरी जाणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.