संजय बोरकर
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहीलेल्या प्रभाग ८५ व ८६ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला गड कायम राखला असून प्रभाग ८५ मध्ये तब्बल ९५०च्या आसपास आणि प्रभाग ८६ मध्ये ४००च्या आसपास मतांनी विजय मिळवित हा परिसर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्रमांक ८५ व ८६मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही प्रभागातील निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची केली होती. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची कोणतीही चौकसभा व जाहीरसभा न होता कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक या जागा राखल्या. प्रचारअभियानात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केवळ विकासकामांच्या मुद्यावर भर देण्यात आला. एकीकडे कुकशेत गावामध्ये आणि नेरूळ सेक्टर दहामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सुरज पाटील यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि दुसरीकडे सारसोळे गाव व सेक्टर सहा परिसरातील बकालपणा हीच वस्तूस्थिती मतदारांच्या निदर्शनास आणून दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते व माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या प्रचार रॅलीला सेक्टर सहा परिसरात समाजमंदीरालगत जो अडथळा आणण्याचा प्रयास केला, हा प्रयास येवू घातलेल्या विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयास असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थानिक रहीवाशांच्या मनावर बिंबविण्यात आले.
निवडणूक अर्ज भरतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सौ. सुजाता सुरज पाटील आणि सौ. जयश्री ठाकूर यांनी खाडीअंतर्गत भागातील बामनदेवाचे दर्शन घेतले होते. विजयी झाल्यावर सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही महिला उमेदवारांनी बामनदेवाचे दर्शन घेतले.
विजयानंतर आपल्यावर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे जबाबदारीची जाणिव वाढली असून मतदारांच्या विश्वासाला आपण विकासकामांतून पात्र ठरण्याचा प्रयास करण्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया सौ. सुजाता सुरज पाटील यांनी व्यक्त केली.