संजय बोरकर : ९८६९९६६६
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाअंतर्गत त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात २२.५% योजनेअंतर्गत देण्यात येणार्या भूखंडाचे सोने कसे करता येईल याबद्दल एक उदाहरण म्हणून सिडको महामंडाळाने या प्रकल्पग्रस्तांसहित पुण्यातील मगरपट्टा सिटीला भेट दिली. यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी एक सादरीकरण व शंका निरसनासाठी प्रश्नोत्तरांचे सत्र ठेवण्यात आले होते. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. व्हि. राधा व मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले.
पुण्यातील मगरपट्टा सिटी म्हणजे एका शहरात वसवलेले शहर, जे अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त आहे. हे शहर कोणत्याहि बांधकाम व्यावसायिक किंवा सरकारने घडवले नसून हडपसर येथे शेकडो वर्षं रहात असलेल्या मगर कुटुंबियांनी एकत्र येऊन घडवलेले नगर आहे. ४०० एकरवर वसलेले हे शहर १२३ मगर कुटुंबियांनी एकत्र येऊन वसवले आहे. या ४०० एकर जमिनीवर मगर आडनाव असलेली शेकडो शेतकरी कुटुंबे अनेक वर्षांपासून रहात आली आहेत. प्रत्येकाच्या मालकीची जमिन विकून प्रत्येक कुटुंबाने एकहाती पैसे घेण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन जर जमिनीचा विकास केला व एक शहर वसवले तर त्याची भविष्यात खूप चांगली फळे मिळतील या दूरदृष्टीतून मगर बांधवांनी एकत्र येऊन या शहराची स्थापना केली. या शहरामध्ये निवासी घरे, दुकाने, सुपर मार्केट्स, आयटी पार्क, शाळा, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, बागा, मैदाने, इ. अद्ययावत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीला मगरपट्टा सिटीमुळे ७०,००० नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ज्यांच्या जमिनीवर निवासी संकुल व इमारती बनवण्यात आल्या आहेत, त्यांना ते विकले गेल्यानंतर त्यांतून अर्थार्जन झाले, काही जणांना वाणिज्यिक हेतूसाठी दिलेल्या जमिनीतून नियमितरित्या मिळकत मिळत आहे. मगरपट्टामधील ‘आयटी हब’ ही मगरपट्टा कंपनीच्या मालकीची असल्यामुळे दर महिन्याला प्रत्येक भागीदाराला भाड्याच्या रूपात ठराविक रक्कम मिळते. यातून एक फायदा असा झाला की प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या जमिनीच्या हिश्श्यानुसार मोबदला मिळाला व अजूनही मिळत आहे. हीच गोष्ट जमिनी विकून एकहाती पैसा मिळाल्यावर शक्य झाली नसती. आता ही मिळकत वर्षानुवर्ष अखंड सुरू रहाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनासुद्धा देण्यात येत असलेल्या २२.५% भूखंडाची लागलीच विक्री करून एकहाती पैसा मिळवण्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे शहर विकसित करावे असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सहव्यवस्थाकीय संचालिका श्रीमती. व्ही. राधा यांनी वेळोवेळी सुचवले आहे. ज्यावेळी हे विमानतळ बांधून तयार होईल तेव्हा प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्या भूखंडांची किंमत आकाशाला भिडणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन स्वतःच शहर वसावायचे किंवा भूखंड विकसित करायचा म्हणजे नेमके काय करायचे याची कल्पना त्यांना यावी म्हणून प्रकल्पग्रस्तांसोबत मगरपट्टा सिटीला भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याशिवाय नैना सिटीचा देखील भविष्यात विकास करण्यात येणार आहे. मगरपट्टा सिटीचा विकास ज्याप्रमाणे झाला आहे, त्या धर्तीवर नैना सिटीचा विकास करता येईल का किंवा कसा करता येईल हे जाणून घेणे हा देखील या भेटीचा उद्देश होता.
शेतकरी एकत्र येऊन एखादे शहर वसवणे शक्यच नाही, असा सूर मगरपट्टा सिटीच्या बाबतीत कायम आळवण्यात येत होता. त्यामुळे शासनाला ही गोष्ट पटवून देण्यापासून आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी मगरपट्टा बांधवांना जवळ जवळ ५ वर्षं कष्ट घ्यावे लागले. त्यानंतर मगरपट्टा सिटी विकसित करण्यासाठी १५ वर्षे लागली. एकूणच हे खूप अवघड होते. परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत उलट आहे. याठिकाणी शासन स्वतःहून प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन शहर विकसित करण्याबद्दल सुचवत आहे. तेव्हा या गोष्टीचा लाभ त्यांनी जरूर घ्यावा असे मत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. व्हि. राधा व मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी व्यक्त केले. विमानतळ बनल्यानंतर जमिनीच्या किंमती आकाशाला भिडल्यानंतरदेखील शक्यतो त्या बांधकाम व्यावसायिकांना न विकता स्वतःच त्यांचा विकास करा, असे प्रतिपादनदेखील श्रीमती.व्ही. राधा यांनी केले.
प्रकल्पग्रस्तांनी सतिश मगर यांना याबाबत अनेक प्रकारच्या शंका विचारल्या. त्यांनीदेखील प्रकल्पग्रस्तांच्या शंकांचे निरसन केले. अशा प्रकारचे शहर विकसित करणे ही गोष्ट तेव्हाच सोपी होते जेव्हा सर्व जण सामोपचाराने एकत्र येतात, हा मूलमंत्र श्री. मगर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला. त्यामुळे सर्वप्रथम प्रकल्पग्रस्तांनी आपापसात चर्चा करून एकत्र येऊन यादृष्टीने विचार करावा असे मगर यांनी सुचवले. आज शेतकरी जर काळा प्रमाणे बदलला नाही तर त्याची भविष्यात दैना होऊ शकते. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे त्याचा त्यांनी योग्य वापर करावा असे मत मगर यांनी व्यक्त केले. स्वतः जमिनीचे मालक असूनही केवळ शिक्षणाअभावी ड्रायव्हिंग, शिपाई यासारखी कामे करावी लागतात तर आपल्या आई-बहिणींना घरोघरी धुण्याभांड्याची कामे करावी लागतात. भविष्यात अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून वेळीच जागरूक होऊन प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन मगर यांनी केले. भविष्यातदेखील प्रकल्पग्रस्तांना गरज पडल्यास याबाबत मार्गदर्शन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारची शहरातील शहरे विकसित केली गेली आहेत. त्या ठिकाणी देखील भेट देऊन आपण प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करू असे सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. व्ही राधा यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांनी मगरपट्टा सिटीमध्ये फिरून या गोष्टीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.
सिडको महामंडळाने विकासा बरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा नेहमीच विचार केला आहे. त्यासाठीच सिडकोने स्वतः पुढाकार घेऊन ही भेट आयोजित केली होती. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात सिडको नेहमीच अग्रेसर राहिले आहे.