संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : निवडणूक निकालानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा एकवार आपला मित्रपक्ष कॉंग्रेसच्या मदतीने महापालिकेच्या पाचव्या सभागृहात सत्तासंपादन करणार व शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळावी लागणार हे निवडणूक निकालानंतर लगेचच स्पष्ट झाले. शिवसेनेचे संख्याबळ दुप्पट झाले असले तरी विरोधी पक्षनेतेपदाकरीता शिवसेनेकडे रथी-महारथी उपलब्ध असल्याने या पदावर कोणाची वर्णी लावावी याकरीता ‘मातोश्री’समोर निश्चितच पेचप्रसंग पडला असणार.
सत्तासंपादनाकरीता ५६ चे संख्याबळ आवश्यक असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे स्वत:चे ५२ व अपक्षमित्र ३ जमेस धरता ५५ नगरसेवक उपलब्ध होते. नेरूळ आणि घणसोलीतील नगरसेवक जमेस धरता बहूमताचा ५७ आकडा जमविणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अशक्य नव्हते. तथापि कोपरखैराणेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी असणार्या एका अपक्ष नगरसेवकाकरता ठाण्याहून खुद्द खासदार मोर्चेबांधणीकरता मैदानात उतरल्याने राजकारणात मुरब्बी असणार्या लोकनेते गणेश नाईकांनी संभाव्य घोडेबाजार, अपक्षांची मनधरणी व फोडाफोडीचे राजकारण हा गैरप्रकार टाळण्यासाठी थेट मित्रपक्ष असणार्या कॉंग्रेसशी बोलणी केली. सलग पाच वर्षे उपमहापौर आणि विषय समित्यांचे सभापतीपद कॉंग्रेसला देण्याचे मान्य केले. त्यामुळे राजकारणातील संभाव्य अनागोंदी कारभाराला अनायसे पायबंद बसला. शिवसेना वाढत्या संख्याबळामुळे सभागृहात मातब्बर पक्ष म्हणून नावारूपाला आला आहे.
विरोधी पक्षनेतेपदाकरता शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, सिडकोचे माजी संचालक व कोळी समाजाचे मातब्बर नेते नामदेव भगत, राकट व कणखर पहाडी आवाजाचे शिवराम पाटील आणि बोनकोडेला त्रासदायक ठरण्याची शक्यता असणारे एम.के.मढवी, गतसभागृहातील विरोधी पक्षनेत्या सौ. सरोज पाटील या पाच नावांची शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेने निवडणूकपूर्व युती केलेल्या भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने शिवसेना-भाजपा युतीला सत्तेपासून वंचित रहावे लागले. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतून एक आमदार आणणार्या भाजपाला बेलापुर मतदारसंघातून केवळ चार आणि ऐरोली मतदारसंघातून फक्त दोन उमेदवार निवडून आणता आले. ऐरोली विधानसभा भाजपाकडून लढणार्या वैभव नाईकांना आपल्या होमपीचवर आपल्या पत्नीलादेखील निवडून आणता आले नाही.
शिवसैनिकांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार चर्चा सुरू असली तरी विजय चौगुले, नामदेव भगत आणि शिवराम पाटील या तीनपैकी कोणा तरी एकालाच ‘मातोश्री’वरून पसंतीची मोहोर उमटण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांच्या विचारविनिमयातून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय ‘मातोश्री’ घेण्याची शक्यता आहे. तथापि तिकीट वाटप प्रक्रियेत शिवसेन उपनेते विजय नाहटा यांना मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांच्या व शिवसेना पदाधिकार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने त्यांना आगामी काळात नवी मुंबईच्या निर्णय प्रक्रियेपासून ‘मातोश्री’ चार हात लांब ठेवण्याची शक्यता शिवसेना पदाधिकार्यांकडून व्यक्त केली जात आहे. शिवसेना संघटनेचे उपनेते असतानाही बेलापुर विधानसभा मतदारसंघ विजय नाहटांनी फारसे कार्य केले नसल्याच्या तक्रारी ‘मातोश्री’पर्यत गेल्या असल्याची माहिती शिवसेना पदाधिकार्यांकडून देण्यात येत आहे.