संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : एकीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांकडून कामगार संघटना राजकीय पक्षांकडून भ्रमनिरास होत असतानाच दुसरीकडे मात्र महापालिकेतील कंत्राटी कामगार शिवसेनेबाबत कमालीचे आशावादी असल्याचे कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई शहराचा कारभार ग्रामपंचायतीकडून सिडकोकडे आणि सिडकोकडून महापालिकेकडे टप्याटप्याने हस्तांतरीत झाला. या हस्तांतरण प्रक्रियेत कंत्राटी कामगारांची सेवादेखील हस्तांतरीत झाली. तथापि या कंत्राटी कामगारांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. समान कामाला समान न्याय ही कंत्राटी कामगारांच्या बाबतीत नवी मुंबईचे शिल्पकार असणार्या लोकनेते गणेश नाईकांकडून सातत्याने केली जात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेेसचीच सत्ता असणार्या नवी मुंबई महापालिकेत आजही कंत्राटी कामगारांच्या पदरी उपेक्षेचेच जीवन पडत आहे. कंत्राटी कामगारांच्या कायम सेवेचे दिवास्वप्न दाखवून कामगार संघटनांनी, महापालिका प्रशासनाने त्यांच्या भावनेशी खेळण्याचेच काम केले आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांची संख्या महापालिका प्रशासनात काम करणार्या कायम कामगारांच्या दुप्पट आहे. महापालिका प्रशासनात काम करणार्या कायम कामगारांना सहावे वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत असले तरी अधिकांश कंत्राटी कामगारांना पाचव्या वेतन आयोगाप्रमाणेदेखील वेतन मिळत नाही. कंत्राटी कामगारांना वेतन महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत असताना ठेकेदारांचे चोचले कोणासाठी व कशासाठी पुरविले जात आहेत, असा संतप्त सवाल कंत्राटी कामगारांकडून उघडपणे विचारण्यात येत आहे. महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून पीएफची रक्कम कापली जात असली तरी अधिकांश कंत्राटी कामगारांना त्यांचा पीएफ क्रमांकदेखील माहिती नाही. ठेकेदारांनी पीएफ कापला किती व भरला किती यामध्ये कोट्यवधी रूपयांचा घोटाळा असण्याची भीती महापालिकेच्या कामगार वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेत काम करणार्या कंत्राटी कामगारांची संख्या व त्यांचा पीएफ क्रमांक याची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची लेखी मागणी नवी मुंबई शिवसेनेतील मातब्बर प्रस्थ व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त व महापालिका प्रशासन उपायुक्तांकडे नुकतीच केली आहे. याच मागणीचा महापालिकेच्या चौथ्या सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तथापि याबाबत त्रिसदस्यीय समिती नेमली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे थातूरमातूर उत्तर देत पालिका प्रशासनाने पाच वर्षे वेळ मारून नेली. तथापि आता याच प्रश्नाचा पाठपुरावा मातब्बर नामदेव भगत करू लागल्याने कामगार वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महापालिकेच्या दुसर्या सभागृहात नगरसेवक म्हणून वावरताना सर्वप्रथम नामदेव भगत यांनीच कंत्राटी कामगारांच्या कायम सेवेचा प्रस्ताव मांडला होता. पाचवे सभागृह सुरू होण्यापूर्वीच कंत्राटी कामगारांची संख्या व त्यांचा पीएफ क्रमांक याबाबत नामदेव भगत यांनी पाठपुरावा सुरू केल्याने शिवसेना आपल्याला वार्यावर सोडणार नसल्याची उत्साही प्रतिक्रिया कंत्राटी कामगारांकडून व्यक्त करण्यात येवू लागली आहे.