काठमांडू : नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपाला शनिवारी आठवडा पूर्ण झाला. आतापर्यंत या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या सहा हजार ६२४ वर पोहोचली आहे तर जखमींचा आकडा १४ हजार २५ वर पोहोचल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.
नेपाळमध्ये शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ४.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. यामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या शनिवारी नेपाळला ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने जबरदस्त हादरा दिला. यामध्ये नेपाळची राजधानी काठमांडू शहर हे मोठ्या प्रमाणात उध्दवस्त झाले. त्यानंतरही नेपाळमध्ये सतत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते.
या भूकंपात सहा हजाराहून अधिकांचा बळी गेला असून अजून हजारो जण बेपत्ता आहेत. भूकंपामुळे उध्दवस्त झालेल्या नेपाळला सावरण्यासाठी जगभरातील अनेक देश मदत करत आहेत. तेथील नागरिकांना राहण्यासाठी तंबू, पाणी, जेवण, इतर गोष्टींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर इतर देशांकडून सुरु आहे.
नेपाळमध्ये भूकंपाला सात दिवस उलटल्यानंतर नागरिक बचावल्याची शक्यता मावळल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. हा विध्वसंक भूकंप होऊन सात दिवस लोटले आहेत. अद्यापही बचावकार्य वेगाने सुरु आहे. ढिगारा उपसण्याचे काम जोरात सुरु आहे. मात्र मला नाही वाटत ढिगार्याखाली नागरिक जिवंत असण्याची शक्यता आहे असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते लक्ष्मी प्रसाद ढाकल यांनी सांगितले.
या भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासोबत हजारो नागरिक यामध्ये बेपत्ता झाले आहेत. अनेक ठिकाणी ढिगारे मोठे मोठे असल्याने मृत नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.
नेपाळमधील भूकंपाने हजारो जणांचे बळी घेतलेच मात्र त्याचबरोबर वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली. रुग्णालये, इमारती, धार्मिक स्थळे, शाळा ज्या ठिकाणी होते तेथे केवळ आता मातीचे ढिगारे उरले आहेत. हे सर्व पुन्हा एकदा उभे करण्यासाठी नेपाळला दोन अब्ज डॉलर खर्च अपेक्षित असल्याचे अर्थमंत्री राम शरण महाता यांनी सांगितले.