मुंबई : ‘टाइमपास-३’ सिनेमा काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करायला हवी. उत्तम संहिता मिळेल. बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता चला, हवा येऊ द्या असे बोलून कामाला लागूया, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. राजकारणात त्यांचा अनुभव दांडगा असला तरी सध्याच्या परिस्थितीत ‘नया है वह!’ अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे म्हणत पवारांची खिल्ली उडविली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेची युती तुटेल, असे भाकित पवारांनी केले होते. युती सरकारमधील जबाबदार व्यक्तीनेच आपल्याला ही माहिती दिली होती. त्या आधारावर आपण हे वक्तव्य करीत आहोत अशी पुष्टीही पवारांनी जोडली होती. मात्र सत्ताधारी पक्षातील ही महान व्यक्ती कोण ते सांगण्यास पवारांनी नकार दिला. म्हणजे तोंड उघडायचे, पण झाकली मूठ तशीच ठेवून ‘हवा’ येऊ द्यायची हा पवारांचा धंदा जुनाच असला तरी त्यांच्या पुड्यांना आता महाराष्ट्राची जनता फसत नाही. स्थिरतेच्या नावाखाली बाहेरून पाठिंबा द्यायचा व सरकार अस्थिर ठेवून राज्य चालवायचे या राजकारणातील खेळ्या महाराष्ट्रात कालपर्यंत चालल्या असतीलही, पण यापुढे चालणार नाहीत. महाराष्ट्रात ‘युती’ सरकारचे बरे चालले आहे या दु:खातून पवारांना विनोद सुचत आहेत. शिवसेना-भाजपचेच सरकार महाराष्ट्रात आल्याने पवारांचा तपोभंग झाल्यानेच त्या अशी वारंवार पुड्या सोडत असतात अशी टीका सामनातून केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार जुनेजाणते, अनुभवी नेते, आम्ही पामरांनी त्यांच्याविषयी काय बोलावे? राजकारणातील ते एक ज्ञानदेवच आहेत. ज्ञानोबा माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले असे म्हणतात, पण या आधुनिक ज्ञानदेवांच्या पक्षात बैल व रेडे उरले नसल्याने ते स्वत:च लोकांना उपदेशाचे डोस पाजत असतात. ज्ञानदेवांनी भिंत चालवून दाखवली, तर शरद माऊली हे तोंडाची टकळी चालवून राजकारण हलवीत असतात. पण शेवटी त्यांची ज्येष्ठता वगैरे लक्षात घेता बरेच लोक कानात कापसाचे बोळे कोंबूनच त्यांची रसाळ प्रवचने ऐकत असतात. राजकारणात अनुभव दांडगा असला तरी सध्याच्या परिस्थितीत नया है वह! अशी त्यांची अवस्था झाली आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
पवारांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पवारांनी राजकारणात हयात घालवली, पण शेवटी पदरी काय पडले? उमरभर जिंदा रहा, मगर जिंदगी देखी नही. या उमर खय्यामच्या काव्याप्रमाणेच त्यांचे झाले. सारी उमर राजकारणात घालवली, पण इतरांना टपल्या व टिचक्या मारण्याशिवाय काय केले? जनतेच्या विश्वासास ते पात्र ठरले नाहीत व त्यांच्यावर भरवसा ठेवून कोणी राजकारण करायला तयार नाही. सारी ‘उमर’ राजकारणात घालवूनही शेवटी त्यांचा बेभरवशाचा ‘अब्दुल्ला’च झाला. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण व पवार कसे गुफ्तगू करीत होतो याचा खुलासा स्वत: मोदी यांनी बारामतीत जाऊन केला. त्यामुळे ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविण्याचा नैतिक अधिकार पवारांनी गमावला आहे. काही बाबतीत पवार हे मोदी यांचे सल्लागार होते हे मान्य केले तर पवारांना काहीच ‘वर्ज्य’ नाही हे आपोआप कळून येईल, असे सांगत पवारांच्या बेभरवशाच्या राजकारणावर हल्लाबोल केला आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादीला यश मिळाले त्यात पवारांचे कर्तृत्व नाही. भारतीय जनता पक्षाची कामगिरी सुमार झाल्याचा फायदा त्यांना मिळाला. पवार नवी मुंबईत प्रचारास गेले नाहीत. पवार तेथे गेले असते तर ‘राष्ट्रवादी’च्या जागा नक्कीच कमी झाल्या असत्या. पवारांना सध्या विशेष काम नसल्याने ‘टाइमपास’ चालला आहे. ‘टाइमपास-२’ नावाचा मराठी सिनेमा सध्या जोरात चालला आहे. दोन-चार दिवसांत पाच-दहा कोटींचा गल्ला या सिनेमाने गोळा केला. या सिनेमाच्या निर्माते व दिग्दर्शकांना ‘टाइमपास-३’ काढायचा असेल तर त्यांनी पवारांशी चर्चा करायला हवी. उत्तम संहिता मिळेल. ‘टाइमपास-३’ मध्ये दगडू कोण, पराजू कोण हे जनतेलाच ठरवू द्या. बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता ‘चला, हवा येऊ द्या’ असे बोलून कामाला लागूया असे सांगत पवार जे काही बोलतात त्याच्या नेमके उलटे समजायचे असते असे अग्रलेखात म्हटले आहे.