संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : महापौर व उपमहापौर निश्चित झाले असले तरी नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापतीची निवड अद्यापि बाकी आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समिती सदस्यांमध्ये सर्वच मातब्बरांचा समावेश असल्याने बोनकोडेकर मंडळी कोणाला झुकते माप देतात याकडे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.
महापालिकेच्या अर्थकारणरूपी तिजोरीच्या चाव्याची मालकी मिळत असल्याने स्थायी समिती सभापतीपद ही राजकारणात प्रतिष्ठेची बाब होवून बसली आहे. 16 सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये 8 राष्ट्रवादी काँग्रेसचे, 6 शिवसेनेचे व 1 भाजपाचा आणि 1 काँग्रेसचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा निवडणूक निकालानंतर मनोमिलाफ झाल्याने 9 सदस्यसंख्येच्या जोरावर सभापतीपद खेचून आणणे राष्ट्रवादी काँग्रेसला अशक्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयवंत सुतार, रविंद्र इथापे, शशिकांत राऊत, शंकर मोरे, सुरेश कुलकर्णी, विनोद म्हात्रे, नेत्रा शिर्के, अपर्णा गवते या आठ नगरसेवकांची निवड स्थायी समिती सदस्यपदी करण्यात आली आहे. जयवंत सुतार यांची सभागृहनेतेपदी निवड झालेली असल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागणे अवघड आहे. महिलाराजचा बोलबाला करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही घटकांनी नेत्रा शिर्के यांच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी महिलाराज या एकमेव निकषावर त्यांना अपर्णा गवते या अडथळा बनण्याची शक्यता आहे. अपर्णा गवते या उच्चविद्याविभूषित असून महापालिका सभागृहात बोलक्या वक्त्यांमध्ये त्यांची गणना होत आहे. अभ्यासू वृत्ती व मुद्दा मांडण्याची प्रभावी भूमिका या निकषावर नेत्रा शिर्केच्या तुलनेत अपर्णा गवतेची कामगिरी उजवी आहे. गतसभागृहातही स्थायी समिती सभापतीपदाकरता अपर्णा गवतेंचे नाव शेवटपर्यत स्पर्धेत होते.
अन्य नगरसेवकांचा विचार केल्यास रविंद्र इथापे, शंकर मोरे, सुरेश कुलकर्णी, विनोद म्हात्रे यांच्यातच स्पर्धा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूकीपूर्वी काही दिवस अगोदर इथापेंचा बदलता राजकीय कल त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता असून शंकर मोरेंना सभापतीपद देवून माथाडी वर्गाला न्याय देण्याची अपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विनोद म्हात्रे हे नातेसंबंधाच्या निकषावर तर सुरेश कुलकर्णी कडवट समर्थकांच्या निकषावर सभापतीपदाच्या स्पर्धेत प्रबळ ठरण्याची शक्यता आहे. सुरेश कुलकर्णी यांनी मागील सभागृहात सभापतीपद भूषविले असल्याने आता त्यांचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे. नेत्रा शिर्के, अपर्णा गवते, रविंद्र इथापे आणि शंकर मोरे या चार नावातून कोणा एका नावावर स्थायी समिती सभापतीपदाकरता बोनकोडेकरांकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून व पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.