नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ आणि १० मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पालिका प्रशासनाकडून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिताताई रतन मांडवे यांच्या हस्ते रविवारी कचरकुंड्याचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शिवसेना शाखाप्रमुख बाळू घनवट, शिवसैनिक व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतमहिन्यात झालेल्या महापालिका निवडणूकीत या प्रभागातून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिताताई मांडवे ९४२ दणदणीत मताधिक्याने विजयी झाल्या. माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी या परिसरात केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर या प्रभागातून शिवसेनेला दणदणीत मताधिक्य प्राप्त झाले. या प्रभागातील पाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रतन मांडवे यांनी स्वखर्चाने पेव्हर ब्लॉक बसवून दिले आहेत. विरोधी पक्षाचा नगरसेवक असतानाही रतन मांडवेंनी केलेली विकासकामे सत्ताधारी पक्षातील नेरूळमधील प्रस्थापित नगरसेवकांसाठी असूयेचा विषय बनली होती. रतन मांडवे करत असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणे, रतन मांडवेंच्या विकासकामांमध्ये उद्घाटनामध्ये राजकारण निर्माण करणे आदी प्रकार घडत गेल्याने स्थानिक मतदारांनी याबाबतची चीड मतदानातून व्यक्त केली.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचराकुंड्याचे वितरण होणार असल्याचे नगरसेविका सौ. सुनिताताई मांडवेंनी प्रभागातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना लेखी निवेदनातून कळविले होते. रविवारी गृहनिर्माण सोसायटी आवारात जावून त्यांना कचराकुंड्या प्रदान करण्यात आल्या. उपस्थित स्थानिक रहीवाशांनी या कार्यक्रमात रतन मांडवेंच्या कालावधीत झालेल्या विकासकामांची प्रशंसा केली.