सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पावसाळी कालावधीत आकस्मिकपणे उद्भवणार्या परिस्थितीस सामोरे जाण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून आपत्ती व्यवस्थापनासाठी विभाग कार्यालय, परिमंडळ व मुख्यालय पातळीवर त्रिस्तरीय कार्यप्रणाली महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. याकरीता विभागनिहाय नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नोडल अधिकारी म्हणून मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर (मुख्यालय) तसेच शिक्षण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगीरे (तुर्भे), परिमंडळ -१ चे उपायुक्त सुभाष इंगळे (वाशी), घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे (नेरुळ), योजना विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार (ऐरोली), परिमंडळ-२ चे उपायुक्त सुरेश पाटील (कोपरखैरणे), सहाय्यक आयुक्त सुभाष गायकर (दिघा), सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे (घणसोली), प्र. सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे (बेलापूर) हे विभागवार काम पाहणार आहेत. त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता संजय देसाई (बेलापूर/नेरुळ), अजय संख्ये (मुख्यालय), सुभाष सोनावणे (तुर्भे/वाशी), अनिल नेरपगार (कोपरखैरणे), शंकर पवार (घणसोली), हरीष चिचारिया (ऐरोली) व उप अभियंता मनोहर सोनावणे (दिघा) हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून तांत्रिक अडचणी तत्परतेने दूर होण्याच्या दृष्टीने काम करणार आहेत.
सीबीडी बेलापूर येथील महापालिका मुख्यालयात २४ तास ३६५ दिवस कार्यान्वित तात्काळ कृती केंद्राप्रमाणेच जूनच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी, ऐरोली व नेरुळ अग्निशमन केंद्रात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. या सर्व नियंत्रण कक्षांमध्ये पाणी उपसा पंप व आवश्यक यंत्रसामुग्री तसेच मदतकार्य करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध असणार असून सर्वच विभाग कार्यालयात तात्काळ मदतकार्य करणारी पथके उपकरणांसह २४ तास कार्यरत असणार आहेत.
पावसाळी कालावधीत आकस्मिकपणे निर्माण होणार्या आपत्तींचे निवारण करणे व त्यावर नियंत्रण ठेवून घटनास्थळी तत्परतेने मदत पोहचविणे याकरीता प्रत्येक नियंत्रण कक्षात क्षेत्रनिहाय नियंत्रण अधिकारी म्हणून अग्निशमन दलातील सहाय्यक केंद्र अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये व्ही.बी. म्हात्रे (वाशी), ए. आर. पवार (ऐरोली), ए.डी.बोराडे (नेरुळ), शिवराम ढुमणे (सीबीडी) या अधिकार्यांचा समावेश आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आपद्ग्रस्त नागरिकांच्या तात्काळ निवार्याकरीता तात्पुरती निवारा ठिकाणे/ संक्रमण शिबिर स्थळे विभागनिहाय निश्चित करुन ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक विभाग कार्यालयास अशाप्रसंगी आवश्यक खाद्य पदार्थ व अनुषांगिक वस्तूंचा साठा करुन त्या गरजेनुसार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या अत्यावश्यक कामांसाठी, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी तसेच आवश्यक डेब्रिज उचलण्यासाठी विभाग अधिकारी यांना रु. १ लक्ष इतकी अग्रीम रक्कम रिकरींग स्वरुपात पूर्ण वर्षाकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुख्यालय / आपत्ती व्यवस्थापन, अतिक्रमण, परिमंडळ १ व २ या उपायुक्तांना पावसाळी कालावधीतील तातडीच्या अत्यावश्यक कामांकरीता रु. २ लक्ष खर्चाचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाकरीता २ शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडे प्रसिध्द करण्यात येत असून पहिल्या आराखडयात आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना व घ्यावयाची खबरदारी आणि प्रत्येकाच्या जबाबदार्या याविषयी माहिती व अपेक्षित कार्यवाहीचा तपशिल नमूद करण्यात आलेला आहे.
दुसर्या आराखडयात आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधावयाच्या अधिकार्यांचे व कार्यालयांचे दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक त्याचप्रमाणे विभागनिहाय मदत करणार्या सेवाभावी संस्था मंडळे, वॉटर टँकर, जेसीबी, पोकलन, डंपर अशी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ यांची माहिती नमूद करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालये, पोलीस यंत्रंणा, एनएमएमटी, बेस्ट परिवहन सेवा, रेल्वे स्टेशन्स, अग्निशमन केंद्रे, भरतीच्या वेळा अशी बहुउपयोगी माहिती नमूद करण्यात येत आहे. त्यासोबतच नागरिकांनी पावसाळी कालावधीत घ्यावयाची काळजी आणि तात्काळ संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक यांचे जाहिर आवाहन वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्यात येणार आहे.
पावसाळयात उद्भवणार्या साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी पाण्याचे नमुने नियमितपणे तपासले जात आहेत. डासांच्या संभाव्य उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन तेथे औषध फवारणी केली जात आहे. आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्यात येत असून वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात विशेष वॉर्ड सुसज्ज असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गटारे/नालेसफाई मे अखेरपर्यंत पूर्ण होत असून पावसाळी कालावधीत नवी मुंबईकर नागरिकांना कोणत्याही प्रकाराच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असल्याचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.