नवी दिल्ली : भूसंपादन विधेयक संसदेत मंजूर करणारच, अशी ठोस भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर थेट शरसंधान साधलंय. सरकार भूसंपादन विधेयकावरून मागे हटणार नाही, हे पीएम मोदींनी पीटीआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
भूसंपादन विधेयकावर सर्वांनी सूचना दिल्यास त्याचे स्वागतच आहे. पण हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करणारच, असं मोदी म्हणाले. अशीच भूमिका त्यांनी जीएसटी विधेयकावर मांडली. केंद्रातील यापूर्वीच्या युपीए सरकारवर मोदींनी हल्ला चढवला. काही घटनाबाह्य संस्था युपीए सरकार चालवत होत्या, असं मोदी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटूनही काँग्रेसला पराभव पचवता आलेला नाही, असा टोला पीएम मोदींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधी यांनी मोदींवर सूट-बूटची सरकार अशी टीका केली होती. सरकारची शक्ती पीएमओमध्ये एकवटल्याचा आरोपही मोदींनी साफ फेटाळला. पंतप्रधान आणि पीएमओ हे या प्रशासकीय व्यवस्थेचा घटनात्मक हिस्सा आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही समाजाविरोधात कुठल्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असं मोदींनी अल्पसंख्यकांवरील हल्ल्याबाबत स्पष्ट केलं.
गैर सरकारी संस्थां (एनजीओ) वरील केंद्र सरकारच्या कारवाईवरून होत असलेल्या टीकेलाही मोदींनी प्रत्युत्तर दिलं. संबंधित संस्थांवर कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली गेली आहे. आणि कुठलाही देशभक्त नागरिक यावर अक्षेप नोंदवणार नाही, असं मोदी म्हणाले. आपल्या परदेश दौर्यावरून विरोधक निराधार आरोप करत असल्याचं मोदींनी सांगितलं.