मुंबई : मुंबई विमानतळावर उतरलेल्या जेट एअरवेजच्या विमानातून शनिवारी सकाळी सीमा शुल्क अधिकार्यांनी दोन कोटीचे सोने जप्त केले.
9 डब्लू 539 या जेट एअरवेजच्या मस्कत-मुंबई विमानातील प्रसाधनगृहातून सीमा शुल्क अधिकार्यांनी आठ किलो सोने जप्त केले.
सेगू नैना महम्मद शेखथीन शा या प्रवाशाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विमानातील प्रसाधनगृहात सोने लपवल्याची कबुली त्याने दिली अशी माहिती हवाई गुप्तचर अधिकार्याने दिली.
अटक केलेल्या आरोपीची न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात दुबई-मुंबई विमानातून 24.68 लाख रुपये किंमतीची सोन्याची दोन बिस्कीटे जप्त करण्यात आली होती.
त्यानंतर दोहा-मुंबई विमानात प्रवाशाच्या आसनाखाली 1.8 किलो वजनाची सोन्याची 16 बिस्कीटे सापडली होती. फ्रेबुवारी महिन्यात मस्कतला जाणार्या आंतरराष्ट्रीय विमानाच्या प्रसाधनगृहातून 1.49 कोटी रुपये किंमतीचे सहा किलो सोने जप्त करण्यात आले होते.
11 फेब्रुवारीपासून चारवेळा विमानतळाशी संबंधित कर्मचार्यांना सोने तस्करीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जानेवारीपासून सीमा शुल्क विभागाने आतापर्यंत मुंबई विमानतळावरुन 250 किलो सोने जप्त केले आहे. या वर्षातील सर्वाधिक सोने जप्तीची कारवाई शनिवारी करण्यात आली.