मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यानंतर मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मागील वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या 772 इमारतींवरील बीएमसीची कारवाई यंदाचा पावसाळा आला तरी संपलेली नाही. त्यातच यंदाही 552 धोकादायक इमारतींची भर पडली आहे.
मुंबईतल्या धोकादायक इमारती खाली करून त्या तात्काळ पाडल्या जात नसल्यानं मानवी जीवाची फार मोठी किंमत अनेकदा मोजावी लागलीय. मागील वर्षी मुंबई महापालिकेनं 772 इमारती अती धोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या. त्यातल्या सुमारे 250 इमारती मोकळ्या करून पाडण्याचं काम सुरू आहे. तर उर्वरीत प्रकरणात कोर्टानं स्टे दिला असल्यानं बीएमसी आता या प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
यावर्षीही बीएमसीनं 552 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. या इमारतींना पालिकेनं आता नोटीसा देण्यास सुरूवात केलीय. याव्यतिरिक्त बीएमसीच्या मालकीच्या 124 इमारतीही अतिधोकादायक स्थितीत आहेत.
धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांचा इमारत खाली करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव प्रशासनाला आहे. यामध्ये रहिवाशांचीही काही चूक नाही. कारण ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षं सडत असलेल्या लोकांचा अनुभव ते ऐकून आहेत. त्यातच एकदा सोडलेलं घर परत कधी मिळेल याचीही खात्री नाही. तसंच सरकार, पालिका आणि बिल्डरांवर विश्वास नसल्यानं, नागरिक धोकादायक इमारतीतच राहणं पसंत करतात.
जीव मुठीत घेवून जगणार्या या इमारतींमधल्या रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्याऐवजी, त्यांना तिथंच लवकरात लवकर घर मिळवून देणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. नाही तर दरवर्षी घडणार्या इमारत दुर्घटनांमधून काहीच धडा घेतला गेला नाही, अशी चर्चा आहे.
ठळक बाबी
* मागील वर्षी महापालिकेकडून 772 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर
* त्यापैकी सुमारे 250 इमारती मोकळ्या करून पाडण्याचं काम सुरू
* उर्वरीत प्रकरणात कोर्टानं स्टे दिल्यानं बीएमसी प्रतिज्ञापत्र दाखल करणार
* यावर्षी बीएमसीकडून 552 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर
* या इमारतींना पालिकेकडून नोटीस द्यायला सुरुवात
* बीएमसीच्या मालकीच्या 124 इमारतीही अतिधोकादायक स्थितीत