पनवेल : : पावसाळ्याच्या तोंडावर तसेच किरकोळ दरडी पडण्याचे प्रकार झाल्यानंतर कोकणातील आंबोली घाटात दरड कोसळण्याचे सावट आहेत. आंबोली घाट यावर्षीही धोकादायक स्थितीत आहे. धोकादायक झाडे तोडण्याची मागणी गेले सहा महिने करूनही वन व बांधकाम विभागांनी दुर्लक्ष केले. या वर्षी किरकोळ दरडी पडण्याचे प्रकारही घडले आहेत.
सध्या घाटात दुतर्फा झाडेही धोकादायक आहेत. वनक्षेत्र आहे; मात्र वन विभाग सुशेगात आहे. या वर्षी तीन वेळा झाडे पडून वाहतूक थांबवल्यानंतर पोलिस व बांधकाम विभागानेच झाडे हटवली. अशा वेळी वन कर्मचारी गायब असणे नित्याचेच झाले आहे. यामुळे यापुढे झाड पडून वाहतूक कोंडी झाल्यास संबंधित वन कर्मचार्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, आंबोली घाटाच्या दुरुस्ती देखभालीसाठी 2010 पासून जवळपास 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. घाटात 29 जुलै 2010 ला पहिली मोठी दरड कोसळली. या वेळी 22 दिवस घाट बंद होता. या वेळी दरडींवर जवळपास दीड कोटी खर्च झाले. यानंतर दुसर्या वर्षीही जवळपास 50 लाख खर्च करण्यात आला. यानंतर स्वीझरलँडची साडेतीन कोटींची जाळी बसविणे, पायर्या बांधणे, यासाठी दोन कोटी, तसेच काँक्रिटीकर व रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली जवळपास 10 कोटींच्या वर रक्कम खर्ची घातली. इतके होऊनही रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करून चाळण बनवली होती. या नंतर निकृष्ट दर्जाची कामे करणार्यांना पुन्हा ठेकेदारी देण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी व ठेकेदार यांचे साटेलोट पुढे येत आहेत. सध्याही कठड्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी तक्रारही दिली आहे. घाटातील दरडीच्या ठिकाणी केवळ थोड्याशाच भागाला जाळी बसविण्यात आली आहे. कड्यापासून सुटलेला भाग व कोसळण्याच्या स्थितीत असलेला भाग तसाच आहे; मात्र थोडीशी जाळी बसविल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पूर्वीचा वस येथेही धोकादायक परिस्थिती आहे. येथेही अधूनमधून भेगाळलेल्या भागातून दरडी कोसळत आहेत. गेली चार वर्षे यावर अधिकारी मौन बाळगून आहेत. राजकीय इच्छाशक्ती येथे कमी पडत आहेत. या बाबत मंत्रालय स्तरावर तक्रारी व मागणी केल्यामुळे घाटाच्या सर्वेक्षणाचे आदेश अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले होते. ग्रामस्थांनी घाटमार्ग रुंदीकरणाची मागणी केली आहे. सावंतवाडी-बेळगाव या रस्त्याचे दुपदरीकरण प्रस्तावित आहे. जिल्हाधिकार्यांनी तसा अहवालही मागितला आहे. घाटातील चार किलोमीटर भाग व्ही आकारात कापून रुंदीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा 20 वर्षांनंतर हा घाट अतिधोकादायक असल्याचाही इशारा अभ्यासकांनी दिला आहे. या प्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्याकडे ग्रामस्थ अनिल चव्हाण, महादेव भिसे, पंचायत समिती सदस्य रोहिणी गावडे आदींनी निवेदन देऊन लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या बाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले.