मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मराठी माणसांसमोर ठेवून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी बलाढ्य संघटना शिवसेनेने आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र, मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने आजचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार होते. आगामी वाटचालीसाठी ते शिवसैनिकांना काय मंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री, उपनेते, खासदार, आमदार, महापौर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक व युवासैनिक या सोहळ्यात सहभागी होणार होते. मात्र, हा कार्यक्रम येत्या काही दिवसात सवडीने घेतला जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
‘तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा’ पण न्याय हा झालाच पाहिजे! असे मराठीबांधवांना सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी १८ जून १९६६ रोजी शिवसेना संघटनेची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी दिलेला कानमंत्र उराशी बाळगून मराठीजणांनी शिवसेनेला डोक्यावर घेतले. बाळासाहेबांचे आक्रमक बोल तमाम मराठीजणांनी स्वीकारले. त्यामुळे शिवसेनेची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घोडदौड सुरु राहिली. त्यामुळेच आज आपल्याला एका संघटनेचे बलाढ्य शिवसेनेच्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसत आहे.
स्थापनेनंतर मुंबईत अल्पावधीतच रुजलेली शिवसेना हा हा म्हणता महाराष्ट्रभर पसरली. मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सर्वच मुलुखांत शिवसेनेची घोडदौड झाली. मुंबईसह महाराष्ट्रभर पसरलेली ही संघटना गेल्या ५० वर्षांत एक मजबूत ताकद म्हणून पुढे आली. शिवसेनेच्या लढाऊ आणि आक्रमक बाण्यामुळेच त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात कुठलाही राजकीय निर्णय होत नाही अशी जरब सेनेने निर्माण केली. घात, अपघात असो वा नैसर्गिक संकट, मदत आणि बचावकार्यात आघाडीवर असतात ते शिवसैनिकच! संयुक्त महाराष्ट्राचा लढा आजही जिवंत ठेवला आहे तो शिवसेनेनेच. शिवसेनाप्रमुखांनी राजकारणासोबतच समाजकारणाचा जो आदर्श वस्तुपाठ घालून दिला त्या मार्गावरच शिवसेना दमदारपणे मार्गक्रमण करीत आहे. भविष्यातही सूर्य, चंद्र, पृथ्वी असेतोवर हा अग्निकुंड असाच धगधगत राहील, असा दृढ संकल्पच लाखो शिवसैनिक सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करीत आहेत.