ठाणे : गुरुवार रात्रीपासून जोरदारपणे सुरु असलेल्या पावसाने ठाणे व रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडून काढले आहे. या पावसामुळे शहरी भागात नालेसफाईचा पोलखोल झालेला असतानाच कर्जत-कसारादरम्यानची लोकलसेवा धिम्या गतीने सुरू होती.
त्यामुळे हजारो चाकरमान्यांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. ठाणे-सीएसटीदरम्यानची लोकलसेवा ठप्प झाल्याने अनेकांना खाजगी वाहतूकीने कार्यालय गाठावे लागले. संततधार पावसाने सखल भागात झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
पहाटेपासूनच पावसाने जोर धरल्याने ठाणे-सीएसटीदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे उशिरा का होईना कर्जत-कसारा येथून लोकलने प्रवास करणार्या प्रवाशांना ठाण्याच्या पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे अनेकांनी कल्याण येथूनच घर गाठले. अनेकांनी ठाण्याला येऊन खाजगी वाहतूकीने प्रवास केला.
सकाळपासून कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका पाठोपाठ एक लोकल उभ्या होत्या. मात्र, लांब पल्ल्याच्या गाडया कल्याण परिसरात खोळंबून होत्या. अनेक गाडया कर्जत व कसारा येथून परत पाठवण्यात आल्या.
मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला अक्षरश: धुऊन काढले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग जलमय झाल्याचे पहायला मिळाले आहे. संततधार पावसाने मुरुड -अलिबागसह अनेक भागातील विजपुरवठा खंडीत झाला आहे.
गेल्या चोविस तासात अलिबाग परिसरात पुरसदृष्य परिस्थीती निर्माण झाली. शहरातील सखल भागात पाणी शिरले. रामनाथ, तळकरनगर, पिएनपीनगर, बाफना बाग, आनंद नगर, चेंढरे, रोहीदास नगर परिसरात पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळाले. वादळी वारा आणि पावसामुळे पोलीस मुख्यालयासमोर वृक्ष उन्मळून पडले.
पेण शहरातील बस स्थानक परिसर, भोगावती नदी जवळचा परिसर जलमय झाला होता. यानिमित्याने पहायला मिळाले. धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळी काही प्रमाणात वाढ झाली. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने बळीराजा मात्र चांगलाच सुखावला.
येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नदी किनार्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.मुसळधार पावसामुळे पेणमध्ये डोंगराजवळचे घर कोसळले. त्यानंतर आपतकालिन यंत्रणा व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घराचा पडलेला भाग काढण्याचे काम जोरात सुरु आहे. पोलादपूर, महाड, उरण, नागोठणे आदी परिसरातही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
डोंबिवली-कल्याण, अंबरनाथ,बदलापूर याठिकाणी सकाळी सखल भागात पाणी साठले होते.
पावसासोबत सोसाटयाचा वारा असल्याने अनेक भागात झाडे कोसळली. डोंबिवलीतील मुखर्जी रोडवर वीजेच्या तारांवर झाड कोसळले. त्यामुळे बराच काळ या भागातील वीज पुरवठा खंडीत झालेला होता.
अंबरनाथमध्ये वीज पुरवठा अनियमित सुरु आहे. कळवा येथे अनेक घरांत पाणी मुसळधार पावसामुळे कळवा प्रभाग समितीतर्ंगत दुर्गा मंदिर जवळ वाघोबानगर येथील ६ घरांत पाणी गेले होते. महापालिकेच्या आपतकालिन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
शहरात अतिवृष्टीमुळे वैतीवाडी, वंदना टॉकिज,रायलादेवी,भटवाडी,ढोकाळी,नेटोलॉक कंपनी,वाघबीळ येथे पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सकाळी लोकमान्यनगर येथे गुरुकृपा चाळीतील शिवाजी पवार यांचे राहते घर कोसळले. ठिकठिकाणी शॉर्टसर्किट व किरकोळ आगीच्या घटना घडल्या आहेत.
अतिवृष्टीने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने सॅटीस ते दादर आणि सॅटीस ते मुलुंड चेकनाका या दरम्यान विशेष बससेवा सुरु केली होती. ५ वातानुकुलिन व २ साध्या बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.
रस्त्यांची कामे आणि अर्धवट नालेसफाई यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना नालेसफाईचा केलेला दावा फोल ठरला आहे.दरम्यान, अनेकांनी पावसात मनसोक्त भिजून पाऊस एन्जॉय केला.
गेल्या अनेक तासांपासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे बच्चेकंपनीनी घर बसूनच पावसाची मजा घेतली.
गेल्या चोवीस तासात ठाणे जिल्ह्यात एकूण ४९८.९२ मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे. ठाणे तालुक्यात १३२ मिली मीटर, कल्याण-८०.८०,मुरबाड-२१,भिवंडी-७५,शहापूर-२३.४०, उल्हासनगर-९०.०२ तर अंबरनाथ तालुक्यात ७७.५० मिली मिटर पावसाची नोंद झालेली आहे.