* शिवसेना नगरसेवक नामदेव भगतांचे पालिका आयुक्तांना साकडे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीत निधीची निर्माण झालेली चणचण आणि सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साथीच्या आजारांचे निर्माण होवू पाहणारे संकट या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आरोग्यविषयक कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी गुरूवारी (दि. 19 जुन) महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेकडे विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध नाही. नवनवीन विकासकामांना विलंब होणार ही बाब आता सर्वसामान्य नवी मुंबईकरांनाही मिडीयाच्या माध्यमातून समजलेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नवी मुंबई शहरात साथीच्या आजारांचा उद्रेक होतो. खासगी तसेच महापालिकेच्या रूग्णालयात, दवाखान्यात, नागरी आरोग्य केंद्रात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू तसेच अपवादात्मक स्थितीत लेप्टोस्पायरोसिसचे रूग्णही पहावयास मिळतात. महापालिकेकडून ठेकेदारांना त्यांची देयके तीन ते चार महिने भेटत नाहीत. परिणामी ठेकेदारांकडे काम करणार्या कंत्राटी कामगारांच्या वेतनासही विलंब होत आहे. मलेरिया, डास, अळीनाशक, मूषक नियत्रंण, सफाई आदी कामगारांची पावसाळ्यात भूमिका निर्णायक तसेच महत्वाची आहे. आरोग्यविषयक बाबींमध्ये हे घटक महत्वपूर्ण आहेत. वेतनास विलंब झाल्यास कामगारांच्या कामावर तसेच मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. या कामगारांनी कामाबाबत चालढकल केल्यास नवी मुंबई शहराच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होवून नवी मुंबईत साथींच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाकडे कर वा अन्य रूपाने निधी जसा उपलब्ध होत जाईल, तसा तो निधी सर्वप्रथम आरोग्यविषयक कामांवर प्राधान्याने खर्च करावा, पावसाळ्याचे दिवस व साथीच्या आजारांच्या उद्रेकाचा ईतिहास पाहता मागणीमागील गांभीर्य समजून घ्यावे. एकवेळ अन्य विकासकामांना चार-आठ महिने विलंब झाला तर समजण्यासारखे आहे. परंतु आरोग्यविषयक कामांना निधी विलंब झाल्यास नवी मुंबईकरांच्या आरोग्यविषयक सुदृढतेवर आपणच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे असल्याचे शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सफाई, मलेरिया, मूषक नियत्रंण या ठेकेदारांना त्वरीत औषधे, त्यांचा निधी उपलब्ध करून देण्याकरता व त्या खात्यातील कामगारांचे वेतन वेळेवर होण्याकरता आयुक्तांनी स्वत: लक्ष देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून केली आहे.