मुंबई : उत्तर मुंबईतल्या मिठी नदीचा जोर आता ओसरला आहे. मिठी नदीची पातळी आता एक पॉईंट चार मीटरवर आली आहे. धोका टळला असला तरी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने धोका कायम आहे.
काल जोरदार पाऊस आणि मोठ्या भरतीच्या दरम्यान, मिठी नदीनं दोन पॉईंट चार इतकी पातळी गाठली होती. मिठी नदीची धोक्याची पातळी तीन पॉईंट चार इतकी आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेल्या ढगफुटीवेळी, याच मिठी नदीमुळे जबरदस्त नुकसान झालं होतं.
दरम्यान, पावसाच्या पहिल्याच जोरदार तडाख्यामुळे अख्खी मुंबई आणि लगतच्या परिसरात अघोषित बंदसारखी निर्माण झालेली स्थिती, शनिवारी सकाळी हळूहळू निवळू लागली. मुंबईची जीवनवाहिनी पश्रि्चम रेल्वे सकाळपासून धावू लागली खरी. मात्र तिचा वेग मंदावलेला होता. तर एरवी कुठल्याही क्षुल्लक कारणानं विस्कळीत होणारी हार्बर आणि मध्य रेल्वे सुद्धा रेल्वेपट्टीवर धावत होती. दरम्यान, पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रखडपट्टीत पुन्हा वाढ झालेय.
शहराच्या कोनाकोपर्यापर्यंत सेवा देणारी बेस्ट सेवेसाठी सरसावली होती. विशेष म्हणजे शुक्रवारी मोठ्या भरतीमुळे, साठलेल्या पाण्याचा निचरा होणं कठीण झालं होतं. मात्र त्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानं, ठिकठिकाणची तुंबापुरी ओसरली होती. मुंबईत पावसाचा जोर सकाळी ओसरला. दमदार पावसानं बीएमसीच्या दाव्यांची पोलखोल झाली. एलफिन्स्टन येथील सखल भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. पाणी उपसण्याचा पंप खराब झाल्यानं पाण्याचा निचरा होत नाहीये. मात्र परळ भागात वाहनांचं नुकसान झालंय.