* आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून तब्बल ४० कार्यक्रमांचे आयोजन
कल्याण / गणेश पोखरकर
उत्तम आरोग्याच्या दृष्टीने मानवी जीवनात योग साधनेला फार महत्व आहे. योगाचे हेच महत्व जाणून रविवार २१ जून हा पहिला जागतिक योग दिन म्हणून देश भरात साजरा करण्यात आला. याच जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून तब्बल ४० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कल्याण विभागातील ७ नामांकित योगा संस्थांनी या उपक्रमात मोलाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी कर्मचारी, महापालिका अधिकारी कर्मचारी, प्राचार्य प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो नागरीकांनी दिवसभरात कल्याण शहरात ठिकठिकाणी योगाची प्रात्याक्षिके केली. योगा दिना निमित्ताने भारतातील साडे अकरा लाख एनसीसी विद्यार्थ्यांनी योगा करून लिंम्का बुकमध्ये विक्रम नोंदविला. यामध्ये कल्याण शहरतील बिर्ला महाविद्यालयातील तब्बल ४९५ एनसीसी विद्यार्थ्यांनी योगा केला. विशेष म्हणजे आमदार पवार या ऐतिहासिक क्षणाचे नुसतेच साक्षीदार नव्हेतर, त्यांनी देखील विद्यार्थ्यांन बरोबर योगा करीत त्यांचा उत्साह वाढविला.
संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यतेची मोहर उमटवल्यानंतर २१ जून २०१५ हा जागतिक योगा दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्याच निमित्ताने कल्याण शहरात देखील आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून महाविद्यालये, शाळा, महापालिका, गृहनिर्माण संस्था, संप्रदायीक संस्था आणि सामाजिक सेवाभावी संस्थाच्या मदतीने तब्बल ४० मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांना शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन बरोबर समाजातील प्रत्येक घटकांनी उस्फुर्त सहभाग घेतल्यामुळे योगा दिनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये कल्याण शहरातील आयुर्वेध व्यासपीठ, स्वामी विवेकानंद योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतांजली योग विद्यापीठ, प्रजापती ब्रम्हकुमारी योग संस्था, झफुर्जा संस्था आणि रेड चाईल्स या ७ नामांकित संस्थांनी उपस्थितांना योगाची प्रात्याक्षिके दाखवली. यामध्ये प्रामुख्याने प्राणायाम, कपालभाती, पदमासन, शिरशासान, सिद्धासन, नौकासन, हलासन, चक्रासन, दोरीवरचे मलखांब आणि सूर्य नमस्कार आदी योगा प्रकार करण्यात आले. त्याच प्रमाणे मानवी जीवनातील योग साधनेचे महत्व उपस्थिताना सांगण्यात आले. या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार पवार यांनी उपस्थितांना योगा दिनाच्या शुभेच्छा देऊन योगा करण्यात सहभाग घेतला. या दिनाच्या पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात कल्याणच्या शिंदे मळा येथून झाली. येथे नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात नागरीकांच्या उपस्थितीत उस्फुर्तपणे सुरुवात झाली. यांनतर बिर्ला महाविद्यालयात सकाळी ७.०० वाजता आमदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य नरेश चंद्र आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्याक्षिके केली. त्याच बरोबर कल्याण डोंबिवली महापलिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी कल्याणच्या आत्रे रंग मंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आमदार पवारांच्या समवेत योगा केला.
दरम्यान त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगा दिन भूमिकेला साद देत कल्याण शहरातील अनेक शाळांमध्ये देखील जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. या निमात्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची सांगता सायंकाळी ६.०० वाजता पारनाका येथील डॉ. आनंदीबाई जोशी सभागृहातील कार्यक्रमाने झाली. सदरचे तब्बल ४० कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ता गणेश वरुडकर भाजपा कल्याण शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस प्रिया शर्मा, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वैशाली पाटील, शहर उपाध्यक्ष रितेश फडके, जिल्हा उपाध्यक्ष नितीन जैन, जिल्हा कोषाध्यक्ष कल्पेश जोशी आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्तेनी विशेष मेहनत घेतली.