पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. एक्स्प्रेसवेवरील वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळं एक्स्प्रेस वेवरील वाहतूक आधीच धिम्यागतीनं सुरू असून वाहतुकीची कोंडी होतेय. त्यातच शनिवार-रविवारची सुट्टी आटोपून मुंबईकडे येणार्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळं एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक असते.
मात्र आज खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळं मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
शनिवार संध्याकाळपासून पुणे-लोणावळा-खंडाळा घाट परिसरात होणार्या संततधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली. यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी एक्सप्रेस मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मंद गतीने सुरू आहे. पुण्याहून मुंबईकडे येणार्या गाड्यांना आता जुन्या महामार्गावर वळण्यात आले आहे.
गेले दोन दिवस या परिसरात बराच पाऊस पडला. त्यामुळे बोगद्याजवळ दरड कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी एक्सप्रेस मार्गावर वाहने खोळंबून राहू नये म्हणून मुंबईकडे येणार्या वाहनांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात आले आहे. मात्र आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने या मार्गावर गाड्यांची संख्या जास्त असून जुन्या महामार्गावर देखील जवळपास दोन किमीच्या रांगा लागल्या आहेत.